विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ७

 


दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे
भाग ७
येथे शिवछत्रपतींचा उल्लेख करण्याचे कारण असे आहे की, आपण मराठय़ांच्या काळातील भौगोलिकतेचा जनमानसावर व अर्थकारणावर होणारा परिणाम याची चर्चा करीत आहोत. त्यामुळे ज्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या माणसाने त्यांना या कार्यात मदत केली ती मानसिकता सह्यद्रीच्या अन् सिंधुसागराच्या साहचर्याने या जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली होती. याहूनही दोन पावले पुढे जाऊन सांगायचे झाले तर दख्खनच्या पठारावर राहणारी अन् तुलनेत काहीसे सुखासीन जीवन जगू शकणाऱ्या माणसांची मदत शिवछत्रपतींना त्यांनी अंगीकारलेल्या कार्यात कधीच झाली नाही. सह्यद्रीच्या कुशी-खांद्यावर राहणाऱ्या राकट, कणखर अन् शेंडी तुटो की पारंबी, मात्र हाती घेतलेल्या कामाला पाठ दाखवायची नाही अशा रांगडय़ा वृत्तीच्या सर्वसामान्य मावळ्यांनी व कुणब्यांनीच या देवकार्यात शिवछत्रपतींना जिवेप्राणे शेवटपर्यंत साथ दिली.
ज्या प्रदेशात या देवकार्याने जन्म घेतला व जे उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वृद्धीते पावले, त्याचे मूळ हे त्याचा ध्यास धरणाऱ्यांच्या पराक्रमात तर होतेच; मात्र त्या पराक्रमाला, त्या दृढनिश्चयाला खतपाणी घालणाऱ्या सह्याद्रीच्या अन् सिंधुसागराच्या प्रादेशिक दुर्गमतेतही होते. भूगोलाच्या कुशीतच इतिहास जन्म घेत असतो हे एक दुर्लक्ष न करता येण्याजोगे अन् विसरता न येण्याजोगे ऐतिहासिक सत्य या निमित्ताने आपल्या सामोरे येते.
शिवछत्रपतींपर्यंतच्या अठराशे वर्षांच्या इतिहासात जवळपास प्रत्येक राजकुळाने सह्यद्रीच्या खांद्याचा आधार घेत आपापल्या साम्राज्यांचा विस्तार करतानाच त्या साम्राज्याला स्थिरताही बहाल केलेली दिसते.
डॉ. मिलिंद पराडकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...