स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्वतंत्र्य हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा पहिला मराठा राजा. शिवसुर्याला जन्म देणारा व अनेक संकटांना तोंड देणारा महाराष्ट्राचा वाघ.
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.
पार्श्वभूमी:-
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.
जन्म:- मार्च १८, इ.स. १५९४,
जन्मस्थान :- सिंदखेड,
मृत्यू:- जानेवारी २३, इ.स. १६६४,
समाधीस्थळ:- होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक),
वडील:- मालोजीराजे भोसले.
आई:- उमाबाई भोसले.
विवाह:- सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला. तुकाबाईंशी इ.स.१६२६ मध्ये विवाह झाला.
पत्नी:- जिजाबाई, तुकाबाई.
संतती: संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले.
महत्वाचे प्रसंग:-
ऐतिहासिक विजय “भातवडीचे युद्ध”:-
मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संपवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.
निजामशहाचा वारसदार:-
जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वतःच्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.
सरलष्कर:-
मलिक अंबरची निजामशाही दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते.
कैद:-
आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले.
हिंदवी स्वराज्य:-
शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजीराजेंना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीराजेन बरोबर बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
शहाजीराजांची कारकीर्द:-
इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही
इ.स १६६१-ते इ.स. १६६२ - शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.
No comments:
Post a Comment