विनोद जाधव एक संग्राहक

Friday 7 August 2020

मराठा सरदार बाबर

 मराठा सरदार बाबर

सोनंद व डोंगरगाव ही सांगोला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गावे आहेत. या गावातील '#बाबर' घराण्याच्या कर्तृत्वामुळे हि गावे मराठ्यांच्या इतिहासात मशहूर झाली आहेत. बाबर म्हणजे '#सिंह'. आपल्या नावाला साजेसा पराक्रम आणि एकनिष्ठेने केलेली स्वराज्यसेवा म्हणजे रोमांचकारी इतिहास आहे.

सातारा मधील कोरेगाव तालुक्यातील किकली हे बाबर यांचे मूळ गाव असावे.

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचा घनघोर रणसंग्राम झाला, यात भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे हे पेशवे घराण्यातील कर्तबगार रणांगणावर मृत्यूला सामोरी गेली. "दोन मोती गळाले, दहा-वीस अश्रफी गेल्या, खुर्दा-रुपयांची तर गणतीच नाही…"असे वर्णन या युद्धाचे केले गेले. या युद्धात सोनंद-डोंगरगावचे #महिपतीराव_बाबर, #लिंबाजी_बाबर, #गोविंदराव_बाबर आपल्या पथकानिशी हजर होते. बाबरांचे पथक हे पेशव्यांच्या हुजुरातील महत्त्वाचे पथक होय. या संग्रामात महिपतीराव बाबर व लिंबाजी बाबर युद्धात ऐनवेळी घोडा ठार झाल्याने पायउतार होऊन लढताना आपल्या सत्तर आसामींसह भाऊसाहेब पेशव्यांबरोबर ठार झाले.

हुजुरातीचे पथकातील गोविंदराव बाबर मात्र युद्धभूमीवरून परत सुखरूप आले. या विनाशकारी युद्धानंतर नानासाहेब पेशवा भाऊसाहेब पेशव्यांचा 'भाऊ भाऊ' असा घोष लावूनच मृत्यूला सामोरे गेला. त्यानंतर छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे माधवराव पेशव्याला दिली.

यानंतर लवकरच हैद्राबादचा निजाम पुण्यावर चालून आला. त्यावेळी माधवराव पेशव्यानी गोविंदराव बाबरांना त्यांच्या फौज फाटा घेऊन पुण्यास सत्वर पोच होण्यासाठी पत्र लिहिले. या पत्राला गोविंदराव बाबरांनी २५ ऑगस्ट १७६१ रोजी उत्तर दिले. हे मुळ पत्र पेशवे दप्तरखंड ३८ मद्ये सामील झाले. हे पत्रच मुळी विस-बावीस वर्षाचा (१७४०-१७६१) बाबरांच्या पराक्रमाचा आरसा म्हणावा लागेल. गोविंदरावांच्या या पत्रातून लक्षात येते की, फक्त बाबरांखेरीज एक हजार सैनिक त्यांच्या पथकात होते. त्यातील सत्तर आसामी धारातीर्थी पडले. तसेच पानीपतच्या मोहिमेचा खर्च पेशव्यांनी न दिल्याने त्यांना त्याकाळी पुण्याच्या सावकाराचे साठ हजार कर्ज झालेले. म्हणजे मनुष्यहानी आणि आर्थिकहानी मोठ्या प्रमाणावर सहन केलेले बाबरांचे पथक होते.

या पत्रावरून पहिले बाजीराव पेशवे नंतर पेशवे पदावर विराजमान झालेले बाळाजी तथा नानासाहेब पेशवे यांचे कारकीर्दीपासून बाबरांचे पथक हुजुरातीत सामील होते असे दिसून येते.

त्यांनी नानासाहेब पेशव्यासोबत पुढील स्वाऱ्या केल्या –
१) धवलपूरची स्वारी(२१ ऑक्टोबर १७४० ते ७ सप्टेंबर १७४१)
२) बंगालची स्वारी (१८ डिसेंबर १७४१ ते ३० जुलै १७४३)
३) भेलसा स्वारी (२० नोव्हेंबर १७४४ ते ऑगस्ट १७४५)
४) नेवाईची स्वारी (१० डिसेंबर १७४७ ते ९ जुलै १७४८)

नानासाहेब पेशव्याने आग्रा व अजमेर हि बादशाही सुभे ताब्यात घेऊन बादशाही सत्तेचे बाह्य शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आपले धाकटे बंधू रघुनाथराव पेशवे यांच्यासोबत मराठा फौजा ३० ऑगस्ट १७५३ ते १० ऑगस्ट १७५५ या दोन वर्षासाठी पाठवल्या त्यातही हुजुरातीतील बाबरांचे पथक सामील होते.

"पूर्वी सेवा मेहनत करीतच आलो. हलीहि सेवा करून ऊर्जीत करून घ्यावे यैसा हेत कायावाचामने असे. दुसरा तिसरा अर्थ स्वामीचे पायासिवाये चितात आणीत नाही. पूर्वीहि निकडीची सेवा करीत आलो हलीहि जैसी आज्ञा करितील तैसी सेवा करून दाखऊ." गोविंदरावांच्या पत्रातील या मजकूरातून बाबरांची #मराठा दौलतीवरील अपार निष्ठा आणि पेशव्याप्रती उदार स्वामीभक्ती दिसून येते. याच भावनांची कदर करून पुढे जेंव्हा माधवराव पेशव्याने हैदरअलीवर पाचवेळा स्वाऱ्या केल्या तेंव्हा २४ मे १७६५ या पहिल्या स्वारीच्या वेळी सोनंद गावी मुक्काम केला तसेच तिसऱ्या स्वारीच्या वेळी १२ डिसेंबर १७६७ रोजी डोंगरगावच्या बाबरांच्या गढीला भेट दिल्याची नोंद आहे. गोविंदराव बाबरांच्या पथकाने या पाचही स्वाऱ्यांमद्ये भाग घेतला होता.

इ सन १७६९ नंतर उत्तरेकडील जाट,रोहिले ,पठाण हे वरचेवर प्रबल होत होते. त्यानी बळकावलेला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी #रामचंद्र_गणेश_कानडे या मराठा सरदाराच्या हाताखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली. त्यात #विसाजी_कृष्ण_बिनीवाले यांची करभारी म्हणुन नेमणुक केली. तिकडे शिंदे होळकरांची प्रत्येकी १५००० ची फौज होती.या कानडे यांच्या यावेळच्या फौजेत गोविंदरावांचे पथक होते.

झाबेताखान शुक्रतालच्या किल्ल्यावरून पळून पथ्थरगडावर आला,मराठा सैन्य या किल्ल्यास वेढा देऊन बसले या वेढ्यात #गोविंदराव_बाबर, #सुलतानजी_बाबर#गंगाजी_बाबर यांचे पथक होते. या वेढ्यातील खास चौकी ची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती. मराठ्यांनी १६ मार्च १७७२ रोजी पथ्थरगड जिंकला. या समयी मराठा सैन्यानी या गडावरील नजिबाची संपत्ती तर घेतलीच,परंतु पानिपतावरुन शत्रुने पळवुन नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका केली.यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. या मराठ्यांच्या पराक्रमाच्या खबरा जेंव्हा पुण्यात माधवरावांना मिळाल्या तेंव्हा त्यांनी विसाजी पुण्यात आल्यावर त्यांचा सुवर्णपुष्पे उधळून सन्मान करण्याचा लेखी आदेश दिला.

डोंगरगावात आता बाबरांची ती गढी ढासळून विपन्नावस्थेत गेलेली आहे. पानिपतवीर महिपतराव बाबर व लिंबाजी बाबर यांच्या समाध्या, सतिशिळा मंदिर या ऐतिहासिक वास्तू तग धरून आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन शासन आणि समाजाकडून व्हावे. दरवर्षी १४ जानेवारी या #पानिपत_शौर्य_दिनी बाबर आणि त्या सत्तर पानिपतविरांना मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी येथे उपस्थित रहावे जेणेकरून या ठिकाणास एक ऐतिहासिक स्थळ म्हणून महत्व प्राप्त होईल अशी आम्हा इतिहासप्रेमींची भावना आहे.

माहिती साभार.

संदर्भ – सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
संकलन – मल्हार गायकवाड

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...