विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 4 August 2020

महादजीबाबा शिंदे आणि मराठा सत्तेची पुनर्रउभारणी भाग २.

महादजीबाबा शिंदे आणि मराठा सत्तेची पुनर्रउभारणी भाग २.
post saambhar ::अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर.
आपण या लेखाच्या पहिल्या भागात महादजी शिंदेच्या जन्मापासून ते पहिल्या मराठा इंग्रज युद्धातील घटनांचा आढावा घेतला होता. या युद्धात जरी आपल्या अधिक संख्याबळाच्या जोरावर महादजी शिंदे व मराठा मंडळाने इंग्रजी सैन्याचा पराभव केला असला तरी मराठा सैन्याच्या अनेक त्रुटीही उघड झाल्या हे महादजी सारख्या निष्णात सेनापतीच्या लक्षात आल्यावाचून राहीले नाही. आजच्या लेखात आपण महादजीने उत्तर भारताचे प्रशासन कसे हाताळले व मराठा सैन्याच्या त्रुटींवर कशी मात केली हे पाहू. महादजीच्या गौरवशाली काराकीर्दीचा कळस मानल्या जाणाऱ्या वकील इ मुतालिक किताब व महादजीचा पुण्याजवळील वानवडीच्या शिंदे छावणीत झालेल्या मृत्यूपर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा आपण या लेखात घेऊ.
मराठा इंग्रज युद्धातील विजय व सालबाईच्या कराराला नाना फडणवीसाची मान्यता मिळवल्यानंतर महादजीने आपले लक्ष पुन्हा एकदा उत्तरेकडे वळवले. ही नाना व महादबामधील तडजोड होती, ज्याअंतर्गत महादजीच्या उत्तरेच्या कारभारात नानाने जरूरीपेक्षा अधिक लक्ष घालू नये तर महादजीने नानाच्या दक्षिणेतल्या कारभारात ढवळाढवळ करू नये असा अलिखित नियमच बनला होता. हे युद्ध सात ते आठ वर्षे खेचण्यासाठी इंग्रजांची कवायती फौज कारणीभूत आहे हे चाणाक्ष महादजीने ओळखले. मराठा साम्राज्याला जर काळासोबत धावायचे असेल व पुन्हा एकदा अखिल भारतीय दबदबा निर्माण करायचा असेल तर कवायती फौजा बाळगण्याशिवाय पर्याय नाही हे जाणून डी बॉईन नामक फ्रेंच युद्धसेनातज्ञाच्या मदतीने महादजीने स्वतःच्या कवायती सेनांच्या तुकड्या उभारण्यास सुरूवात केली. पाच वर्षांत महादजीसाठी डी बॉईन याने तीन कवायती तुकड्या म्हणजेच तीन हजार सुसज्ज सैन्य, त्यांना लागणारा तोफखाना, लहान मोठ्या बंदूका, गणवेश यांच्यासह तयार केल्या. याच घातक सैन्याच्या जोरावर महादजीने सुमारे दहा वर्षे उत्तर भारतातील सत्तेला आपल्या बोटावर नाचवले. ४ डिसेंबर १७८४ रोजी दिल्लीच्या बादशाहने महादजीला वकिल इ मुतालक म्हणजेच बादशाहचा सर्वोच्च प्रतिनिधी हा किताब व दर्जा दिला. हा दर्जा तत्कालिन वजीरापेक्षा मोठा होता व महादजीसारख्या पेशव्याच्या सरदाराने पेशव्याच्या मंजूरी शिवाय हा उच्च किताब घेतला हे नाना फडणवीसास आवडले नाही. त्याच्या नाराजीच्या पत्रानंतर महादजीने नायब वकिल इ मुतालक हा आपला किताब असेल व पेशवा सवाई माधवराव नारायण हा वकिल इ मुतालक असेल असे नानाला कळवून त्याची समजुत काढली. महादजीने ही जोखिमीची जबाबदारी सुमारे सहा वर्षे सांभाळली. शिंद्यांनी डी बॉइनला अंतर्वेदीत पंधरा लाखाची जहागिर त्याच्या तुकड्यांतील सैनिकांच्या पगारासाठी दिली. महादजी आग्रा व दिल्ली या सुभ्यांचा सुभेदार बनला. १७८७ साली बादशाहतर्फे राजपुतान्यातील खंडणी वसूल करण्यासाठी महादजी जयपुराकडे आला. मात्र मराठ्यांचे वाढते प्रस्थ असहय्य होऊन सेनेबरोबरच्या मोगलसेनेने कट करून राजपुतांची बाजू घेतली, या लढाईत मराठ्यांचे दुसरे पानिपतच व्हायचे मात्र डी बॉईनच्या पायदळ व तोफखान्याने शत्रूसैन्याला रोखून धरले व मराठ्यांना भरतपूरपर्यंत माघार घेता आली. आता अधिक काही हालचाल न करता सैन्य मदत येईपर्यंत महादजीने भरतपुरलाच वाट पाहायचे ठरवले. याचवेळी गुलाम कादर व इस्माइल बेग या दोन रोहिला सरदारांनी महादजीच्या अनुपस्थितीत दिल्ली जिंकली. पैशासाठी या दोघांनी बादशाही कुटूंबावर अनन्वित अत्याचार केले, बादशाहचे डोळे काढले. मात्र लवकरच महादजीने दिल्ली पुन्हा जिंकली. गुलाम कादरला हालहाल करून ठार मारले गेले. दिल्लीतून पळालेल्या इस्माईल बेगने राजपुतांशी युती करून जयपुरच्या उत्तरेस पाटण येथे तीस हजार पायदळ व सतरा हजार घोडदळाच्या मदतीने खंदक खणून छावणी उभारली. मात्र डी बॉईनच्या प्रशिक्षित सैन्याने या खंदकाआडच्या सैन्याला तोफांनी भाजून काढले व तसेच पायदळाकरवी बंदूकीच्या फैरींनी राजपुतांना हैराण करून सोडले. शेवटी राजपुतांनी मैदान सोडून पळ काढला व त्याचवेळी इस्माईल बेगच्या मोगल सैन्याचा संपुर्ण नाश झाला. २० जुन १७९० रोजी जयपुरकरांनी शरणागती पत्करली. यानंतर लगेच जोधपुरविरूद्ध महादजीची मोहिम सुरू झाली ज्यात १० सप्टेंबर १७९० रोजी मेडत्याच्या लढाईत जोधपुरचा पराभव झाला. इस्माइल बेगला कानोदच्या किल्ल्यात पकडण्यात आले (१७९२) व नंतर तो सात वर्षे आग्य्राच्या किल्ल्यात कैदी होता. बंडखोर राजपुत राजे व मुसलमान उमराव यांना कडक शासन केले गेले. याचदरम्यान अकबरासारख्या शक्तीशाली मुघल बादशाहला महिनोन्महिने दाद न देणारा चित्तोडगढ किल्ला महादजीने ५ दिवसात जिंकला.
शिंद्यांच्या कवायती फौजा व लष्करी तयारीमुळे शिखांचे बंड आपोआप थंड झाले व त्यांनी माघार घेतली. यामुळे सतलजपासून नर्मदेपर्यंत संपुर्ण उत्तर भारतात पाटिलबावांचा एकछत्री अंमल सुरू झाला. महादजीचा व मराठ्यांचा उत्तरेतील दरारा पुन्हा एकदा पानिपतपुर्व काळातील सुवर्णक्षणांना स्पर्श करू लागला. मात्र आपणास दक्षिणेतुन हवी तशी मदत मिळत नाही याची महादजीस खंत होती. त्यामुळे आपले यश, ते मिळवण्यासाठीचे कष्ट व अडचणी, खर्च व कर्ज यांच्याविषयी पेशव्याशी व मुख्य म्हणजे पेशवाईचा कारभारी असणार्या नानाशी चर्चा करण्यासाठी महादजी दक्षिणेत निघाला. तो १२ जुन १७९२ रोजी पुण्यास पोहोचला. मात्र पुण्यास वकिल इ मुतालकीची वस्त्रे व मानसन्मान पेशव्यास अर्पण करण्याच्या सार्वजनिक कार्यक्रमा व्यतिरिक्त महादजीच्या पुण्यातील कोणत्याही घडामोडींचा उल्लेख आढळत नाही. त्याने स्वतः पेशवा सवाई माधवराव नारायण, कारभारी नाना फडणवीस, सेनापती हरीपंत फडके या सर्वांशी प्रदीर्घ चर्चा केल्या. त्यातून उत्तर व दक्षिण भारतातील कारभाराची पुर्नमांडणी केली गेल्याचा अंदाज महादजीचा वारस दौलतराव शिंदे याच्या कृतीतून आपणास येतो मात्र ठळक घडामोडी वा कागदपत्रे आढळत नाहीत. यादरम्यान टिपू सुलतान विरूद्धची एक छोटीशी मोहिम व नाना फडणवीसास मराठा साम्राज्य, निजाम व इंग्रज यांची टिपू विरूद्ध युती न करण्याचा सल्ला सोडल्यास कोणत्याही लष्करी घडामोडीत महादजीने सहभाग घेतल्याचे दिसून येत नाही. असं मानलं जातं की स्वत: टिपूने महादजीबाबाची भेट घेतली व नाना फडणवीसास इंग्रजांशी तह करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली होती.
महादजीचे पुण्यात सुमारे १८ महिने वास्तव्य होते. महादजीचे १२ फेब्रूवारी १७९४ रोजी पुण्याजवळील वानवडी येथील शिंद्यांच्या लष्करी छावणीत निधन झाले. महादजीस मुलगा झाला नाही त्यामुळे त्याने त्याचा सख्खा भाऊ तुकोजी याच्या दौलतराव नावाच्या नातवास दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली होती. हे दत्तकविधान महादजीच्या मृत्यूनंतर १० मे १७९४ रोजी पेशव्याने अधिकृत केले. महादजी शिंदे मराठा साम्राज्याचा शेवटचा महान सेनापती होता. त्याने आपल्या रक्ताचे पाणी करून मराठा साम्राज्याची पानिपतच्या पराभवाने गेलेली प्रतिष्ठा उत्तर भारतात परत मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची एक अपूर्ण इच्छा महादजीने पुर्ण केली. ती म्हणजे एखाद्या मराठ्याने दिल्लीचे शासन स्वतःच्या बळावर चालवण्याची. अर्थात महादजी जरी दिल्लीचा अभिषिक्त राजा नसला तरी त्याचा अधिकार बादशाहपेक्षा कमीही नव्हता. सुमारे आठ वर्षे महादजीने बादशाही आपल्या खांद्यावर सांभाळली हेही काही कमी नाही. महादजीच्या मृत्यूनंतर दहाच वर्षात मराठ्यांची प्रतिष्ठा लयास गेली व आर्थर वेलस्लीच्या तैनाती फौजेच्या कराराचा स्विकार पेशव्यापासून शिंदे, होळकर व गायकवाडांपर्यंत जवळपास सर्वच सरदारांनी केला.
मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णपान आपण या लेखात महादजी शिंदे याच्या युद्धजीवनाच्या रूपाने पाहिले.
(या लेखातील काही मजकूर अथवा संपूर्ण लेखाचा माझ्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...