विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2020

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- २)

 

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- २)
स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजारामराजेंचा ११ वर्षाचा झंझावात आणि त्यासाठी केलेले नियोजन....
मागील भागामध्ये आपण रायगड ते जिंजीचा थरारक प्रवास अनुभवला. आणि जिंजीतून स्वराज्याच्या तिसर्या छत्रपतींचा झंझावात सुरू झाला. परंतु एक खंत कायम वाटते की, या अद्वितीय इतिहासाला इतिहासकार आणि मराठी माणूस न्याय देऊ शकला नाही.
चहोबाजूंनी स्वराज्यावर आलेले संकट:-
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीतून स्वराज्याची पुन्हा घडी बसवन्यास सुरवात केली. त्यावेळी स्वराज्याची अवस्था खूप बिकट होती. छत्रपती स्वराज्यापासून ८०० मैल दूर होते. स्वराज्याची राजधानी रायगड सहित वेगवेगळ्या ठिकाणी औरंजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या. वतनदारीच्या लालसेने कित्येक सरदार मोघलांकडे झुकले होते. स्थानिक लोकांची फंदफितुरी, आणि स्वराज्यावर आलेले दुष्काळी संकट यात राजाराम महाराजांची अग्निपरीक्षा सुरू होती. त्यात अष्टप्रधान मंडळ विस्कळीत झालेले होते. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. परंतु मोघालंविरुद्ध आघड्या उभरण्यासाठी व रयतेला मोघाली आणि दुष्काळी संकटातून बाहेर काढण्यासाठी खजिना पुरेसा नव्हता.
छत्रपती राजाराम महाराज या संकटा पुढे डगमगले नाहीत. ते अत्यंत पराक्रमी, शांत धीरगंभीर स्वभावाचे व तसेच मुत्सद्दी राजकरणी होते. आपल्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय, आखलेल्या मोहिमा, आघाड्या, तह, गनिमीकावा आणि मोघलांची लूट , यामुळे स्वराज्य गिळंकृत करायचे, या औरंगजेबाच्या स्वप्नाला, त्यांनी खीळखीळ करून टाकलं.
स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी:-
राजाराम महाराज जिंजी मध्ये पोहचताच त्यांनी राज्यकारभाराची विस्कळीत झालेली घडी व्यवस्थित बसविण्यास सुरवात केली. जिंजीत तख्त स्थापन करून राजाराम महाराजांनी जिंजीला स्वराज्याची राजधानी घोषित केले. या निर्णयामुळे औरंगजेबला पहिला धक्का बसला की, जरी रायगड मोघलांच्या ताब्यात आला तरी मराठ्यांचा राजा, त्यांचे तख्त शाबूत आहे.
अष्टप्रधान मंडळ नेमले:-
छत्रपती राजाराम महाराज जाणून होते, स्वराज्यावरचे हे संकट मोडून काढायचे असेल तर मात्तबर, निष्ठावान मंडळींची गरज आहे. आणि त्यांनी एक मजबूत फळी निर्माण केली
निळोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवे)
रामचंद्रपंत - हुकूमत-पन्हा (अमात्य)
संताजी घोरपडे – सेनापती,
धनाजी जाधव - सेनापती (संताजी घोरपडे नंतर सेनापति हे पद धनाजी जाधवरावांकडे आले)
महादजी गदाधर - सुमंत
शंकराजी नारायण - सचिव
रामचंद्र त्रिंबक पुंडे - मंत्री
श्रीकराचार्य – पंडितराव
निराजी रावजी – न्यायाधीश
अष्टप्रधानांशिवाय आणखी काही कर्त्या व्यक्तींना त्यांनी सरंजामे दिली.
प्रल्हाद निराजी - प्रतिनिधी,
तिमाजी पिंगळे - जिंजीची सुभेदारी
सुंदर बाळाजी - कुनिमेडूची सुभेदारी
परसोजी भोसले - ‘सेनासाहेबसुभाʼ परसोजी भोसले नागपूरकर यांना वऱ्हाडातील चौथाई व सरदेशमुखीचे वसुली अधिकार दिले;
खंडेराव दाभाडे -‘सेनाधुरंधरʼ हे पद व गुजरात, बागलाण प्रांतांचा सरंजाम दिला.
खंडो बल्लाळ - चिटणिशी कायम ठेवली.
सिधोजीराव नाईक निंबाळकर – सरलष्कर (गोदावरी तीरावरील भागाचा अम्मल)
नमाजी गायकवड – कोपळ्ळचा हवालदार
येसाजी मल्हार – कर्नाटक स्वारीचे उपसेनापती
मकाजी देवकाते – पंचहजारी सरदार
केशव रामन्ना – कर्नाटकचे सुभेदार
कान्होजी आंग्रे – आरमार प्रमुख
छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या राज्यकारभरास सुरवात केली. कर्नाटकातील वेगवेगळ्या ठाण्यांवर, किल्ल्यांवर विश्वासातील माणसांच्या नेमणुका केल्या. असे अनेक सेनानी राजाराम महाराजांनी एकत्र आणले. आणि जिंजीसारख्या दूर असलेल्या प्रदेशातून ओरंगजेबाविरुद्ध आघाड्या उघडल्या.
मावळ्यांच्या पराक्रमाचा मान सन्मान:-
छत्रपती राजाराम महाराजांनी मावळ्यांच्या पराक्रमाचा नेहमी योग्य किताब, पद, अतिरिकत्त हुद्दा, देऊन मान सन्मान केला. त्या संबधीचा औरंजेबाच्या मनात धडकी भरावनारा प्रसंग:
याच धामधुमीच्या वेळी एक धाडसी बेत आखण्यात आला. थेट औरंजेबाच्या छावणीवर हल्ला करायचा. कोरेगाव तुळपुरच्या जवळ मुघल छावणीवर संताजी घोरपडे यांनी आपले बंधू बहिर्जी आणि मोलोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांच्यासोबत हल्ला केला व त्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणले. हा फार मोठा पराक्रम होता. मराठे आजून संपले नाहीत. हेच औरंजेबला समजवन्यासाठीचा केलेला जबरदस्त प्रहार होता. या कामगिरीवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी किताब बहाल केले.
संताजी घोरपडे – मामलकत-मदार,
बहिर्जी घोरपडे – हिंदूराव,
मोलोजी घोरपडे – अमीर उल उमराव,
विठोजी चावण – हिम्मत बहाद्दर.
महाराष्ट्रात रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मावळातील मोगलांनी घेतलेले किल्ले परत जिंकून घेतले. त्यात पन्हाळा किल्ला देखील परत मिळवून घेतला. या महिमेत परशुराम त्रींबक प्रसिद्धीस आले. त्यांना छत्रपती राजरामराजेंनी ‘सुभालष्करʼ व ‘समशेरजंगʼ हे किताब दिला.
या सर्व घडमोडींचा परिणाम रयतेच्या व मावळ्यांच्या खचलेल्या मनावर झाला. एक नवीन उभारी मिळाली. मराठ्यांच्या तलवारी मुघलांच धूळधाण करण्यासाठी प्रेरित झाल्या.
तेवढ्यात स्वराज्यावर नवीन संकट आले जिंजीवर झुल्फिकारखानाने हल्ला केला आणि जिंजीला वेढा दिला. महाराज परत अडचणीत आले. पण ते शिवपुत्र होते. त्यांनी गनिमीकाव्याचा वापर करून ८ वर्ष किल्ला लढवला व स्वराज्यात आघाडी देखील सुरू ठेवल्या.
जर पुढील पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महारजांच्या जिंजीच्या वेढा आणि स्वराज्यातील आघाडी या बद्दल माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट करून कळवावे.
संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
व्याख्यान पराक्रमी मराठे (दुर्गमहर्षी प्रमोद मांडे)
शिवपुत्र राजाराम (डॉ. प्रमिला जरग)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...