विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 August 2020

🚩" वीर बाजी पासलकर 🚩

 

🚩" वीर बाजी पासलकर  🚩

 लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
(इतिहास अभ्यासक पुणे)
संदर्भ
शिवछत्रपतीचे शिलेदार- लेखक सचिन पोवार

नव्याने अधिष्ठित होणाऱ्या हिंदवी स्वराज्यासाठी सासवडी प्राणार्पण करून स्वराज्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरशिरोमणींच्या पंक्तीत अग्रस्थान भूषवणारे वीर बाजी पासलकर हे मोसे खोऱ्याचे एक पिढीजात बडे देशमुख होते .मोसे खोर्यातील मोसे हे त्यांचे मूळ गाव.बाजी पासलकर हे आठ गावचे देशमुख होते. बाजींच्या देहाची इमारत फार भक्कम होती. त्यांच्या ओठावरच्या मोठमोठ्या मिश्यांमुळे त्यांचा थाट अधिकच बहारदार दिसे. यांच्या दंडा एवढ्या मिशीचे कौतुक सार्या मावळ खोर्यावर वाटे, म्हणूनच त्यांच्या मिशीचे कौतुक करताना शाहीर यमाजी म्हणतो, 'दंडा एवढी मिशी बाजी पाच्छाई महाजर' .बाजी हे मोसे खोर्यातील एक तोलदार आसामी होते. अवघ्या मावळात त्यांचे विलक्षण वजन व धाक होता. बाजी सारखा शूर सज्जन दिलदार व परोपकारी माणूस अवघ्या मोसे खोऱ्यात दुसरा नव्हता. संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.एखाद्या देशमुखाचा खून होऊन त्याची बायकामुले देशोधडीस लागल्यास बाजीच त्यांना आश्रय देत .मावळातील लोकांच्या कर्जाबद्दल किंवा चांगल्या वागणुकीबद्दल जामीन राहून ते सदैव त्यांच्या उपयोगी पडत. अवघ्या मावळातील लोकांच्या भांडण तंट्यांचे निवाडे बाजी पासलकरच करीत .बाजींच्या दारी येणारा याचक कधीही विन्मुख परतत नसे असंख्य निराधारांचे बाजी हेच आश्रयदाते होते, तर अनेक गरजवंतांचे ते देव होते! साऱ्या मोसे खोर्याला बाजी हे एखाद्या पुरातन परोपकारी वटवृक्षासारखे भासत आणि खरोखरच बाजीरुपी या पुरातन परोपकारी वटवृक्षाच्या छायेत अवघे मोसे खोरे कसे सुखा-समाधानाने नांदत होते!बाजींच्या देहयष्टीप्रमाणे त्यांचा कुटुंबकबिला ही भारदस्त होता.त्यांना दोन मुली एक कान्होजी जेधे यांना तर दुसरी मोसे खोर्यातील मरकतरावांना दिली होती. त्यांची पुत्राची उणीव कान्होजी जेधेंनी भरून काढली होती.बाजींना गुणी लोकांचे फार कौतुक वाटे .अनेक गुणी लोकांना त्यांनी आपल्या पदरी आश्रय दिला होता .बाजी जसे सज्जन व दिलदार होते तसेच ते अतिशय शूर व बेडर होते .शत्रूवर बेफान होऊन तुटून पडण्याची त्यांची वृत्ती होती .हाती सापडलेल्या शत्रूची ते कधीही गय करीत नसत .प्रत्यक्ष जावयाची देखील त्यांनी गय केली नाही .बाजींच्या बागेतील यशवंती घोडी यांच्या बागेतून पळवून नेऊन विजापूरच्या बादशहाला नजर करण्याता घाट बाजींचे धाकटे जावई मरकत राव व त्याचा मित्र सोनू दळवी यांनी घातला .एक दिवस बाजी जेवणात गुंतले असल्याचे पाहून या उभयतांनी पाचशे लोकांच्या जमावानिशी बाजींच्या वाड्यावर छापा घातला. खासा जावई वाड्यावर चालून आल्याचे पाहून बाजी भरलेल्या ताटावरून उठले व प्रत्यक्ष जावयांशी दोन हात करून त्यांनी त्यास आस्मान दाखविले .मरकतरावाच्या पाठोपाठ सोनू दळव्यालाही त्यांनी यमसदनी धाडले. शहाजीराजे भोसले व बाजी यांचा पुरातन घरोबा होता. शहाजीराजांच्या राजकारणास बाजींचा नेहमीच पाठींबा असे.राजकारणात मुरार जगदेव रावांच्या स्वारीमुळे उध्वस्त झालेले पुणे नव्याने वसविण्याचा व पुणे प्रांतातील पुंडपाळेगार व शिरजोर वतनदार मंडळींना वठणीवर आणून त्यांना वश करवून घेण्याच्याकामी शिवरायांना बाजींची मोलाची मदत झाली होती. बाल शिवाजींच्या वतीने पुणे प्रांताचा कारभार पाहणाऱ्या दादोजी कोंडदेवांच्या अनेक निकाल पत्रावर बाजींची साक्ष आहे. शिवरायांच्या आश्वासनाने समाधान पावलेले बाजी बेलसर येथील फत्तेखानाच्या छावणीवर चालून गेले, पण सावध असलेल्या फत्तेखानाने बाजीचा पराभव करून त्यांना परतवून लावले. संतापलेल्या फत्तेखानाने पुरंदरवर चालून जाऊन अविरत मारा चालवला. शिवरायांचे सहकारी विजेच्या लोळाप्रमाणे शत्रू सैन्यावर तुटून पडले .गोदाजी जगतापांनी भाला मारून मुसे खानास जखमी केल्यानंतर खांद्यावर तलवारीचा जोरकस वार करून त्यांचे शरीर खांद्यापासून मध्यापर्यंत चिरत नेले .गोदाजींच्या या प्राणघातक वाऱामुळे मुसेखान जागच्या जागीच गतप्राण झाला .त्यामुळे विजापुरी फौज वाट दिसत तिकडे पळत सुटली. विजयोन्मादाने बेहोष झालेल्या मराठी फौजेने विजापुरी फौजेचा पाठलाग सुरू केला. यात 60 वर्षाचे बाजीही पाठलागात सामील झाले. सासवडजवळ पुन्हा एकदा युद्धाची चकमक उडाली.... आणि अचानक नियतीने घात केला. शत्रु सैनिकाचा एक घाव बाजींच्या वर्मी बसला व ते धरणीवर कोसळले, धारातीर्थी पडले! स्वराज्याच्या यज्ञवेदीत बाजींच्या रूपाने पहिली समिधा पडली! स्वराज्याच्या आरंभीच्या काळात शिवरायांच्या वर छत्रछाया धरणारा बाजीरुपी विशाल वटवृक्ष नियतीच्या क्रूर तडाख्याने आकस्मितरित्या उन्मळून पडला! बाजींच्या मृत्यूचे शिवरायांना अतीव दुःख झाले !अशा या "वीर बाजी पासलकर यांना आमचा मानाचा मुजरा "

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...