विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 4 August 2020

यावनी आक्रमण: भाग - ७


यावनी आक्रमण: भाग - ७
postsaambhar ::Prashant Babanrao Lavate-Patil
__________________
जर आपण भाग- ६ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ७ वाचण्या आगोदर भाग- ६ नक्की वाचून घ्यावा. भाग- ६ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
सहाव्या भागात आपण घोरी घराण्याचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात पहिला. घोरी सलतनीतील शेवटचा सुलतान कैकुबाद याच्या विलासी वागणुकीचा फायदा घेत खल्जी सरदारांचा म्होरक्या 'जलालुद्दीन खल्जी' याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व त्याचे तुकडे करून यमुना नदीत फेकून दिले, आणि त्याच्या मुलासही मारून दिल्लीचे तक्त बळकवले. कैकुबादच्या मृत्यूने १२८८ साली गुलामवंशाचा शेवट झाला. १२०६ पासून ते १२८८ पर्यंतचा हा जवळजवळ ८२ वर्षांचा काळ आहे ज्याला मुस्लिम इतिहासकार 'घोरच्या सुलतानाचे गुलाम' असे म्हणतात.
१२८८ साली खल्जी घराण्याने दिल्लीची सत्ता हाती घेतली जी पुढे १३२० पर्यंत चालली. खल्जी हे मूळ पठाण मंडळी. अफगाणिस्थानात खल्ज म्हणून एक ठिकाण आहे तिथले हे मूळचे. खल्ज वरून त्यांना खल्जी किंवा खिलजी हे नाव प्राप्त झाले. बऱ्यापैकी ही लुटारू मंडळी होती. काही मंडळी कोणाच्यातरी चाकरीत राहत असत. घोरीच्या काळात, ब्लबनने यांना फौजेत भरती केले होते. मलिक नावाचा एक खल्जी सरदार बल्बनच्या काळात नावारूपास आला. कर्तृत्ववान सरदार होता तो. त्याचा मुलगा जलालुद्दीन. कैकुबाचा वजीर होता निजामुद्दीन, जो एक तुर्क होता. आणि तुर्कांच्या त्रासाला जनता कंटाळलेली होती. यासाठी लोकांनी यांना बाजूला करण्यासाठी जलालुद्दीनला मदत केली. यावेळी खल्जी मंडळी बंगाल प्रांतात होते. 'जलालुद्दीन खल्जी' याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली. जलालुद्दीन त्यावेळी ७० वर्षांचा होता. खल्जी मंडळींनी दिल्लीवर तीस एक वर्षे राज्य केले. या तीस वर्षात सहा सुलतान होऊन गेले, परंतु या सर्वांमध्ये एकच सुलतान होऊन गेला ज्याने वीस वर्षे राज्य केले ज्याचे नाव "अलाउद्दीन खल्जी".
पूर्ण पोस्ट वाचेपर्यंत डोक्यात प्रश्न नको म्हणून इथे काळ मांडतो.
१) जलालूद्दीन खल्जी (इ. स. १२८९ ते १२९५)
२) अलाउद्दीन खल्जी (इ. स. १२९६ ते १३१६)
३) मुबारिक खल्जी (इ. स. १३१६ ते १३२०)
थोडक्यात खल्जी मंडळींचा इतिहास आता आपण पाहू. यामध्ये अलाउद्दीनचा इतिहास तसा दांडगा आणि विशेष लक्ष देण्यासारखा आहे. का? ते आपण बघणारच आहोत.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
■ जलालूद्दीन खल्जी (इ. स. १२८९ ते १२९५-९६):
जलालुद्दीन खल्जी' याने ज्यावेळी दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली. जलालुद्दीन त्यावेळी ७० वर्षांचा होता. सुलतान होईपर्यंत हा माणूस अतिशय आक्रमक राहिला परंतु जसा तो सुलतान बनला तसा त्याच्यात व त्याच्या वागणुकीत अतिशय फरक पडला. त्याच्या वागणुकीत ममता आणि प्रेम वाढत गेले आणि त्याने कोणालाही कडक शासन देणे शक्यतो टाळले त्यामुळे लुटारूंचे चांगलेच फावले. तो हुशार, विद्वान आणि कवी लोकांना दरबारात आदराने वागवू लागला व त्यांना प्रतिष्टेचे स्थान देऊ लागला. परंतु खल्जी लोकांना हा त्याचा बदललेला स्वभाव काय पचेनासा झाला होता कारण मुळातच ही सगळी मंडळी क्रूर व आक्रमक स्वभावाची होती. जलालुद्दीनच्या अशा बदलेल्या स्वभावामुळे सलतनीचे नुकसान होणार असे दरबारी असलेल्या सरदारांना व इतर मंडळींना वाटू लागले होते. सिद्दीमौला नावाच्या एकाने सुलतानाला मारण्याचा बेत केला होता आणि हे ज्यावेळी जलालाउद्दीनला समजले त्यावेळी त्याने त्याला फाशी दिली गेली. जलालुद्दीनने माळवा, पंजाब अशा ठिकाणी स्वाऱ्याही केल्या. १२९२ साली मंगोलांनी ज्यावेळी पंजाबवर आक्रमण केले त्यावेळी स्वतः जलालुद्दीन लढाईमध्ये सामील झाला. पाच दिवस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर तळ ठोकून बसले होते आणि सहाव्या दिशी जोरात युद्ध झाले आणि मंगोलांचा पराभव झाला. या युद्धात विशेष पराक्रम केला तो त्याचा पुतण्या 'अलाउद्दीन खल्जी' याने. 'उत्कायखान' हा चंगेज खानाचा एक नातू ज्याने नंतर जलालुद्दीनच्या मुलीशी लग्न केले. उत्कायखानने आपले ३००० सैन्य दिल्लीस ठेवले ज्यांना राहण्यासाठी जलालुद्दीनने एक जागा नेमून दिली त्याला 'मोंगलपुरा' हे नाव दिले गेले. आज ही जागा 'मोगलपुरा' म्हणून ओळखली जाते.
शहाबुद्दीन मसूद हा जलालुद्दीनचा भाऊ ज्याला दोन मुले होती. पहिला अलाउद्दीन आणि दुसरा आल्ब्सबेग. अलाउद्दीनने मंगोलांना हरवून जो पराक्रम केला होता त्यामुळे पूर्ण दरबारात त्याचे वजन वाढले होते. या पराक्रमामुळे जलालुद्दीनने अलाउद्दीनला गंगा व यमुना या नद्यांच्या संगमाजवळ 'कुरा' हे ठिकाण आहे तिथला सुभेदार नेमले. १२९३ मध्ये अलाउद्दीनने माळव्यात पुन्हा स्वारी केली व अनेक ठिकाणे त्याने जिंकली म्हणून जलालुद्दीनने त्याला अयोध्याचा सुभाही दिला.
■ जलालुद्दीन व अलाउद्दीन:
अलाउद्दीन हा अतिशय हुशार व कपटी होता. सैनिकापासून ते सरदारापर्यंत त्याचा प्रवास हा अतिशय खडतर होता. संपूर्ण जगावर फक्त खलजींचे राज्य असावे असे त्याला नेहमी वाटायचे. दिल्लीचा सुलतान झाल्यावर त्याने स्वतःला 'सिकंदर-ए-सानी' (सानी म्हणजे 'द्वितीय' म्हणजे दुसरा सिकंदर) हा किताब लावून घेतला. स्वभावाने अतिशय आक्रमक व जिद्दी होता. एखादी गोष्ट जर का त्याच्या मनात आली तर कोणत्याही परिस्थिती ती पूर्णत्वास न्यायचाच. संजय भन्साळीच्या 'पद्मावत' सिनेमात याला अनुसरून एक डायलॉग आहे, 'अल्ल्हाने बनाई हुवी हर एक नायाब चीज पर सिर्फ अलाउद्दीनका हक हे'.
त्याचा हा स्वभाव म्हणजे जलालुद्दीनसाठी धोक्याची घंटाच होती. पुढे जाऊन अलाउद्दीन बंड करू शकतो अशी भीती कदाचित त्याच्या मनात असावीच. म्हणूनच कदाचित जलालुद्दीन स्वतःच्या मुलीचे लग्न अलाउद्दीनबरोबर लावून दिले होते. अलाउद्दीन पराक्रमी होताच आणि खल्जी मंडळींना जसा नेता पाहिजे तसाच तो होता त्यामुळे दरबारात तो प्रसिद्ध होता. दरबारात अनेकांना तोच सुलतान असावा असे वाटायचे. याला कारण म्हणजे जलालुद्दीनचा बदलेला स्वभाव आणि अलाउद्दीनचा आक्रमकपणा. जर खल्जी सलतनीच्या सीमा वाढवायच्या असतील तर अलाउद्दीनसारखा नेताच पाहिजे असे सर्वांना वाटत होते. अलाउद्दीनच्या या स्वभावामुळे जलालुद्दीनने त्याला नेहमीच दिल्लीपासून दूर ठेवले. इकडे अलाउद्दीनची नजर नेहमीच दिल्लीच्या तख्ताकडे लागली होती. त्याने भारतभर अनेक ठिकाणी आक्रमण करून भरपूर खजाना गोळा केला होता त्यामुळे त्याच्याकडे सैन्यही भरपूर होते. जलालुद्दीन व अलाउद्दीन म्हणजे दोघेही एकमेकांबद्दल कोणताही आदर नसलेली मंडळी होती. अलाउद्दीनला अचूक वेळ साधून जलालुद्दिनला संपवायचे होते आणि जलालुद्दिनला जमले तेवढे अलाउद्दीनला दिल्लीपासून दूर ठेवून त्याच्याकडून सलतनीचा जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा फायदा करवून घ्यायचा होता. पण या कपटनीतीच्या लढाईत जिंकला तो अलाउद्दीनच.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
■ जलालुद्दीनचा शेवट आणि अलाउद्दीन दिल्लीचा नवा सुलतान:
अलाउद्दीनला दिल्लीचा सुलतान व्ह्याचे होते आणि त्यासाठी त्याला दरबारातील सगळ्या मात्तबर मंडळींना स्वतःकडे घ्यायचे होते. दरबारातील अनेकांचा पाठिंबा हा अलाउद्दीनला होताच पण जे त्याच्या पाठीमागे नव्हते त्यांना लाच देऊन स्वतःकडे घायचे होते. याचे कारण असे की, स्वतः सुलतान झाल्यावर त्याला कोणतेही अंतर्गत वाद नको होते, आणि यासाठी अलाउद्दीनने पूर्ण तयारी करायचे ठरवले होते. त्याला आता अफाट संपत्ती जमा करायची होती. भिलसा येथे असताना अलाउद्दीनला दक्षिणेत देवगड (देवगिरी) नावाच्या शहराची माहिती मिळाली. हे शहर खूप श्रीमंत असून येथे असंख्य श्रीमंत लोक राहतात असे त्याला समजले. जर हे शहर लुटले तर प्रचंड खजाना मिळणार जो त्याला दिल्लीच्या तख्तावर बसण्यास निर्णायक ठरणार हे कळून चुकले आणि त्याने जलालुद्दीनकडे दक्षिणेत जाण्यासाठी परवानगी मागितली. काही इतिहासकार म्हणतात की जलालुद्दीनने त्याला परवानगी दिली नाही तरीही त्याने खोटे कारण सांगून दक्षिणेत आला. काही इतिहासकार म्हणतात की मावळ्यांच्या स्वारीवर जातो म्हणून अलाउद्दीन दक्षिणेत आला. काहीही असो, अलाउद्दीन दक्षिणेत आला हे खरे.
देवगडापर्यंतचा मार्ग खूप कठीण होता. नर्मदा ओलांडून महाराष्ट्रातून जंगली मार्गातून बिकट वाटेतून हा प्रवास होता. वाटेमध्ये असंख्य प्रकारची लोकं होती. त्याचा वाटेत त्रास होऊ शकतो किंवा अचानक छापे टाकून ते सर्व सैन्य कापू शकतात याची शंका अलाउद्दीनला होतीच. परंतु त्याला माहित होते की हिंदू लोक विनाकारण त्रास देत नाहीत. धर्माचे नियम ते मोडीत नाहीत. आपण जर कोणालाही कसलाही त्रास दिला नाही तर आपल्याला सुद्धा कसलाच त्रास होणार नाही हे अलाउद्दीन जाणून होता.आपला खरा मनसुबा काय आहे हे त्याने कोणालाच कळू दिला नव्हता. वाटेत कोणाचाही कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्याने एक अफवा सोडली की "मी माझा चुलता जलालुद्दीन याच्याशी भांडून त्याला सोडून आलो आहे आणि माझी जी काही फौज आहे तिच्यासोबत तेलंगणाच्या राजाकडे चाकरीस चाललो आहे". जवळ-जवळ ७०० मैलाचा प्रवास करून अलाउद्दीन दक्षिणेत उतरला तो थेट देवगिरीच्या दारात. काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की अलाउद्दीन दक्षिणेत आला आणि युद्धे झाली ती दोनच, पहिले म्हणजे विंध्य ओलांडल्यावर एलिचपूरमध्ये जे आजच्या खान्देशात आहे, आणि दुसरे म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या दारात म्हणजे सरळ राजधानीमध्ये.
यावेळी देवगिरीचा राजा होता रामदेवराया होता. अलाउद्दीन खल्जी आणि देवगिरीचे यादव यांच्या लढाईचे वर्णन अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे. अलाउद्दीन आपल्या राज्यावर आला आहे आणि त्याने लूट सुरु केली आहे हे रामदेवराय यांना माहीतच नव्हते. शहराबाहेर ज्यावेळी ते देवदर्शनास गेले होते त्यावेळी त्यांना अलाउद्दीन आल्याची बातमी लागली. देवगरीचे गुप्तखाते नेमके होते का नाही हा प्रश्न इथे नक्कीच उभा राहतो, कारण ७-८ हजाराची एक फौज आपल्या राज्यावर येत आहे याची कसलीच बातमी राजधानीत आली नाही. अलाउद्दीनचा मनसुबा हा फक्त लुटीचा होता आणि त्याला लुटीतून जास्तीतजास्त खजाना मिळवायचा होता. त्याने शहरामध्ये जबरदस्त लूट सुरु केली. अतिशय थोडके सैन्य घेऊन तो आला होता. काही इतिहासकारांच्या मते तो ८००० सैन्य घेऊन आला होता आणि काही इतिहासकारांच्या मते तो ४००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन आला होता. अलाउद्दीनने देवगिरीला वेढा दिला होता आणि काही सैनिक शहरात धुमाकूळ घालून लूटमार करत होते. दुर्दैव म्हणजे देवगिरीला एकच दरवाजा असल्याने अलाउद्दीनने गडाची श्वासनलिकाच दाबून टाकली होती. त्यामुळे गडावर रसद पोहचवणे हे अशक्य होऊन बसले होते.
देवगिरीच्या सैन्यांपूढे अलाउद्दीनचे सैन्य काहीच नव्हते, पण दुर्दैवाने रामदेवरायचा मुलगा शंकरदेवराय हा बरेच सैन्य घेऊन दक्षिणेत एका मोहिमेवर गेला होता (काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की शंकरदेवराय आपल्या बहुतांश सैन्यासह यात्रेला गेला होता). ज्यावेळी रामदेवरायाला अलाउद्दीनची खबर मिळाली त्यावेळी त्याने शहरातून काही माणसं जमा केली आणि जे काही नोकर चाकर होते त्यांची जमवाजमव करून तो अलाउद्दीनशी लढायला गेला पण जास्त काळ त्याचा टिकाव लागला नाही आणि पुन्हा तो गडावर परत आला. रामदेवरायाला वाटले की आता जोपर्यंत आपला मुलगा येत नाही तोपर्यंत आपणास काहीच करता येणार नाही. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची वाट पाहण्याचे ठरवले. इकडे अलाउद्दीनच्या सैन्याने शहरात जाळपोळ सुरु केली. लोकांनी त्यांचा खजाना व पैसा कुठे कुठे लपवून ठेवला आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांवर अमानुष अत्याचार सुरु केले. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले. असंख्य पुरुषांच्या कत्तली केल्या. या सर्व बातम्या रामदेवरायाला गडावर पोचत होत्या परंतु त्याच्यापुढे हे सर्व सहन करण्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग नव्हता.
रामदेवरायापुढे मोठे संकट उभे राहिले ज्यावेळी त्याला समजले की गडावर जो धान्यसाठा आहे त्यामध्ये धान्य नसून ती मिठाची पोती आहेत. दुसऱ्याबाजूला अलाउद्दीनने एक अफवा पसरवली की, मी फक्त मोजके सैन्य घेऊन येथे आलो आहे, बादशहाची दुसरी वीस हजाराची फौज पाठीमागून येत आहे. या बातमीमुळे रामदेवरायाला अलाउद्दीनपुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याने अलाउद्दीनशी तह केला.
या तहामध्ये अफाट खंडणी रामदेवरायाला त्याला द्यावी लागली. नेमकी ही खंडणी किती होती?
रियासतकार म्हणतात "... त्याने (रामदेवरायाने) पुष्कळ द्रव्य देऊन अलाउद्दीनशी तह केला." नेमके किती हे रियासतकार सांगत नाहीत.
विजयराव देशमुख म्हणतात ..." तहानुसार ५० मन सोने, अगणित हिरेमोती व लुटीत जमा केलेली सर्व रक्कम अलाउद्दीनला द्यायचे ठरले."
डॉ. दुलारी कुरेशी यांच्या मते, या तहामध्ये अलाउद्दीनला ६ मण सोनं, ७ मण मोती, २ मण हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान खडे, १००० मण चांदी आणि ४००० गज रेशमी कापड मिळालं.
इतिहासकारांची (सर्वच इतिहासकारांची यावरची मते इथे मांडणे शक्य नसल्याने फक्त माहितीसाठी म्हणून दोन-तीन इतिहासकारांची मते मांडली आहेत) जरी वेगवेगळी मते असली तरी तहामध्ये अलाउद्दीनला मिळालेली खंडणी ही नक्कीच बलाढ्य होती हे दिसून येते. तह झाला, तहानुसार जी काही खंडणी ठरलेली ती अलाउद्दीनला मिळाली आणि त्याने परत उत्तरेत निघायचा निर्णय घेतला. तेवढ्यात रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय मोहिमेवरून परत आला. ज्यावेळी त्याच्या अनुपस्थित जे काही देवगिरीमध्ये घडले ते कळाले त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इकडे रामदेवरायाने त्याला कळवले की,
"अलाउद्दीनशी तह झालेला आहे आणि ठरलेली खंडणी घेऊन तो परत चालला आहे आता तू त्याच्याशी युद्ध करू नको".
पण वडिलांचा हा सल्ला त्याने ऐकला नाही आणि तो अलाउद्दीनवर चालून गेला. दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले. शंकरदेवरायांनी इथे खूप पराक्रम गाजवला. अलाउद्दीनचा पराभव निश्चित होता आणि जे काही त्याने लुटले होती आणि खंडणीच्या स्वरूपात रामदेवरायांकडून घेतले होते ते परत मिळणार असे वाटत होते. शंकरदेवरायाच्या मदतीला किल्ल्यातून काही सैनिक एका सरदाराच्या नेतृत्वाखाली आले (या सरदाराचे नाव शंकरदेवा असे सांगितले जाते). त्यांच्या पायाने उडालेली धूळ पाहून शंकरदेवरायाला वाटले की अलाउद्दीनची जी काही नव्या दमाची वीस हजाराची सेना पाठीमागून येणार होती ती आली आणि यामध्ये सर्व गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा खल्जी सेनेला झाला आणि जिंकत आलेली लढाई शंकरदेवराय हारला. शंकरदेवरायाने जो काही खजिना त्याच्या मोहिमेतून लुटून आणला होता तो ही अलाउद्दीनने लुटला. यानंतर अलाउद्दीनने शंकरदेवरायाकडे आणखीन खंडणीची मागणी केली. विजयराव देशमुख सांगतात, की अलाउद्दीनने शंकरदेवरायाकडे ६० मण सोने, २ मण हिरे, १०० मण चांदी आणि ४००० गज रेशमी कापड एवढी मागणी केली. शिवाय, एलिचपूर परगणा खर्चासाठी मागून घेतला व दरवर्षी खंडणी पाठवण्याचे रामदेवरायाकडून कबूल करून घेतले. रामदेवरायाकडे हे मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
दुर्दैव असे की, या घटनेच्या काही दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली होती, तिथले काही कठोर कडवट अनुभव घेऊन लोकांना ते सांगितले. तरीही रयतेसह राजा गाफील राहिला आणि दक्षिणेत सुलतानांचा अमल सुरु झाला. पुढे जाऊन रामदेवरायाचा मृत्यू झळा, शंकरदेवरायाने खंडणी देणे बंद केले आणि पुन्हा अलाउद्दीनचा जवळचा सरदार मलिक कफूर देवगिरीवर चालून आला. शंकरदेवरायाचाही मृत्यू झाला. देवगिरीचे राज्य जवळपास संपले होते परंतु रामदेवरायाचा जावई हरपालदेवराय उभा राहिला परंतु तो ही खलजींच्या सेनेपुढे टिकला नाही. रामदेवरायानंतरचा इतिहास खूप मोठा आहे, हरपालदेवराय ज्यावेळी मृत्यू पावला त्यावेळी अलाउद्दीन हयात नव्हता त्याचा मुलगा गादीवर बसला होता ज्याने हरपालदेवरायाला देवगिरी किल्ल्यातच जिवंतपणे त्याची कातडी सोलून काढायची आज्ञा दिली होती.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
असो... हा शेवटचा भाग मी अगदी थोडक्यात मांडला आहे. इथे एक गोष्ट आहे जिथे आपल्याला लक्ष दिलेच पाहिजे. ती गोष्ट म्हणजे,
"अलाउद्दीन रामदेवरायची मुलगी घेऊन गेला की नाही ?"
आजवर अनेकवेळा सांगितले गेले की अलाउद्दीन रामदेवरायची मुलगी घेऊन गेला आणि त्याने तिला आपल्या जनानखान्यात ठेवले. हे खरे आहे की खोटे यावर ठामपणे काहीच सांगता येत नाही, परंतु इतिहासकारांची विविध मते समजवून घेतली तर हे खोटे आहे असेच म्हणावे लागेल. वाचकांनी आपापली मते ठरवावीत. माझे वयक्तिक मत आहे की, अलाउद्दीनने रामदेवरायची मुलगी नेली नाही. या विषयावर आपण थोडी चर्चा करू ते ही वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मांडणीनुसार.
रियासतकारांनी यावर कोणतेही भाष्य केलेले दिसत नाही. विजयराव देशमुखांच्या मते, हे खरे नाही. रामदेवरायाला तीन मुले व एक मुलगी होती. शंकरदेव, बल्लाळदेव आणि बिंबदेव अशी तीन मुले होती. मुलीचा विवाह हा हरपालदेवशी झाला होता. हरपालदेवचा मृत्यू हा अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर झाला आहे. समकालीन वाड्मयात कुठेही रामदेवरायाने आपली मुलगी दिल्याचा उल्लेख नाही. तसेच समकालीन अरब इतिहासकार अमीर खुसरू व बरनी हे देखील असा उल्लेख करत नाहीत. रशिदुद्दिन मात्र रामदेवरायाने मुलगी दिल्याचा उल्लेख करतो मात्र या स्वारीची हकीकत याने कुठेच मांडली नाही, कदाचित गुजराथच्या राजकन्येमध्ये आणि रामदेवरायच्या मुलीमध्ये याचा गोंधळ झालेला असावा.
आता, गुजराथच्या राजकन्येचा गोंधळ नेमका काय आहे?
जलालुद्दिनला मारून ज्यावेळी अलाउद्दीन सुलतान झाला त्यावेळी त्याने पहिली स्वारी गुजराथवर केली. त्यावेळी त्या प्रांताचे रखवालदार होते राजे करणराय. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवले होते. या दोघांनी करणराय यांचा सपाटून पराभव केला. अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं. इतिहासकारांनी लिहिलं आहे की अलाउद्दीन हा कमला देवीवर खूप प्रेम करायचा. म्हणूनच जेव्हा कमला देवीला आपल्या मुलीची आठवण आली, तेव्हा अलाउद्दीननं ताबडतोब उलूग खान आणि मलिक कफूर यांना देबाला देवीला कुठूनही शोधून आणायला सांगितलं. इकडे रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय याला कमळादेवीच्या मुलीबरोबर लग्न करायचे होते ज्याला रामदेवरायांनी विरोध केला. शेवटी, करणराय यांच्या परवानगीने आपला शंकरदेवरायाने आपल्या भावाला देबाला देवीला आणण्यासाठी पाठवले. दरम्यान, वेरूळ लेण्यांच्या परिसरात उलूग खान आणि मलिक कफूर यांची यादवांच्या सेनेशी गाठ पडली आणि देबाला देवीला पकडून दिल्लीला नेण्यात आले. अलाउद्दीनने आपल्या मुलाशी म्हणजे खिजरशी देबालाचे लग्न लावून दिले.या घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही. कदाचित देबाला देवीलाच काही इतिहासकारांनी रामदेवरायची मुलगी समजले असावे.
तर एकंदरीत अलाउद्दीन आणि देवगिरीचा इतिहास हा असा आहे ज्यामध्ये अनेक इतिहासकारांची अनेक मतं आहेत. यादवांचे राज्य संपण्याची अनेक कारणे आहेत त्याचबरोबर अलाउद्दीनचा कपटीपणाही तेवढाच महत्वाचा आहे. अवघ्या २०० वर्षांची परंपरा असलेले देवगिरीचे वैभवशाली साम्राज्य, अलाउद्दीन, जो हे राज्य संपवण्याच्या हेतूने आला नव्हताच त्याचा हेतू फक्त लूट करून संपत्ती मिळवायचा होता, असे राज्य अवघ्या १५-२० दिवसात पहिल्याच दणक्यात कोसळले. अगणित संपत्ती आणि मोठा विजय मिळवून अलाउद्दीन कोरा येथे परतला. तो सरळ दिल्लीला न जाता कोरा येथे थांबला आणि इथेच त्याने बादशहाला म्हणजे जलालुद्दिनला संपवायचा बेत आखला. जलालुद्दीन त्याला भेटायला येणार हे त्याला नक्की माहित होते आणि जलालुद्दीन अतिशय मोजक्या सैन्यानिशी तेथे आला. अलाउद्दीन आणि जलालुद्दीन यांच्या भेटीदरम्यानच लपून बलेल्या मारेकऱ्याने जलालुद्दीनवर तलवारीचे असंख्य वार करून त्याला मारून टाकले. त्याचे शीर कापून भाल्याच्या टोकावर टोचून संपूर्ण शहरात फिरवले.
~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~
इथून आता अलाउद्दीनची सुलतान म्हणून कारकीर्द सुरु होते जी पुढचे २० वर्षे चालते. या एका भागात हे सर्व मांडणे शक्य नाही त्यामुळे खल्जी घराण्याचा इतिहास आपण पुढच्या अजून एक-दोन भागात पाहू.
क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...