🚩 इतिहासाचे न उलगडलेले पान
सातारा -कराड वाई या प्रदेशावर आदिलशाही राज्य करत असता, अफजलखानवधापूर्वी
गिरजोजी कुटुंब मौजे व्याहापूर या गावी रहात होते.मुधोजी यादव यांना
.रवळोजी,अरजोजी,गिरजोजी, शंकराजी, जोत्याजी असे पाच पुत्र होते .शिवाजी
महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यावर वाई -कराड- पन्हाळ्यापर्यंत प्रदेश
कबजात आणला. त्यावेळी या यादवांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध आला.
सातारा कराडच्या भागात जे कोणी छत्रपती शिवाजीराजांना सहकार्य करतील
त्यांचे कबिले पकडून कैदेत ठेवले जात. त्याच्या तडाख्यातून वाचण्यासाठी ही
यादव मंडळी आपल्या कुटुंबासह प्रतापगडाचे बांधकाम चालू होते तेथे
महाराजांच्या आश्रयास आले.लवकरच गिरजोजीसह इतर चार यादव बंधु महाराजांच्या
सेवेत रुजू झाले. गिरजोजी हे खास विश्वासाच्या खाजगीतील सेवेत रूजु
त्याच्यावर महाराजांची इतकी मर्जी बसली की त्यास राज्याभिषेक प्रसंगी
मोरचेल धरण्याचा मान मिळाला .
छत्रपती राजाराम महाराज-व
ताराराणी- कालखंडातील राजकारणात भाग घेतलेली ही एक महत्त्वाची व्यक्ती
होती. राजाराम महाराजांचा विश्वास गिरजोजीने अधिकाधिक संपादन केला, इतका की
छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या अंतःपुरचा 'सरहवालदार' म्हणून गिरजोजी
यांना नियुक्त केले. अंतःपुरचा सरहवालदार या नात्याने महाराजास होणाऱ्या
पुत्रजन्माची अथवा कन्याजन्माची वार्ता प्रथम सांगण्याचा मान गिरजोजी
यांना मिळाला..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून
यादव घराण्यातील हा गिरजोजी राजघराण्याच्या सेवेतील एक विश्वासू सेवक
म्हणून नावाजले गेले. ताराराणी यांच्या कारकीर्दीतही त्यांनी त्यांच्यावर
उत्तरोत्तर अधिक विश्वास टाकल्याचे दिसून येते.
गिरजोजी यादव
म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील मोठे अजब व्यक्तिमत्व होते .स.(1674) च्या
रायगडावरील शिवराज्याभिषेका पासून स.( 1714) च्या पन्हाळगडावरील
राज्यक्रांतीपर्यंत त्यांनी मराठेशाहीतील अनेक लहान-मोठ्या घडामोडीत,
राजकारणात ,भाग घेतलेला आढळतो. जीव धोक्यात घालून, प्रसंगी प्राणाचीही
पर्वा न करता राज्याच्या हितासाठी गिरजोजी मोठ्या अवघड व नाजूक कामगिरी
पार पडताना दिसतात. मग ती कामगिरी रायगडाच्या वेढ्यातून सोने-
जवाहिऱ्याच्या गाठोड्या आणायच्या असो वा औरंगाबादेस मोगलांच्या कैदेत
असणाऱ्या राणी दुर्गाबाईच्या सुटकेची असो!गिरजोजी यांनी कुठे तलवार हाती
घेऊन लढाई मारलेली दिसत नाही ;पण राजकीय /राजनैतिक डावपेचांच्या लढाईत ते
तरबेज होते. मग तो प्रसंग राजा कर्णास घेऊन जुल्फिकारखानाच्या गोटात
शिष्टाई करण्याचा असो वा प्रत्यक्ष राज्यकर्त्याविरुद्ध उठाव करून नवा
राजा बसिवण्याचा असो!
राजाराम महाराजांनी जिंजीचा मार्ग धरला
त्या जिंजीच्या प्रवासात महाराजांनी अत्यंत जीवाभावाची विश्वासाची माणसे
सोबत नेली होती. त्यामध्ये हे गिरजोजी यादव सोने जवाहाराचे गाठोडी घेऊन
बरोबर होते. गिरजोजीने पुढे आपल्या तक्रारीत कर्नाटकाच्या प्रवासातील
राजाराम महाराजा वरील संकटाचे व आपल्या सेवेचे निवारण केले .जिंजी
घेतल्यावर मोगलांच्या फौजा वेलोरवर चालून येणार अशा वार्ता छत्रपती
राजाराममहाराजा पर्यंत पोहोचल्या. तेव्हा कर्नाटकात महाराजांना न्यावयास
आलेल्या धनाजी जाधवांच्या फौजेबरोबर महाराज निघाले. निघताना त्यांनी आपला
कबिला पाठीमागे ठेवला व तो सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी गिरजोजी
यादव यांना सांगितली. ही जोखमीची कामगिरी अत्यंत सावधानतेने व
परिश्रमपूर्वक गिरजोजी यांनी पार पाडली. राजसबाई यांना पुत्र झाल्याची
वार्ता राजाराममहाराजांना समजली तेव्हा ते उद्गारले "गिरजोजी यादव यांनी
आंम्हाला संकटातून काढून आणले, त्यामुळे आम्ही हे संतोषाचे दिवस पाहिले ."
मोठमोठ्या नाजूक व विश्वासाची कामगिरी सहजासहजी पार पाडण्याचे
गिरजोजीचे कसब वाखाणण्यासारखे होते. त्यांच्या या गुणामुळेच छत्रपतीं
संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई या तिन्ही मराठी
राज्यकर्त्याचा ते खास विश्वासातले माणूस बनले. ताराराणीच्या कारकीर्दीत
तर मराठी राजकारणात त्यांचे महत्व इतके वाढले की 'ताराराणीचा दिवाण
'म्हणून त्यांचा लौकीक मोगली गोटापर्यंत पसरला.असे हे गिरजोजी म्हणजे
मराठेशाहीतील नि:संशय कर्तबगार पुरुष होते.
जाने.1692 मधे
राणी राजबाई यांना कन्यारत्न झाले ही वार्ता छत्रपती राजाराम महाराजांना
विधीत करताच त्यांनी गिरजोजी यांना कराड परगण्यातील तालुका उंब्रज व तालुका
तारगाव या दोन्ही तर्फाचे देशमुखीचे वतन बहाल केले. ताराराणी यांच्या
पोटी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला (9जून 1696 ) ही वार्ता महाराजांना
श्रूत करताच त्याना कराड परगण्याचे देशमुखीचे वतन बहाल केले.
अशा या स्वराज्याशी प्रामाणिक असणार्या गिरजोजी यादवांचे हे इतिहासाने न उलगडलेले पान
लेखन 🖋️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक पुणे)
No comments:
Post a Comment