भाग ६
उपरोक्त कारणांमुळे जेव्हा सतराव्या शतकातील मराठय़ांच्या इतिहासाची मीमांसा करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या ऐतिहासिक कारणांमागचा वा प्रसंगांमागचा भूगोल विसरणे ही घोडचूक ठरते. शिवछत्रपतींनी जेव्हा एका विवक्षित भौगोलिक प्रदेशात स्वराज्याचा डाव मांडला, तेव्हा तेथल्या सामाजिक जीवनाला, सर्वसामान्यांच्या मानसिकतेला, राजकीय व आíथक अवस्थेला स्पर्श करणाऱ्या भौगोलिक मर्यादांचे आकलन त्यांना निश्चितपणे झालेले होते. सह्याद्रीच्या भूगोलाचा अन् त्या भौगोलिक परिसीमांमध्ये राहणाऱ्या जनसामान्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा वापर करीत त्यांनी हा डाव मांडला. सह्याद्रीच्या भूगोलाचा नेमका वापर करीत त्यांनी आधीच विकसित असलेल्या गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीला भूगोलाने बहाल केलेल्या तिथल्या सामान्यजनांच्या मानसिक व शारीरिक कणखरपणाची नेमकी जोड दिली. या सर्वसामान्य लोकांचा नेमका उपयोग केला अन् ध्येयासक्ती व ध्येयसिद्धी म्हणजे काय ते अवघ्या जगाला दाखवून दिले.
तत्कालीन आíथक परिस्थितीचा विचार केला तर मराठय़ांच्या या स्वातंत्र्ययुद्धात सह्यद्रीच्या याच भूगोलाने मदत केल्याचे आपल्याला दिसते. अतिशय अवघड भौगोलिक प्रदेश अन् तेवढेच अवघड ऋतुमान या दोहोंच्या मेळातून जे काही उत्पन्न हाती लागेल व ज्यातून रोजच्या गरजा भागविणेही कठीण अशी तिथल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था होती. त्यातूनही परकीय राज्यकर्त्यांचे पोटावर अन् मनावर होणारे आघात यामुळे या प्रदेशात राहणाऱ्या मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला इथला माणूस पुरता गांजलेला होता. अस्मानी अन् सुलतानी असे दोन्ही आघात झेलत असताना त्यांच्या उत्थानासाठी कुणी उभे ठाकते आहे याची जाणीव होताक्षणी आपल्या सर्वशक्तीनिशी तो सर्वसामान्य माणूस शिवछत्रपतींच्या पाठीशी उभा राहिला अन् त्यांनी हाती घेतलेले कार्य यशस्वी होण्यात मग कोणतीही अडचण आली नाही.
No comments:
Post a Comment