विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

💐 माँसाहेब 💐

 

💐
माँसाहेब 💐
 
लेखन ✒️
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
शिवाजीराजे आता छत्रपती झाले होते. राज्याभिषेक जिजाऊंनी अगदी जवळून पाहिला होता. राज्याभिषेकानंतर राजांनी खूप दानधर्म केला. त्यामुळे जिजाऊसाहेबांन खूप समाधान वाटले. राजांनी अन्नछत्र कित्येक दिवस चालू ठेवले होते, प्रत्येकाची विचारपूस करून प्रेमाने त्यांचे सन्मान केले ,आशीर्वाद घेतले. मंदिराची व्यवस्था लावून दिली. कायमचे पुजारी नेमले. हे सर्व पाहण्यासाठी जिजाऊंना देवाने भरपूर आयुष्य दिले होते. जिजाऊंना रायगडची हवा सोसवत नव्हती. त्यांना खूप थकवा वाटत होता.त्यांना आपल्या जीवाची आशा वाटत नव्हती. म्हणून राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पालखीत बसवून मातोश्रींना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचविण्यात आले होते. राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचा प्राण होता. सर्वस्व होते. महाराजांचे दैवत होते. आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक तोळामासा झाली होती. गडावरची थंड हवा, वारा त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी उत्तम वाडा पाचाड येथे बांधला होता. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. आईसाहेबांचे वय आता उताराकडे लागले होते. त्यांना आता काय हवे होते? त्यांना काहीही नको होते .पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरवले होते. त्यावर आता कित्येक वर्षे उलटून गेली होती. रायगड सोडून राजे पाचाडला आले होते. जिजाऊंची प्रकृती पाहून राजांना शोक आवरत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या," शिवबा, हा शोक तुम्हाला शोभत नाही. तुम्ही आता लहान नाही. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितले, 'आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिले नाही. मासाहेब तुम्ही जाऊ नका! तुमच आम्ही ऐकलं .आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात, ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. शिवबा आम्ही का जन्माला पुरलो? मुलांचे करते पण पहात ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचे यश नाही का? आणि मी गेले तरी कुठे जाणार? देहाने गेले तरी मनाने इथेच आहे .आमच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलेत तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहोत, हे तुमच्या ध्यानी येईल." छत्रपती शिवरायांना घडवण्याचे सामर्थ्य फक्त जिजाऊंच्या मध्ये होते. आणि ते त्यांनी पार पाडले होते . आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला .वर्षे, महिने ,आठवडे ,दिवस संपले .आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले .कोणाचेही ईथे काही चालत नाही .आई साहेबांनी डोळे मिटले! श्वासोच्छ्वास संपला!चैतन्य निघून गेले! आईसाहेब गेल्या! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले.आईवेड्या शिवबाच्या आईसाहेब गेल्या. शिवनेरीवर अंगाई गाणार्या, लाल महालात लाड करणार्या, राजगडावर स्फूर्ती देणार्या, आणि रायगडावर आशीर्वाद देणार्या आई कायमच्या निघून गेल्या. राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच 17 जून 16 74 रोजी पाचाड येथे जिजाऊ साहेबांचे निधन झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत खडतर पणे कृतार्थ जीवन जगलेल्या जिजाऊंना आलेल्या मृत्यूने महाराजांचे सर्वस्व हिरावून नेले. राजांच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले. धन्यती जिजाऊ माऊली ज्यांनी शिवरायांसारख्या एका महान वीराला जन्म दिला व धन्यते छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या राजमाता जिजाऊसाहेबांची कूस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली . 🙏 माँसाहेबांना कोटी कोटी प्रमाण.🙏 लेखन ✒️ डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...