विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 4 August 2020

यावनी आक्रमण: भाग - ९





यावनी आक्रमण: भाग - ९
postsaambhar ::

Prashant Babanrao Lavate-Patil

__________________
जर आपण भाग- ८ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ९ वाचण्या आगोदर भाग- ८ नक्की वाचून घ्यावा. भाग- ८ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ७ आणि ८ मधून आपण खल्जी घराण्याचा इतिहास पाहत आहोत. खलजींचा इतिहास थोडा खोलात जाऊन पाहण्याची अनेक कारणे आहेत. त्यामधील दोन महतवाची कारणे जी माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत ती म्हणजे, सलग २० वर्षे दिल्लीचा सुलतान राहून जवळ-जवळ निम्म्याहून अधिक हिंदुस्थानावर राज्य केलेला पहिला सुलतान म्हणजे अलाउद्दीन खल्जी आणि दुसरे कारण म्हणजे दक्षिणेत उतरणारा पहिला सुलतान सुद्धा अलाउद्दीन खल्जीच. अलाउद्दीन हे नाव ऐकले की, त्याच्या दोनच गोष्टी आपल्याला आठवतात एक, 'देवगिरीवरचे आक्रमण' आणि दुसरे म्हणजे 'राणी पद्मावती'. नक्कीच, या दोन घटना सोडून सुद्धा अलाउद्दीनचा खूप मोठा इतिहास आहे. फक्त या दोन घटना ज्या इतिहासात प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे कारण म्हणजे अतिशय रंजकपणे या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहचवण्यात आल्या.
या दोन्ही घटनांकडे पाहताना फार कमी लोकांनी समकालीन इतिहासकारांनी काय लिहिले आहे याकडे नेहमी दुर्लक्ष केले. यामुळेच देवगिरीचे राज्य म्हणजे एकदम साधेसुधे राज्य होते आणि किरकोळ सेना घेऊन लुटीच्या उद्देशाने आलेल्या अलाउद्दीनने हे राज्य पहिल्याच आक्रमणात अगदी खिळखिळे करून टाकले अशीच समजूत जनसामान्यांची झाली. सातव्या भागामध्ये हेच सर्व मी उत्तरकालीन अभ्यासकांनी आपल्या विविध लेखनातून कसे मांडले हे सांगितले. पण ज्यावेळी मला उत्तर भारतातील काही लेखकांनी लिहिलेली पुस्तकं ज्याला समकालीन इतिहासकारांनी केलेल्या नोंदींचा आधार आहे आणि त्यांचे लेख मिळाले. त्यावेळी या घटनेची दुसरी बाजू मांडणे मला गरजेची वाटली जी मी आठव्या भागात मांडली. तशीच दुसरी घटना म्हणजे 'अलाउद्दीन आणि राणी पद्मावती व चित्तोडगडचा पाडाव'. आता या संपूर्ण घटनेचा प्रवास आपण करू. सुरवात करू ती आजवर काय सांगितले गेले त्यापासून आणि नंतर मग या घटनेच्या समकालीन नोंदी पाहू आणि मग याचे विश्लेषण करू. त्यानंतर लोकशाहीचा फायदा घेत मी माझे मत मांडेनच जे पूर्णपणे माझे वयक्तिक मत असेल ☺️. वाचकांनी सुद्धा यावरून आपले निष्कर्ष काढावेत. याचबरोबर अलाउद्दीनची संपूर्ण कारकीर्द आपण थोडक्यात पाहू.
(इतिहासातील कोणत्याही घटनेचे निष्कर्ष एकदा मांडले की ते कायमस्वरूपी पक्के नसतात. भविष्यात अनेक संशोधने होतील ज्यातून नवीन माहिती उजेडात येऊन जुनी माहिती खरी किंवा खोटी ठरू शकते☺️).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिल्लीचा सुलतान आणि अलाउद्दीनचा चुलता व सासरा "जलालुद्दीन खल्जी" याचा अलाउद्दीनने खून केला. जलालुद्दीनला मारल्यावर सहजासहजी आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे अलाउद्दीननला वाटत नव्हते कारण जलालुद्दिनचे अनेक निकटवर्तीय मंत्री व सरदार दिल्लीत होते. म्हणून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा विचार अलाउद्दीनने केला होता. जलालुद्दीन मेला ही बातमी दिल्लीला कळताच त्याच्या बायकोने आपल्या मोठ्या मुलाला गादीवर बसवले, आणि दिल्लीमध्ये चाललेली ही सत्ता बदलीची खळबळ अलाउद्दीनला दिल्लीपर्यंत घेऊन गेली. ऐन पावसाळ्यात तो दिल्लीकडे चालला. वाटेमध्ये जलालुद्दीनच्या अनेक सरदारांनी त्याला विरोध केला परंतु पैशाच्या जोरावर त्यांने सर्वांना आपल्याकडे वळवले. दिल्लीची सत्ता काबीज करायची असेल तर आर्थिक बळ हे लागणारच होते जे देवगिरीमुळे अधिक बळकट झाले होते, आणि त्याचबरोबर जर सत्ता काबीज करण्यासाठी दिल्लीवर आक्रमण करावे लागले तर लष्करी बळ सुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे अलाउद्दीन जाणून होता. दिल्लीपर्यंत पोहचेपर्यंत वाटते अनेक सरदार व अंमलदार यांना त्यांच्या फौजेसहित आपल्या बाजूला करून घेतले आणि छप्पन हजार घोडेस्वार व साठ हजार पायदळ एवढी मोठी फौज अलाउद्दीनने गोळा केली. अलाउद्दीन येत आहे हे समजताच जलालुद्दीनची बायको आपल्या मुलाला घेऊन मुलतानला पळून गेली. अलाउद्दीन दिल्लीमध्ये पोहचला आणि २१ आक्टोबर १२९६ रोजी त्याने स्वतःला दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित केले.
अलाउद्दीनचे मूळ नाव "अली गुरशास्प उर्फ़ जूना खान खिलजी" हे होय. दिल्लीच्या गादीवर बसल्यावर त्याने स्वतःला "सिकंदर-ए-सानी" ( सानी म्हणजे द्वितीय) असे उपनाव दिले. या नावाने त्याने नाणी सुद्धा बनवून घेतली. सुलतान बनतात त्याने स्वतःचे नाव "अलाउद्दीन वाड दिन मुहम्मद शाह सुल्तान" असे बदलून घेतले.
अलाउद्दीन तसा बेरका माणूस. खलजींचा पहिला सुलतान ज्याने दिल्लीवर आपली सत्ता काबीज केली त्याला मारून हा सुलतान झाला होता त्यामुळे अनेक सरदार, मंत्री, सैन्य आणि दिल्लीची जनता नाराज असणार हे त्याला माहित होते. लोकांची मने जिंकण्यासाठी त्याने मोठमोठ्या मेजवान्या घेतल्या, समारंभ घेतले. अनेकांना कोणत्यानाकोणत्या कारणांवरून मोठमोठी बक्षिसे दिली. सैनिकांना आगाऊ पगार देऊ केला. अशा अनेक गोष्टी करून त्याने लोकांच्या मनातून राज्यापहरणाचे पाप नाहीसे करण्याचा प्रयत्न अलाउद्दीनने केला. या सर्व घटनांना एक समकालीन आधार मिळतो तो बरनीच्या एका नोंदीचा. तो म्हणतो, "... अलाउद्दीन सुलतान होताच त्याचे पहिले वर्ष अतिशय खुशालीचे गेले. असे खुशालीचे दिवस दिल्लीच्या लोकांनी पूर्वी कधीही पाहीले नव्हते". अलाउद्दीन नेहमी सतर्क असलेला दिसतो. ज्यांना-ज्यांना त्याने पैसे देऊन आपल्याकडे वळवले होते त्यांना राज्यकारभारात स्थिरता आल्यावर शासन केले. काहींना मारून टाकले तर काहींचे डोळे फोडून बंदिवासात टाकले. त्यांची सर्व संपत्ती जप्त करून सरकारात जमा केली. पण काही अंमलदार असे होते की अलाउद्दीनने पैशाची लालच देऊन सुद्धा जलालुद्दीनला सोडले नव्हते परंतु अलाउद्दीन सुलतान झाल्यावर ते नोकरीत राहिले. त्यांना अलाउद्दीनने कधीचा त्रास दिला नाही. पैशासाठी जे एका सुलतानाला दगा देऊ शकतात तर मग दुसऱ्या सुलतानाला दगा देणार नाहीत असे कसे? अशा सगळ्या लोकांना अलाउद्दीनने शासन केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ अलाउद्दीन आणि मंगोल
अलाउद्दीन इकडे दिल्लीमध्ये स्थिरता आणायची धडपडत होता आणि वायव्य सरहद्दीवर मंगोल उभे होते. अलाउद्दीन १२९६ साली सुलतान झाला आणि त्याला पुढचे जवळ-जवळ आठ दहा वर्षे मंगोलांशी कडवी झुंज द्यावी लागली. पण अलाउद्दीनने मंगोलांना प्रत्येक लढाईमध्ये हरवले. इ.स. १३०६ पर्यंत जवळ-जवळ सहा आक्रमणे झाली.
जियाउद्दीन बरनीने आपल्या "तारीख-ए-फिरोजशाही" मध्ये मोंगली आक्रमणाच्या नोंदी केल्या आहेत. १२९६-९७ मध्ये जे आक्रमण झाले त्यामध्ये उलूग खां (खान) आणि जफर खां (खान) या दोन सरदारांच्या नेतृत्वाखाली अलाउद्दीन मंगोलांचा पराभव केला. पुढे १२९९ ला कुतलुग ख्वाजा याने वीस हजाराची सेना घेऊन हिंदुस्थानावर आक्रमण केले. पुढे १३०३, १३०५ आणि १३०६ साली मंगोलांनी आक्रमणे केली परंतु प्रत्येकवेळी अलाउद्दीनने त्यांना पराभूत केले. जगावर राज्य करण्याचे स्वप्न बाळगून निघालेल्या मंगोलांचा अलाउद्दीनने असा पराभव केला की भीतीपोटी मंगोलांनी इस्लाम धर्म स्वीकरला. अनेक मंगोली इथेच स्थायिक झाली. मंगोली राजकारणात खूप हुशार आहेत हे अलाउद्दीन जाणून होता. मंगोलांनी जरी इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी त्याला मंगोलांवर आजिबात विश्वास नव्हता. याच दरम्याने त्याने तीस हजार मंगोल्यांना मारून टाकले आणि त्यांच्या कुटुंबियांना गुलाम बनवले.
■ गुजरातचा पाडाव:
अलाउद्दीन सुलतान झाला त्यावेळी त्याने पहिली स्वारी गुजरातवर केली. त्यावेळी त्या प्रांताचे रखवालदार होते राजे करणराय. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवले होते. या दोघांनी करणराय यांचा सपाटून पराभव केला. अलाउद्दीनचा सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांनी संपत्तीची तर लूट केलीच, सोबत राजा करणराय यांची राणी कमला देवी हिलाही बंदी केलं. कमला देवीला दिल्लीत आणण्यात आलं. तिची रवानगी अलाउद्दीनच्या जनानखान्यात करण्यात आली. अलाउद्दीन तिच्या सौंदर्यावर इतका भाळला की त्यानं तिच्याशी लग्न केलं.या युद्धामध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा लुटले गेले. महमूद गझनवीच्या आक्रमणानंतर जी मूर्ती बसवली होती ती फोडून तिचे दगड दिल्लीला नेऊन मशिदीच्या पायऱ्यांना बसवण्यात आले.
■ रतनभोरचा पाडाव:
जयपूरच्या परिसरात रतनभोर नावाचा एक किल्ला. हंबीरदेव नावाचा राजा तिथे राज्य करीत होता. हा किल्ला घेण्यासाठी अलाउद्दीनने आलफखान व नुसरतखान या दोन सरदारांना १२९९ साली पाठवले. हंबीरदेवाने अलाउद्दीनच्या सेनेला कडवी झुंज दिली व त्यांना मागे हटण्यास मजबूर केले. अलाउद्दीन मग स्वतः हा किल्ला घेण्यास रणांगणात उतरला. अलाउद्दीनचा एक पुतण्या होता. त्याचे नाव 'रुक्न्नखान;. याने अलाउद्दीनला एकटे गाठून त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला आणि अलाउद्दीन मेला समजून गोटात परत येऊन राज्यपद स्वीकारले. इतक्यात अलाउद्दीन परत आला आणि त्याने रुक्न्नखानाचा बंदोबस्त केला. रतनभोरला अलाउद्दीनने वेढा टाकला. हंबीरदेवने अलाउद्दीनशी मोठी झुंज दिली परंतु त्याच्या प्रधानाने त्याचा घात केला आणि तो अलाउद्दीनला जाऊन मिळाला. राजपुतांचा पाडाव झाला आणि अनेक राजपुताना कापून काढले. दगाबाज प्रधानास अलाउद्दीनने 'तू तुझ्याच राजाला दगा देऊ शकतोस तर मला देणार नाहीस कशावरून?' असा प्रश्न केला आणि त्याचे डोके धडापासून वेगळे केले.
■ चित्तोडवर स्वारी:
अलाउद्दीनच्या इतिहासातील एक बहुचर्चित घटना म्हणजे त्याने केलेली चित्तोडगडावरची स्वारी. ही स्वारी इतिहासात प्रसिद्ध केली गेली ती फक्त राणी पद्मावतीच्या नावाने. आजवर नक्की काय सांगितले गेले हे बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे. नेमके काय सांगितले गेले ते त्याची थोडक्यात उजळणी करू,
१) सिंहल द्वीपचा राजा गंधर्व सेन आणि त्याची रानी चंपावती यांची एक मुलगी होती जिचे नाव 'पद्मावती' आणि रतन सिंह रावल यांचे लग्न होते.
२) राघव चेतन नावाचा एक त्याचा गुरु होता जो काळी जादू करतो हे समजल्यावर रतन सिंह रावल त्याला राज्यातून हाकलून देतो.
३) राघव चेतन बदला घेण्यासाठी अलाउद्दीन खलजीला जाऊन मिळतो आणि राणी पद्मावतीच्या सुंदरतेचे वर्णन करून अलाउद्दीनला तिच्याकडे आकर्षित करतो.
४) राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाउद्दीन चित्तोडगडावर आक्रमण करतो. वेढा देऊन काही होत नाही म्हणून अलाउद्दीन रतन सिंह रावलला भेटीसाठी विचारतो आणि राणी पद्मावतीचा चेहरा पाहून मी दिल्लीला परत जाईन असे वचन देतो.
५) राणी महालाच्या पायरीवर पद्मावती उभी राहते जिचे प्रतिबिंब महालाच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यात पडते आणि ते प्रतिबिंब समोर असलेल्या शिषमहालामध्ये एक आरसा असतो ज्यामध्ये दिसते आणि त्या आरशातून पद्मावतीचा चेहरा अलाउद्दीनला दाखवला जातो. चेहरा पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवायची शपत तो खातो.
६) अलाउद्दीनला गडाच्या खाली सोडायला म्हणून रतन सिंह रावल जातो आणि अलाउद्दीन त्याला कैद करून पद्मावतीला माझ्याकडे पाठवा मगच राजाची सुटका करतो असा निरोप गडावर जातो.
७) पद्मावती ७०० पालख्या पाठवते ज्यामध्ये राजपूत बसलेले असतात आणि युद्ध होते ज्यातून रतन सिंह रावल सुखरूपपणे सुटून येतात.
८) मग पुन्हा भयंकर युद्ध होते. ज्यामध्ये रतन सिंह रावल मारतो आणि गडावर १६००० स्त्रिया अग्निकुंडात जौहार करतात ज्यामध्ये राणी पद्मावती असते.
९) राणी पद्मावती न मिळाल्यामुळे रंगाच्या भरात अलाउद्दीन संपूर्ण किल्ला जाळून टाकतो. वगैरे वगैरे ....
■ आता जरा यावर चर्चा करू,
मेवाडवर आक्रमण करण्यापूर्वी उत्तरेतील बऱ्यापैकी प्रदेश अलाउद्दीनने जिंकला होता. त्याआधी दक्षिणेत देवगिरीवर त्याने विजय मिळवला होता. मेवाडचा राजा 'समर सिंह रावल ' याचा मृत्यू १३०२ साली झाला आणि त्याचा मुलगा 'रतन सिंह रावल' गादीवर आला. सिंहल द्वीपचा राजा गंधर्व सेन आणि त्याची रानी चंपावती यांची एक मुलगी होती जिचे नाव 'पद्मावती' होते असे अनेकांच्या लिखाणातून दिसून आले आहे. सिंहल द्वीप म्हणजे श्रीलंका. १६व्या शतकात म्हणजे या घटनेच्या दोन-अडीचशे वर्षानंतर 'मलिक मोहम्मद जायसी' या मनुष्याने 'पद्मावत' नावाचे एक काव्य लिहिले ज्यामध्ये अलाउद्दीनच्या शौर्याचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्याचे वर्णन केले आहे. ज्यावेळी अलाउद्दीन युद्धाची तयारी करत असतो त्यावेळी इंद्रदेव सुद्धा घाबरतो. ज्यावेळी त्याची सेना चालायला सुरवात करते त्यावेळी किल्ले हादरून जातात व त्यावर बसलेला राजा थरथर कापू लागतो. अशी अनेक वर्णने अलाउद्दीनबाबत केली आहेत. पण या महाकाव्यामध्ये अलाउद्दीन खल्जी हा एक खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नायक होता तो रतन सिंह रावल.
दोन काव्ये, एक म्हणजे 'पद्मावत' जे 'मलिक मोहम्मद जायसी' याने लिहिले ज्यामध्ये अलाउद्दीनने चित्तोडवर स्वारी केली ते म्हणजे राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी. आणि दुसरे काव्य, 'छिताई वार्ता' जे नारायण दास ने लिहिले ज्यामध्ये छिताईच्या राणीसाठी अलाउद्दीनने देवगिरीवर आक्रमण केल्याचे वर्णन केले आहे. पद्मावती काव्यामध्ये पद्मावती ही चौहान राजपूत हमीर शंक चौहान या श्रीलंकेच्या राजाची मुलगी म्हणून सांगतात. पद्मावती नेमकी राजा गंधर्व सेनानी मुलगी का मग हमीर शंक चौहानाची मुलगी? असो, कोणाचीही का असेना हमीर शंक चौहान हा राजपूत राजा सांगितला गेला मग राजपुतांच्या इतिहासात एकही मनुष्य श्रीलंकेला गेला असेल आणि तिथे राज्य स्थापन केले असेल अशी एकही नोंद नाही.
■ खाली आपण या घटनांची तीन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली मांडणी पाहू,
१) जायसी सांगतो की, अलाउद्दीन, रतन सिंहाला कैद करून दिल्लीला घेऊन जातो. यानंतर शेजारचा राजा देवपाल हा राणी पद्मावतीवर अत्याचार करतो. पद्मिनीचे दोन नातेवाईक गोरह आणि बादल हे दिल्लीवर आक्रमण करून रतन सिंहाला सोडवून आणतात. रतन सिंह पद्मावतीवर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून देवपालावर आक्रमण करतो आणि दोघेही त्या युद्धामध्ये मरण पावतात.
२) आता हीच घटना 'फरिश्ता' आपल्या 'गुलशन-ए- इब्राहिमी' (१५८९ मध्ये लिहिली गेली) मध्ये कसे सांगतो बघा, "अलाउद्दीनची चित्तोडगडची मोहीम यशस्वी होते आणि तो चित्तोडगडच्या राजाला कैद करतो (राजाचे नाव सांगत नाही). राजाचे नातेवाईक कसेबसे आपला जीव वाचवून अरवली पर्वतरांगेमध्ये लपून बसतात. अलाउद्दीनला समजते की राजाची मुलगी पद्मावती खूपच सुंदर आहे आणि मग तो राजाला सोडवण्यासाठी तिची मागणी करतो"
३) आता रियासतकार ज्यांनी मुस्लिम शासकांवरती 'मुस्लिम रियासत' लिहिली ते काय सांगतात बघा, "राणा लक्ष्मणसिंह चित्तोड येथे राज्य करत होता. त्याचा चुलता भीमसिंह याने सिंहलद्विपच्या रावाची रूपमती कन्या पद्मावती हिच्याशी विवाह केला. अलाउद्दीनने पद्मावतीच्या लोभापायी चित्तोडगडावर आक्रमण केले. पद्मावतीला माझ्या स्वाधीन कर, असे म्हणून त्याने गडाला वेढा टाकला. किल्ला पडत नाही हे दिसताच 'मला पद्मिनीचा एकदा चेहरा दाखव, मग मी परत जाईन' असा निरोप अलाउद्दीनने भीमसिंहाला पाठवला. मग ते सगळं प्रतिबिंब, आरसा वगैरे झाले. भीमसिंह अलाउद्दीनला सोडायला गडाच्या जरा बाहेर गेला असता अलाउद्दीनने त्याला कैद केले आणि पद्मावतील माझ्या स्वाधीन केल्याशिवाय तुला सोडणार नाही असे सांगितले. ही बातमी गडावर समजताच 'माझ्या संपूर्ण लवाजम्यानिशी मी तुला भेटायला येत आहे' असा निरोप पद्मावतीने अलाउद्दीनला पाठवला. मग ७०० पालख्या गेल्या ज्यामध्ये एक-एक राजपूत बसला होता आणि एक पालखी उचलायला सहा सहा शिपाई भोयांच्या वेशात होते. पद्मावती नव्हतीच. पद्मावती आली असे समजून अलाउद्दीनने तिला नवऱ्याला भेटण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला. भीमसिंहाला सोडायचे नाही असेच त्याने ठरवले होते परंतु एका पालखीत बसून भीमसिंह किल्यात परत गेला. पद्मावतीच्या भेटीची घाई अलाउद्दीन करताच पालखीतून सैन्य बाहेर पडले आणि युद्ध सुरु झाले. अलाउद्दीन सावध होता. युद्धात सर्व राजपूत कापले गेले. पुढे काही दिवस युद्ध होऊन अलाउद्दीनचे भरपूर नुकसान झाले आणि त्याच दरम्यान मंगोलांनी दिल्लीवर आक्रमण केल्यामुळे अलाउद्दीनला दिल्लीला परतावे लागले. पुढे एकाच वर्षात म्हणजे १३०४ मध्ये अलाउद्दीनने पुन्हा चित्तोडवर स्वारी केली. राजपुतांनी जोरदार लढा दिला परंतु काहीच चालेना असे दिसताच पुरुषांनी आपल्या बायकामुलांची अग्नीत आहुती देऊन युद्धभूमीत मरण पत्करले. किल्ला काबीज केल्यावर अलाउद्दीनने झालॊरच्या घराण्यातील मालदेव नामक एका राजास गादीवर बसवले व दिल्लीस परत गेला.
अनेकांनी ही घटना बऱ्यापैकी अशाच पद्धतीने मांडली आहे. थोडाफार मांडणीचा फरक असेल.. वरती तीन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली मांडणी पाहून एकंदरीत करून ठेवलेला गोंधळ आपण समजू शकतो.
■ आता या घटनेच्या काही समकालीन नोंदी पाहू:
१) अमीर खुसरो हा समकालीन इतिहासकार आहे आणि ही घटना त्याने स्वतहा पहिली आहे व त्याची नोंद करून ठेवली आहे. तो काय म्हणतो पहा,
"२८ जानेवारी १३०३ रोजी सुलतानाने चित्तोड जिंकायचा निश्चय केला. सुलतान सैन्य घेऊन चित्तोडला पोहचला. किल्ल्याच्या दोन्ही बाजूने हल्ले करण्याचे आदेश त्याने सेनेला दिले. दोन-तीन महिने शाही सेना किल्ल्यावर आक्रमण करत राहिली परंतु विजयश्री प्राप्त होत नव्हता. चत्रवारी नावाच्या डोंगरावरून सुलतान सेनेचं नेतृत्व करीत असे. मनोरंजनासाठी सुलतान पूर्वेकडील पैलवान आणि पश्चिमेकडील पैलवानांच्या कुस्त्या लावत असे. २५ ऑगस्ट १३०३ रोजी ज्या किल्यात कोणता पक्षीही जाऊ शकत नाही त्या किल्यात सुलतान शिरला. सुलतानाचा दास अमीर खुसरो देखील सुलतानाबरोबर होता (म्हणजे हा समकालीन लेखक स्वतः तिथे हजर होता). राजा स्वतः सुलतानाच्या सेवेत उभा होता व त्याने क्षमा मागितली. सुलतानाने राजास कोणतीही हानी पोचवली नाही. परंतु क्रोधाने सुलतानाने तीस हजार हिंदूंची हत्या केली. हिंदूंची हत्या करत असताना सुलतानाने एकाही शेतकऱ्याला हानी पोचवली नाही. चित्तोडचे नाव 'खिजाबाद' असे ठेवण्यात आले ......"
अमीर खुसरो इथे पद्मावतीचा उल्लेख सुद्धा करत नाही . मेवाडचा राजा 'समर सिंह रावल ' याचा मृत्यू १३०२ साली झाला आणि त्याचा मुलगा 'रतन सिंह रावल' गादीवर आला आणि या संधीचा फायदा घेऊन नवीन राजावर आपली वचक ठेवण्यासाठी केली गेलेली ही सैनिकी कारवाही होती.
२) "तारिखे फिरोज शाही" चा मुख्य समकालीन लेखक जियाउद्दीन बरनीने ही घटना मोजून तीन-चार ओळीत मांडली आहे. तो म्हणतो, "सुलतानाने देहलीतून सेना घेतली आणि चित्तोडवर आक्रमण केले. चित्तोडला चारी बाजूने वेढा टाकला आणि अतिशय कमी वेळात किल्ला जिंकला. किल्ला जिंकून दिल्लीला परत आल्यावर मोंगलांच्या आक्रमणाची भीती पुन्हा सुरु झाली होती."
३) 'एसामी' या लेखकाने "फुतूहुस्सलातीन" ची रचना १३५० साली केली. म्हणजे अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी. तो यामध्ये म्हणतो, "सुलतानाने चित्तोडवर आक्रमण केले. राजा ८ महिने लढला. त्यानंतर राजाने सुलतानाची क्षमा मागितली. सुलतानाने राजाला खिल्लत देऊन सन्मानित केले. शिरजा नावाच्या एका वीराला सुलतान आपला पुत्र समजत असे. त्याची चित्तोडवर नियुक्ती केली आणि त्याला खुसरो खां ही पदवी भलं केली व सुलतान दिल्लीला परत गेला".
४) 'यहया बिन महमद बिन अब्दुल्लाह' हा थोड्या नंतरच्या काळातील इतिहासकार. यहयाने १४३४ पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्याने आपल्या 'तारिखे मुबारक शाही' मध्ये लिहिले आहे की, "सुलतानाने चित्तोडवर आक्रमण केले आणि चित्तोडवर विजय प्राप्त केला. चित्तोडचे नाव खिरजाबाद ठेवले आणि किल्ल्यावर खिज्र खां याला नियुक्त करून सुलतान दिल्लीला परतला".
वरती जे काही समकालीन किंवा घटनेनंतर थोड्या वर्षांनी लिहिलेल्या लेखकांच्या नोंदी पहिल्या तर थोडाफार फरक जाणवतो परंतु कुठेही पद्मावतीचा उल्लेख केला गेला नाही. अलाउद्दीन आणि पद्मावती यांच्या संदर्भातील घटना ज्या पदतीने रंगवून सांगितली जाते जर ती घडली असती तर निदान राणी पद्मावतीचे नाव इतिहासाच्या एका तरी पानावर नक्कीच असते.
आता प्रश्न उरतो तो 'पद्मावत' या काव्याचा. १६व्या शतकात हे काव्य ज्यावेळी जायसी लिहीत होता त्यावेळी राजपूत राजा 'जगत देवा' याने जायसीला संपूर्ण संरक्षण दिले होते. याचे कारण काय असू शकते हे वाचकांनी ठरवावे. यावर माझे वयक्तिक मत हेच की, ज्या अलाउद्दीन खल्जीने यांच्या पूर्वजांना नेस्तनाबूत केले त्या अलाउद्दीनला जास्तीतजास्त क्रूर दाखवून इतिहासात त्याला खलनायक ठरवायचे होते म्हणून या काव्याची रचना करवून घेण्यात आली.
"जर कोणाची महानता फक्त त्याच्या दुश्मनांशी तुलना करून ठरवायची असेल तर मग अलाउद्दीन खल्जी त्या काळातील प्रत्येक राजाच्या तुलनेत खूप खूप पुढे जातो" असे मत प्रसिद्ध इतिहास संशोधक रुचिका शर्मा यांनी मांडले आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पुढे १३०६ मध्ये दक्षिणेत दुसरी स्वारी झाली. १३१० मध्ये तिसरी आणि १३१२ मध्ये चौथी स्वारी झाली. याबद्दलची माहिती आपण मागच्या काही भागात पाहिलीच आहे. या सर्व देवगिरीवर झालेल्या स्वाऱ्या आहेत.
मलिक काफूरच्या दक्षिणेतील शेवटच्या स्वारी दरम्यान खलजींचे राज्य भरभराटीचे झाले होते. अतिशय थोड्या कालावधीमध्ये अलाउद्दीनने त्याच्या राज्याच्या सीमा दूरवर पसरवल्या होत्या. त्याची शासन व्यवस्था कमालीची होती. बरनी सांगतो, "शेतीलायक जमिनीची तपासणी करून मगच शेत पिकातील अर्धा हिस्सा कराच्या स्वरूपात सरकारात जमा करायचा आणि अर्धा शेतकऱ्याकडे अशी शेतीची व्यवस्था त्याने लावली होती". खोत, मुक़द्दम, चौधरी अशी मंडळी शेतकऱ्यांना विविध करांच्या रूपात लुटत असत. या सर्वांचा बंदोबस्त अलाउद्दीनने केला.
२ जानेवारी १३१६ साली अलाउद्दीनचा मृत्यू झाला. मलिक काफूर याने अलाउद्दीनला विष देऊन मारले अशी काही जणांचे म्हणणे आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ मुबारिक खल्जी (१३१६ ते १३२०):
मलिक काफूरने अलाउद्दीनला मारले असे बरनीचे सुद्धा म्हणणे आहे. अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर मलिकने एक खोटं मृत्युपत्र सादर केले ज्यामध्ये 'अलाउद्दीनचा पाच वर्षांचा एक मुलगा उमरखान यास गादीवर बसवून मलिक काफूरने कारभार पहावा' असे लिहिले होते. उमरखानच्या मोठ्या भावांचा खून केला व त्यांच्या आईला बंदी बनवले व मलिक स्वतः राज्यकारभार पाहू लागला. मुबारिक नावाचा अलाउद्दीनचा मुलगा मलिकच्या तावडीतून वाचला. मलिकचा हा खेळ काही जास्त दिवस चालला नाही. एक दिवस पहारेकर्यांच्या मदतीने मुबारिकने त्याला ठार केले. मुबारिक स्वतः सुलतान बनला. १३१८ मध्ये त्याने हरपालदेवला मारून देवगिरीचे राज्य संपवले. देवगिरीचे व्यवस्था लावून ज्यावेळी मुबारिक दिल्लीस परत आला त्यावेळी दिल्लीत बंडे होऊ लागली होती. मुबारिक ज्यावेळी दक्षिणेच्या स्वारीवर गेला होता त्यावेळी त्याने मलिक खुस्रोला मलबार देश जिंकण्यास पाठवले. खुस्रोने इथून भरपूर संपत्ती गोळा केली. सुलतानाने खुश होऊन आपले सर्व अधिकार त्याला सोपवले. खुस्रोला आता सुलतान व्हायचे होते. त्याने कारभार हाती घेतला. मुबारिक व्यसनात बुडाला. एक दिवस खुस्रोने खल्जी घराण्यातील सर्व पुरुषांचा खून केला. फौजेला पैशाचे लालच देऊन स्वतःकडे वळवले व नासिरुद्दीन असे नाव धारण करून तो सुलतान झाला. तो स्वतःस हिंदू समजून मुस्लिम विरोधी कृत्ये करू लागला. जनानखान्यात अंगावर काटा येईल असे कृत्ये करू लागला. पाच महिने दिल्ली शहर हिंदू बंडवाल्यांच्या ताब्यात दिले. शेवटी पंजाबचा सुभेदार "गाजीबेग तुगलख" याने दिल्लीवर स्वारी केली व त्याने खुस्रोला पकडून ठार मारले. गाजीबेग तुगलखने स्वतःचे नाव बदलून ग्यास-उद्दीन तुघलख असे नाव ठेवले व स्वतः दिल्लीचा सुलतान बनला (इ.स. १३२१).
आता दिल्लीमधील खल्जी घराण्याची सत्ता संपुष्टात आली होती आणि आता दिल्लीवर तुघलख घराण्याची सत्ता प्रस्तापित झाली होती. इ.स. १३२१ ते १३८८ दिल्लीवर तुघलख घराण्याने राज्य केले. याची चर्चा आपण पुढच्या काही भागात करूच.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...