विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

🚩महापराक्रमी थोरले बाजीराव पेशवे 🚩

 

🚩महापराक्रमी थोरले बाजीराव पेशवे  🚩

 लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

१८ ऑगस्ट इ.स.१७०० महापराक्रमी, महायोद्धा
थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म.
असा धुरंदर पेशवा की ,ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा ऊत्तर भारतात विस्तारल्या.वयाच्या अवघ्या
२०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सन१७२० पासून पेशवे होते. ते थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जात. बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीरावांचे पिता .वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले .शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला ते गेले तेव्हा १९ वर्षाचा बाजी त्यांच्याबरोबर होता.उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हात पाय पसरण्यासाठी किती शक्यता आहे याचा अंदाज या कोवळ्या वयातच बाजीरावांना आला होता .रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठी दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या .वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. बाजीराव पेशवे यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना गर्भगळीत करून,दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, “देवदत्त सेनानी” असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांची कारकीर्द वादळी ठरली.
थोरले बाजीराव पेशवे हे ,मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून पेशवे (मुख्य प्रधान) होते. ते थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जात. ज्यावेळी छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्या समोर हतबल झाले, तेव्हा गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले.अर्थात बाजीरावांनी तेथेही आपल्या तलवारीची कीर्ती कायम ठेवली.त्याची परतफ़ेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३ लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भुभाग बाजीरावांना नजर केला.शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी “मस्तानी” त्यांना दिली.
बाजीराव शिपाईगडी होते. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. सन १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यानी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धार(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्या आहेत. या काळात त्यांना सुभेदार पिलाजी जाधवराव ,खंडेराव दाभाडे राणोजी शिंदे ,मल्हार राव होळकर, कंठाजी कदमबांडे या खंद्या समर्थ योद्ध्य॔ची त्यांना साथ लाभली होती.
वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको. हीच त्यांची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. बाजीरावांचे खाजगी चार घोडे होते निळा, गंगा ,सारंगा ,अबलख.या घोड्यांचे वैरण पाणी ते स्वतः बघत. खोटेपणा अन्याय ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते
बाजीराव म्हणत रात्र ही झोपे करिता नाही ,तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यावर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे .झोप ही घोड्यावर बसल्यावर घेता आली पाहिजे .या उद्गारा मागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते ती म्हणजे बाजीरावांचे स्वतःच्या झोपे बद्दल असलेले नियंत्रण. कुठून आली असेल ही हुकमी झोप बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे .अशी नोंद अनेक ऐतिहासिक बखरी मध्ये आढळून येते.
चिमाजी अप्पा हे बाजीरावाचा धाकटे भाऊ. यांनी देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच “वज्रेश्वरी” देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पर्यंत पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली.
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी (मध्यप्रदेश) या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशवे यांचे निधन झाले.
🙏 अशा या रणझुंजार बाजीराव पेशवे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...