विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 August 2020

यावनी आक्रमण: भाग - ८






यावनी आक्रमण: भाग - ८
__________________
जर आपण भाग- ७ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ८ वाचण्या आगोदर भाग- ७ नक्की वाचून घ्यावा. भाग- ७ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
७व्या भागात आपण पाहिले की खल्जी घराण्याची सत्ता कशी भारतात अधिकृतपणे सुरू झाली. दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्याआधी बंगालमध्ये खल्जी मंडळींनी बंड करून वेगळे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले होते. जलालूद्दीन खल्जी हा ७० वर्षाचा म्हातारा दिल्लीच्या गादीवर बसला व स्वतःला त्याने हिंदुस्थानचा सुलतान म्हणून घोषित केले. त्याची कारकीर्द आपण पाठीमागच्या भागात पहिलीच. अलाउद्दीन खल्जीने दक्षिणेत केलेले आक्रमण आणि यादवांचा केलेला पाडावही आपण पाठीमागच्या भागात पाहिला. ज्यामध्ये आपण उत्तरकालीन इतिहासकारांनी मांडलेल्या इतिहासाच्या आधारे चर्चा केली. अलाउद्दीन आणि रामदेवराय (रामचंद्रदेव) यांच्या युध्दाबद्दल अनेक लेखकांचे व अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत, म्हणून या प्रकरणावर अजून अभ्यास करून माहिती उपलब्द करून घेण्याच्या प्रयत्नात मी आहे. उत्तरकालीन इतिहासकारांनी त्यांच्या अभ्यासानुसार आपापली मते मांडलीच आहेत पण त्याच बरोबर काही समकालीन मुसलमान इतिहासकार आहेत ज्यांनी अलाउद्दीन आणि यादवांच्या युद्धाबद्दल नोंदी करून ठेवल्या आहेत ज्या मला इथे मांडाव्यात असे वाटले. कारण असे की, अलाउद्दीनच्या या स्वारीमुळे दक्षिणेत असलेले यादवांचे एवढे बलाढ्य राज्य अगदी एका पत्याच्या पानाच्या घरासारखे कसे काय कोलमडू शकते? ... नक्की युद्ध झाले कसे आणि युद्धामध्ये नेमके काय झाले ? असे अनेक प्रश्न आहेत जे एकाबाजूने संभ्रमात टाकतात आणि दुसऱ्या बाजूने विचार करायला लावतात. त्यामुळे समकालीन मुस्लिम इतिहासकार याबद्दल काय म्हणतायत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. नक्कीच, त्यानंतर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे आहे किंवा त्यातुन तर्क शोधून अलाउद्दीन आणि देवगिरी या प्रकरणावर आपापले निष्कर्ष ठरवायचे आहेत.
(इतिहासातील कोणत्याही घटनेचे निष्कर्ष एकदा मांडले की ते कायमस्वरूपी पक्के नसतात. भविष्यात अनेक संशोधने होतील ज्यातून नवीन माहिती उजेडात येऊन जुनी माहिती खरी किंवा खोटी ठरू शकते☺️).
या युद्धाची कारणीमीमांसा करताना अनेकांनी आपापली मते मंडळी आहेत. अनेकांनी यामध्ये अलाउद्दीनचा आक्रमकपणा सांगताना त्याच्या युद्धकौशल्यांचा आणि कपटीपणाचा देखील दाखला दिला. यादवांच्याबाबतीत बोलताना अनेकांनी त्यांच्या असावधानतेवर आणि त्यांच्या हेरखात्यावर प्रश्न उभे केले. यादवांच्या पराभवाची अनेक कारणे अभ्यासकांनी मांडली आहेत. नक्कीच, यामध्ये मतांतरे असू शकतात कारण कारणीमीमांसा करत असताना अभ्यासक जो तर्क मांडतो तो त्याच्या अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनावर आणि पद्धतीवर अवलंबून असतो. परंतु, यादवांच्या पराभवाची करणे देत असताना समकालीन इतिहासकारांनी काय लिहिले आहे यावर नजर टाकणे गरजेचे आहे कारण ते इतिहासाच्या खूप जवळचे आहे.
दक्षिण भारतात अनेक हिंदू राजांनी युद्धामध्ये हत्तींना प्राधान्य दिले. यादवांच्या सैन्यामध्ये हत्तीची संख्या भरपूर असायची. हत्तींना त्यांच्या सैन्यात भरपूर महत्व असायचे हे त्यांच्या अनेक शिलालेखांतून दिसून येते. हत्तीच्या सोंडेमध्ये विविधप्रकाराची हत्यारे बांधून त्यांचा युद्धामध्ये वापर केला जाई. हत्तीच्या मागे पायदळ असायचे त्यामुळे युद्धाची संपूर्ण मदार ही हत्तींवर असायची. हत्तींना यासाठी प्रशिक्षण दिले जाई. या युद्धशैलीमुळे सैन्यांच्या हालचाली मंद होत असत. याउलट, जे काही अरब व तुर्क मंडळींनी आक्रमणे केली त्यामध्ये त्यांनी घोड्यांचा वापर जास्त केला. यामुळे अरबांच्या व तुर्कांच्या युद्धभूमीवरच्या हालचाली अतिशय जोरदार असायच्या. कदाचित या फरकामुळे आपल्या लोकांना अरब आणि तुर्क हे जास्त आक्रमक आणि त्यांची युद्धनीती प्रगतशील वाटली असावी आणि मानसिक दडपण घेऊन आपल्या सैन्यांची तारांबळ उडाली असावी. युद्धामध्ये घोड्यांचा वापर करून सैन्यांची हालचाल वेगवान करू शकतो यावर त्याकाळच्या आपल्या राजांनी जास्त विचार केला नसावा.
इथे आपण समकालीन काही इतिहासकार मंडळींनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना कोणत्या नोंदी केल्या आहेत या पाहू. देवगिरी युद्धाबद्दल लगत अशा नोंदी मिळत नाहीत परंतु काही घटनांवर विविध नोंदी मिळतात ज्यावरून एकंदरीत परिस्थिती समजू शकते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रख्यात जगप्रवासी मार्कोपोलो यांनी याबद्दल सविस्तरपणे लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, "भारतीय राजे एकेका घोड्याला ५०० सागी (म्हणजे एक प्रकारचे सुवर्ण नाणे) देऊन विकत घेत परंतु त्यांची निगा कशी राखावी हे त्यांना माहित नसे. ते घोड्यांना उत्कृष्ट आहार देऊन ४० दिवसांपर्यंत ठाणबंद करून ठेवत असत. त्यामुळे घोडे थोडे पुष्ट होत. पण चपळ होत नसत. त्यांना घोड्यांचा व्यायाम, औषधोपचार याबद्दल काहीच माहित नसे. यामुळे घोडे लवकर थकत व ते युद्धासाठी निकामी होत असत. दरवर्षी हे राजे नवीन घोडे विकत घेत असत व त्यांचा यामध्ये अमाप पैसा खर्च होत असे". मार्कोपोलो पुढे लिहितो, की "... अरब व्यापारी भारतीयांना घोड्यांच्या आजराबद्दल आणि औषोपचाराबद्दल काहीच माहिती देत नसत."
जियाउद्दीन बरनी हा एक समकालीन इतिहासकार ज्याने अलाउद्दीनच्या देवगिरीच्या स्वारीबद्दल बऱ्यापैकी नोंदी करून ठेवलेल्या आहेत. अलाउद्दीनने नेमके हे आक्रमण कधी केले याबद्दल बरनी माहिती देत नाही परंतु प्रख्यात कवी अमीर खुसरो मात्र याबद्दल नोंदी सांगतो.
ता. १९ रबिऊलआखर ६९५ हिजरी (ता. २५ फेब्रुवारी १२९६ इ.स.) रोजी अलाउद्दीनने कडा-माणिकपूर सोडले. आणि ता. २८ रजब ६९५ हिजरी (ता. १ जून १२९६) रोजी अलाउद्दीन कडा-माणिकपूरला परतला.
वस्सफ यबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्यापैकी एक म्हणजे, "अलाउद्दीनने देवगिरीवर आक्रमण करण्यापूर्वी देवगिरीबद्दल आणि सैन्यांच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल आपल्या हेरांकडून माहिती काढून घेतली होती. रामदेवरायचे बरेचशे सैन्य देवगिरीमध्ये नाही याची त्याने खात्री करून घेतली होती.
अलाउद्दीनचा पहिला तळ एलिचपूर येथे पडला. याबद्दलचे वर्णन करताना बरनी सांगतो की, "विंध्य ओलांडून अलाउद्दीनने एलिचपूर येथी आपला तळ ठोकला व तो घाटलाजौरच्या (घाटी लाजुरा) मार्गाने देवगिरीकडे निघाला. घाटी लाजुरा (घाट लाजूर) हे ठिकाण देवगिरीच्या पश्चिमेस बारा मैलांवर आहे असेही तो सांगतो. देवगिरीजवळ पश्चिमेस लासूर नावाचे गाव आहे आणि ते मैदानावर असून घाट नाही. बुलढाणा भागातून देवगिरीकडे येताना राजुरा घाट लागतो. परंतु हा देवगिरीच्या पूर्वेस आहे. कदाचित याची माहिती फरिश्ता (तारिखे फरिश्ताचा लेखक) यास असावी.
आता इथून पुढचा भाग व समकालीन नोंदी महत्वाच्या आहेत.
* अलाउद्दीन देवगिरीजवळ आला आहे ही बातमी 'कान्हा' नामक एका सामंताने रामदेवरायास सांगितले पण याकडे रामदेवरायाने दुर्लक्ष केले असे बरनी सांगतो.
* 'एसामी इब्ते बत्तुता' सांगतो की 'कान्हा'ने जमेल तेवढे सैन्य गोळा करून लाजोरा घाटात अलाउद्दीनला अडवायला उभा राहिला पण त्याचा टिकाव लागला नाही. तो स्वतः व त्याच्या कुटुंबातील दोन स्त्रिया (स्त्रियांची नावे तो सांगत नाही) तर वाघिणीसारख्या लढल्या परंतु कान्हाचा पराभव झाला आणि अलाउद्दीन देवगिरीकडे निघाला.
आता, इथंपर्यंत आपणास एवढे समजू शकते की नेमके अलाउद्दीन देवगिरीकडे कोणत्या तारखेला निघाला, एलिचपूर नंतर तो कोणत्या मार्गाने देवगिरीकडे आला आणि तो आल्याची वार्ता सामंताने दिली आणि बत्तुताच्या म्हणण्यानुसार त्याअगोदर सामंतांचे आणि अलाउद्दीनचे युद्ध झाले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■आता प्रश्न उरतो तो "देवगिरीमध्ये नेमके काय घडले?"
या संपूर्ण प्रकरणावर लगत अशी माहिती एकही मुस्लिम इतिहासकार देत नाहीत. एकतर ते मौन पाळतात किंवा वेळ मारून नेतात. बरनी, खुसरो, बत्तुता, फरिश्ता यापैकी जर अलाउद्दीन आणि देवगिरी संदर्भात बोलायचे झाले तर खुसरो हा सर्वात आधीचा लेखक. त्याचा ग्रंथ 'अनाई' हा इ.स. १३२० च्या आसपासचा असावा, कारण १३२५ च्या दरम्यान खुसरो हा मरण पावला होता. अलाउद्दीनच्या या पहिल्या आक्रमणात नेमके काय घडले याबद्दल तो काहीच सांगत नाही.
'बरनी' तर अलाउद्दीन आणि रामदेवराय यांच्या युद्धाचा कोणताच प्रसंग सांगत नाही. याउलट तो म्हणतो, अलाउद्दीन देवगिरीस आला तेव्हा रामदेवराय आपले सैन्य व कुटुंबियांना घेऊन दूर कुठेतरी गेला होता. त्याला अलाउद्दीनची बातमी लागताच कान्हा या सामंताला जमेल तेवढे सैन्य घेऊन लाजौरा घाटात अलाउद्दीनला अडवण्यासाठी पाठवले. या युद्धाचे नेतृत्व कान्हाने केले होते. मराठ्यांनी तुर्कांचे (लेखकाला इथे कदाचित अलाउद्दीनचे नाव असे म्हणायचे असेल) नावही यापूर्वी ऐकले नव्हते. बरनी पुढे म्हणतो की अलाउद्दीनने पहिल्या दिवशी तीस हत्ती व एक हजार घोडे जिंकले आणि नंतर रामदेवराय अलाउद्दीनास शरण आला.
'एसामी इब्ते बत्तुता' या युद्धाचे वर्णन बऱ्यापैकी करतो. तो म्हणतो, "तुर्कांनी कान्हा याचा पराभव करून देवगिरीपर्यंत त्याचा पाठलाग केला. रामदेवरायाचा मुलगा भिल्लम (सहावा) हा सैन्य घेऊन दूर देशी गेला होता. गडावर सैन्य नसल्याने रामदेवरायाला फार वाईट वाटले. तुर्कांनी देवगिरीला वेढा दिला. रामदेवरायाने अलाउद्दीनास संपत्ती देऊन त्याच्याशी तह केला. इकडे भिल्लम परतल्यावर फारच आवेशाने तो तुर्कांवर तुटून पडला. रामदेवरायाने त्याला समजावून गप्प बसवले. रामदेवरायाने आपली मुलगी अलाउद्दीनास दिली. रामदेवरायाने अलाउद्दीनास आपला पुत्र म्हंटले व अलाउद्दीनाने रामदेवरायास बाप म्हंटले. संपत्ती घेऊन अलाउद्दीन परत फिरला.
आता उरला 'फरिश्ता', या बंड्याने अलाउद्दीनच्या पहिल्या आक्रमणानंतर तीनशे वर्षांनी त्याचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे कदाचित त्याने जिथे गॅप दिसेल तिथे स्वतःचे तर्क लावून लिखाण केले असावे असे वाटते. 'फरिश्ता' म्हणतो, "अलाउद्दीनने असा भास निर्माण केला की, त्याच्या मदतीसाठी आणखीन प्रचंड सैन्य येत आहे. त्यामुळे राजा घाबरला आणि त्याने अलाउद्दीनास ५० मन सोने, रत्ने आदी देऊन तह केला. त्याचा पुत्र शंकरदेवराय सैन्य घेऊन परतला. रामदेवरायाने त्याला शांत बसण्यास सांगितले परंतु त्याने मुस्लिम सैन्यावर हल्ला केला. पण त्याचा पराभव झाला. आता अलाउद्दीनने ६० मन सोने, २ मन मोती, १०० मन रूपे व ४००० रेशमी वस्त्रे लुटली व एलिचपूर प्रांत आपल्या राज्यास जोडला (इथे एक विचार झाला पाहिजे की, खल्जी मंडळींचे दक्षिणेत नेमके कुठेपर्यंत राज्य होते जेणेकरून हा एलिचपूर अलाउद्दीनने आपल्या राज्यास जोडले असे लिहिले).
वरती आपण पाहिले की विवीध मुस्लिम लेखकांनी या युद्धाचे वर्णन कसे केले आहे ते. पण यामध्ये फरिश्ताने केलेले वर्णन आजवरच्या बऱ्याच इतिहासकारांनी उचलून धरले कारण ते जरा रंगतदार वाटते. आणि फरिश्ताने केलेल्या वर्णनाला धरून आजवर अनेक इतिहासकारांनी यादवांचा दारुण पराभव कसा झाला हे सांगण्यास हायगय केली नाही. हे करत असताना फरिश्ताने त्याचा ग्रंथ या घटनेच्या ३०० वर्षानंतर लिहिला आहे व तो किती विश्वसनीय धरावा याबद्दल किंचितही विचार केला गेलेला दिसत नाही. याला अनुसरून श्री. द. ग. गोडसे यांनी लिहिले आहे की, "अलाउद्दीनने यादव सम्राटांची संपूर्ण देवगिरी लुटून ६०० मन सोने, ७ मन मोती, १००० मन रूपे व ४००० रेशमी वस्त्रे एवढी अफाट संपत्ती नेली."
एकंदरीत जर तत्कालीन लेखकांनी केलेल्या नोंदींचा विचार केला तर पहिल्याच आक्रमणात रामदेवरायांचा पराभव होऊन देवगिरीचे राज्य पडले असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण,
१) खुसरो, बरनी, एसामी हे समकालीन इतिहासकार आहेत जे या युद्धाचे असे कोणतेही वर्णन करत नाहीत जेणेकरून देवगिरीचे राज्य पूर्णपणे उद्वस्त झाले असे म्हणता येईल. जर का या युद्धाचे गांभीर्य एवढे महत्वाचे असते किंवा हे युद्ध एवढे निर्णायक असते तर याच्या नोंदी यांनी नक्कीच केल्या असत्या.
२) जी काही प्रचंड प्रमाणात केलेली लूट आज सांगितली जाते त्याचे वर्णन फरिश्ताने त्याच्या ग्रंथात केले आहे जो या घटनेनंतर ३०० वर्षांनी लिहिला आहे.
३) अलाउद्दीनशी लढणाऱ्या रामदेवरायाच्या पुत्राचे नाव कोणी भिल्लम सांगते तर कोणी शंकरदेवराय सांगते. रामदेवरायाच्या पुत्राचे आणि अलाउद्दीनचे युद्ध झाले असे एकही समकालीन इतिहासकार सांगत नाही.
४) मग नक्की देवगिरीच्या दारात युद्ध झाले का? की मग अलाउद्दीन एलिचपूर व इतर भाग लुटून परत गेला? असे प्रश्न उभे राहतात.
५) शंकरदेवरायाला एकच मुलगी होती जिचा पती हरपालदेवराय होता. त्यामुळे रामदेवरायाने आपली मुलगी अलाउद्दीनला दिली ही सरळ सरळ एक थाप वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ देवगिरीवरील दुसरे आक्रमण:
अलाउद्दीनास उत्तरेत राजपूत व इतर राजसत्तेंशी युद्ध करण्यासाठी खजिन्याची गरज पडायची, त्यावेळी त्याने देवगिरी, वरंगळ अशा राज्यांवर वक्रदृष्टी टाकली. १३०७ साली त्याने देवगिरीवर दुसरे आक्रमण केले. या वेळी सुद्धा मुस्लिम इतिहासकार वेगवेगळी माहिती देतात.
'खुसरो' लिहितो, "... रामदेवरायाने मांडलिकत्व झुगारून टाकल्यामुळे मलिक नायब बारबक याच्या नेतृत्वाखाली ३०,००० घोडेस्वार असलेली सेना त्याच्याविरुद्ध पाठवली.ते देवगिरी येथे १९ रमजान ७०६ अ हिजरी (मार्च १३०७) रोजी पोचले. यादवांचा पराभव झाला. त्याला (रामदेवरायाला) एक लालछत्र देऊन सन्मानपूर्वक वागणूक देऊन सोडले."
'बरनी' लिहितो, "अलाउद्दीनने सर्व आघाड्यांवरचे सैन्य एकत्र करून "मलिकनायब काफूर हजारदिनारी" याच्या नेतृत्वाखाली आणि बरोबर लालछत्र देऊन देवगिरीला पाठवले. बरोबर ख्वाजा हाजी हाही होता. काफूरने यादवांचा प्रदेश लुटून जाळून टाकला. रामदेवरायाला व त्याच्या पुत्राला पकडून दिल्लीस नेले. अलाउद्दीनाने रामदेवरायास सन्मानाने वागवले व एक लाख टंक (एक प्रकारचे चांदीचे नाणे) व रायरायान ही पदवी देऊन परत पाठवले.
'एसामी' म्हणतो की, "आपला मुलगा माझ्याविरुद्ध कारस्थाने करतो, त्याला शासन करा." असा निरोप रामदेवरायाने अलाउद्दीनास दिला. आणि यामुळेच अलाउद्दीनाने काफूराला देवगिरीवर पाठवले. अलाउद्दीनाने रामदेवरायास 'नवसारी' प्रांत दिला. फरिश्ताही याच मताचा आहे.
एकंदरीत पाहिले तर इथे सुद्धा खूप विसंगती आहे. नवसारी येथे एक शिलालेख सापडला असून तो विक्रम संवतचा आहे (इ.स. १३०२). ज्यामध्ये रामदेवरायाला 'महाराजाधिराज' अशी पदवी आहे. त्यामुळे अलाउद्दीन रामदेवरायाला नवसारी प्रांत कसा देईल? कदाचित पहिल्या आक्रमणाच्या वेळी किंवा आगोदर कधी त्याने हा प्रांत जिंकला होता जो परत त्याने रामदेवरायाला दिला असे असावे का? परंतु अशा नोंदी कुठेही मिळत नाहीत. आणि पराभूत राजास एक लाख टंक (म्हणजे एक प्रकारचे चांदीचे नाणे) का कोणी देईल? याचा दुसरा अर्थ असाही होतो की, रामदेवरायाला अलाउद्दीनने सन्मानाने वागवले म्हणजे तो नक्कीच सामर्थ्यवान होता हे स्पष्ट होते. हाती सापडलेल्या राजाला अलाउद्दीन का जिवंत सोडेल? आणि हे सर्व यावनी राज्यकर्ते किती धर्मांध होते हे आपणास माहित आहेच. एक हिंदू राजा ज्याला कैद करून दिल्लीला आणले आहे त्याला सन्मानाने वागवून देऊन त्याची मुक्तता एक मुस्लिम सुलतान कसा करेल? यामागे नक्कीच काहीतरी कारण असायला पाहिजे. राजकीय तर असे मोठे कारण कोणते दिसत नाही परंतु रामदेवराय आणि त्याचे सामर्थ्य नक्कीच एकमेव कारण असू शकते. रामदेवरायाला दिल्लीला पकडून नेले होते तर मग अशी सन्माननीय वागणूक का दिली? मग नक्की पकडून नेले होते का रामदेवराय स्वतःला गेला होता? रामदेवरायाने अलाउद्दीनचे मांडलिकत्व स्वीकारले होते असे कुठेही दिसत नाही आणि अलाउद्दीनने दिलेली 'रायरायान' ही पदवी रामदेवरायाने कुठे वापरली असावी असा एकही उल्लेख सापडत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या प्रकरणानंतर रामदेवरायाचा मृत्यू झाला. त्यानंतर शंकरदेवराय गादीवर बसला. मागे सांगितल्याप्रमाणे अलाउद्दीनशी बंड किंवा युद्ध नक्की शंकरदेवरायाने केले होती का भिल्लमने केले होते हे नक्की सांगता येत नाही. कारण यांच्या युद्धाबद्दल एकाही मुस्लिम समकालीन इतिहासकाराने लिहिले नाही.
फरिश्ता सांगतो की, "देवगिरीच्या पुढच्या युद्धामध्ये रामदेवरायाचा पराभव झाला व त्याला क्रूरपणे ठार मारले."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुढे जाऊन ज्यावेळी अलाउद्दीनचा मृत्यू झाला त्यावेळी बऱ्याच रक्तपातानंतर अलाउद्दीनचा तिसरा मुलगा 'कुतुबुद्दीन मुबारकशहा' हा सुलतान बनला. तिकडे मलिक काफूरच्या मृत्यूनंतर हरपालदेव याने देवगिरी पुन्हा जिंकली.
यावर बरनी लिहितो की, "खुद्द मुबारकशहा सुलतान स्वतःला देवगिरीवर चालून आला व त्याने कोणताही रक्तपात न करता देवगिरी पुन्हा जिंकला.हरपालदेव यास पकडून त्याचे चामडे सोलून देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले."
एसामी सांगतो की, "हरपालदेव यास पकडण्यात आले व त्याची संपत्ती हिसकावण्यात आली."
फरिश्ता सांगतो की, "हरपालदेवाचे मुंडके कापून ते देवगिरीच्या दुर्गावर लटकवण्यात आले."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विनाकारणची अतिशयोक्ती व फरिश्ता सारख्या लेखकांचा आधार घेऊन यादवांचे राज्य हे प्रतिकाराशिवाय नष्ट झाले असे दाखवण्यात आले. जर समकालीन साधनांचा आधार घेऊन आणि त्याला थोडासा तर्काचा आधार दिला तर रामदेवराय, शंकरदेवराय, भिल्लम, हरपालदेव यांनी खलजींना कडवा प्रतिकार दिला असणार हेच सिद्ध होते.
इतिहासाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याची वाट निरनिराळ्या साधनांतून मिळते. अलाउद्दीन जरी लुटीच्या उद्धेशाने आला असला तरी एका आक्रमणात यादवांचे राज्य संपवले असे म्हणणे साफ चुकीचे ठरू शकते. बाकी वाचकांनी ठरवावे.
पुढच्या भागामध्ये अलाउद्दीन सुलतान झाल्यावर सुलतान म्हणून कशी सुरवात केली आणि त्याची जगप्रसिद्ध चित्तोडगडाची लढाई यावर चर्चा करू.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...