विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 September 2020

#बुवाजी_पवार - #विश्वासराव

 








#बुवाजी_पवार - #विश्वासराव

पोस्टसांभार :रोहित शिंदे 

#जिवंत_सुटण्याची_खात्री_असतानाही_स्वराज्य
#निष्ठेपायी_मृत्यू_स्वीकारणारा_वीर

बुवाजी पवार, फक्त पवारांच्या वनशावळीत आणि कैफियतीत शिल्लक राहिलेले नाव. सर्वभक्षी काळ जसा स्वतःच्या कवेत वर्तमानाचे भूतकाळ करत सर्व काही गडप करतो नेमके त्याच पद्धतीने इतिहासाने बुवाजीस गडप केले.

आज इतिहास चाळताना पवारांचे नाव काढल्यावर आपल्या ला गडद अक्षरात धार व देवास च्या पवारांची तलवार आकाशातील विजेप्रमाणे चमकताना दिसते. पण ह्याच मांदियाळीत स्वराज्याचा एक विषवासराव स्वराज्य साठी धारातीर्थी पडून ही स्वराज्याच्या मातीसाठी मुकला होता. त्या विराचेच आज आपण हिथे समरण करूया.

बुवाजी, एक इमानी रक्त. पिढीजात आणि खानदानी स्वराज्य निष्ठा काय असते? ह्याचे मूर्तीमंत उदाहरण.
बुवाजीस स्वराज्य हा केवळ शब्द नसून जगण्याचे ध्येय होते. ह्या स्वराज्यासाठी त्याच्या आधीच्या दोन पिढ्यांनी ही रणभूमीवर रक्त सांडले होते. आणि आता बुवाजी त्याच्या दोन्ही बंधूसह दिवस रात्र स्वराच्यासाठी झटत होता.

तो काळच तसा निर्वाणी चा होता. कारण खुद्द औरंजेबाने स्वराज्या समोर उभा दावा मंडला होता. समपायचे किंवा समोरच्यास सम्पवायचे ह्याच पवित्र्यात तो डाव टाकत होता. तैमुरी रक्ताचा त्याला अतिशय माज होता.

परन्तु भर गोंधळात भवानीच्या नावाने पोत जाळणारे मराठे त्याचे हेच तैमुरी रक्त दखहन च्या पठारावर गेले एक तप आटवत होते.

ह्या रणधुमाळीत धाकल्या धन्याच्या रुपात मराठ्यांनी आपला रुद्र मात्र कायमचा गमावला होता. तेवढे करून औरंगजेब आता शेवटचा घाव घालण्यासाठी राजाराम महाराजांचा पिच्छा पुरवत होता. परन्तु जन्मतःच थोरल्या महाराजांचा मुत्सद्दीपणा घेऊन जन्मलेल्या ह्या शिवपुत्राने औरंगजेबाचा डाव त्याच्यावरच उलटवला होता.

जिंजी चा बंदोबस्त करण्याच्या नादात त्याने बऱ्याच फौजा कर्नाटकात घुसवल्या होत्या. हिठेच डाव साधत
जिंजी वरून स्वामींनी ही प्रत्येकास पिढीजात किताबाने पुन्हा नवाजून, नवे मनसुबे देत महाराष्ट्रात रवाना केले होते.

ह्या मानमरातबीत पवारांच्या वाट्यास ही विशेश असे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पागेतील तेहतीस सरदारांपैकी एक आशा मल्ल प्रमाणे शक्तिशाली, धैर्यशील, महान व गंभिर कृष्णाजी पवरांच्या ह्या दोन पुत्रास छत्रपतींनी

अनुक्रमे बुवाजी पवार ह्यांस "विश्वासराव" हा किताब देत ७९०००/- चा सरंजाम व केरोजी पवार ह्यांस "सेनाबारा सहस्त्री" व इतर सरंजाम दिला होता.

छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेस प्रमाण मानून मराठ्यांनी ही आता महाराष्ट्रातील ह्या उघड्या पडलेल्या मोघली मुलखातून स्वतःची घोडी नाचवण्यास सुरवात केली होती.

जवळ जवळ दोन तप शिपाइगिरी करणारा बुवाजी पवार ही कुठे कमी पडत न्हवता. दक्षिण दिग्विजय च्या मोहिमे पासून त्याची तलवार स्वराज्य साठी तळपत होती.

बुवाजीने शिपाइगिरी ची शर्थ करत बागलाण खानदेशात तबबल तीन वर्षे अक्षरश थैमान घातले होते. घरात स्वराज्यासाठी खपलेल्या दोन पिढ्यांकडून जन्मजात गनिमिकाव्याचे बाळकडू मिळाल्याने अतिशय वेगवान हल्ला करून कमी वेळेत शत्रूची जास्तीत जास्त नासधूस करण्याचे इंगित त्यांना चांगलेच अवगत होते. त्या जोरावर त्यांनी मोगलांना जवळ जवळ दे माय धरणी ठाय करून ठेवले होते. मोगल जर निवांत झाले की बुवाजी चा छापा पडलाच म्हणून समजा.

खानदेश अन बागलनातील प्रत्येक नगर, गाव, खेडी बुवाजींनी घोड्याच्या टापांनी तुडवली होती. तिथला मोगलांचा सम्पूर्ण महसूल बुडाला होता. व्यापार सम्पला होता. दळणवळण ही ठप्प झाले होते. व्यापारी सैन्य छावणी शिवाय प्रवास करणे बंद केले होते. छावणीत ही त्यांना जीवाची व मालाची शास्वती न्हवती. कारण बुवाजी कधीही, कोठूनही येऊन काळ बनून पुढे येत असे.

खानदेश बागलाण पूर्णपणे पिंजून काढल्यावर बुवाजीं च्या सैन्याची घोडी आता पूर्वी व्हराड प्रदेशात मोगलांच्या नाकावर टिचून घासदाना करू लागली होती.

परंतु मोघल मात्र पूर्ण हतबल होते. यशाच्या चढत्या काळात मोघल किमान प्रतिकाराच्या मुद्रेत तरी असत पण हल्ली बुवाजींनी त्यांना पाक बचावाच्या पवित्र्यात ढकलले होते.

त्यास कारण म्हणजे मराठ्यांना साजेशी अशी बुवाजीची युद्धनीतीच तशी अतिशय वेगवान असे.

पूर्णपणे बेसावध व स्वतः च्याच जगरहाटीत गुंतलेल्या नगरांवर वादळाच्या वेगाने बुवाजी येऊन कोसळत व सर्व काही उध्वस्त करत, चक्रीवादळाप्रमाणे उरलेले सर्व काही स्वतः च्या अजान बाहुत सामावून घेत पुढच्या नगरांवर आदळण्यास निघून जात.

ह्या हातघाई च्या प्रसंगात खानदेशास जास्त तडाखे बसले होते. त्यामुळे तेथील जमीनदार ही बुवाजींवर डुख धरून बसले होते. पण बुवाजींच्या तलवारीस त्याची फिकीर न्हवती. तीला आता मोघली रक्ताची चटक लागली होती. तिची ही चटक यशस्वी स्वारी नंतर तापी च्या पाण्यातच शांत होत असे.

कितीही शर्थ केली तरीही सुस्त मोघलांस बुवाजीस आवर घालणे जमत न्हवते. त्यास कारण ही त्यांची मदमस्त हत्तीच्या चालीने होणाऱ्या लष्करी हालचाली.
ह्या हालचाली मराठ्यांच्या ह्या विश्वासरावी अश्वनायकास थोपवण्यास असमर्थ होत्या.

सतत तीन वर्षे खानदेश,बागलाण, पूर्वी व्हराड बुवाजीनीं पायदळी तुडवला होता. त्यामुळे बुवाजी ह्या भागात मोगली नामुष्की चे प्रतीक बनले होते.

परंतु मोघल असमर्थ होते. ही असमर्थता मोघली शमशेरीची नसून शमशेर पकडणार्या सुस्त मनगटांचा होती. सुस्त मोघल शक्यतो बुवाजी चा पाठलाग टाळत असे. त्यास कारण ही तसेच होते.

सुरवातीस मोघल बुवाजींचा पाठलाग करत पण बुवाजींच्या फौजा लांब रानावनात पळून जात व पळत असताना मधेच गिर्ड झाडीत अचानक मागे वळून हल्ला करत. ह्या हल्ल्यात झाडीत आधीच लपून बसलेले ताज्या दमाच्या मराठी तुकड्या ही बिनचूक पणे सावज टिपत.
ह्या आशा पाठलागात मराठ्यांनी मोगलांच्या अनेक घोडदळाच्या व पायदळाच्या तुकड्यांचा नाश केला होता.

तापी व गोदावरीच्या सर्व दर्याखोऱ्यात बुवाजी पवारांनी मोघलांना पार तोंडाला फेस येई पर्यंत पळुवून पळवून कुतवले होते.

त्यामुळे ह्या आशा प्रकारा मुळे मोघल शक्यतो छावणी सोडत नसत. त्यांना बुवाजी स्वतःच्या टप्प्यात हवा होता. बुवाजी पुन्हा आपल्या छावणी वर चालून आल्यास आपण नक्की त्याच आपल्या तोफा,बंदुका व तिर कमानी सह त्यास अस्मान दाऊ ह्या विचारात मोघल सरदार हातात हुक्क्या ची नळी घेऊन तोंडा वाटे धुराचे लोट सोडत रात्रभर गाद्या गिरड्या वर चडफडत लोळत पडत असे.

बुवाजी रात्रं दिवस मोघलांच्या डोळ्या देखत आपली घोडी नाचवत होते. मोघलांना बुवाजी स्वस्थ मात्र बसू देत न्हवते. बुवाजी पवरांनी मोघलांना अक्षरक्ष घायतुकीला आणले होते.

बुवाजी पवारांनी तापी व गोदावरीच्या प्रदेशात मोठी धामधूम उठवली होती.

ह्या तीन वर्षात खानदेश, बागलाण, पूर्व व्हराड ह्या मुलखात सतत यशस्वी हल्ले करून बुवाजींनी मोगलांची मुलकी व लष्करी अब्रू पाक तापी व गोदावरीच्या पाण्यात बुडवून पार तळाला न्हेली होती.

खानदेशात काही ठिकाणी स्थानिक जमीनदारांकडून बुवाजीस चौथ ही मिळू लागली होती.

चौथ च्या रूपात हा जो काही विजयाचा यशस्वी टिळा बुवाजींच्या माथी लागला होता. ह्यात बुवाजींचा पराक्रम व मोघलांच्या सुस्त हालचाली ह्या व्यतिरिक्त अजून एक विजयाचे गमक होते. ते म्हणजे पंत सचिव शंकराजी नारायण ह्यांच्या नियंत्रणात इतर सरदारांच्या नाशिक व नगर भागातील हालचाली.

हे सरदार बुवाजींचा सतत पाठपुरावा करत.बुवाजीशी समनवव्य साधत इतर ठिकाणी ही हे छापे टाकत त्यामुळे मोघलांस तिकडे लक्ष देणे गरजेचे होत.बुवाजीस प्रत्युत्तर देन्यासाठी आपापल्या गोटातून बाहेर पडणाऱ्या मोघली फौजेस हे अडवत किंवा मागाहून त्यांच्या मूलखास उपद्रव देत . व बुवाजींच्या मागावर असलेल्या मोघली हशमांची ही लंगड तोड करत. त्यामुळे ही ह्या मोघल तुकड्या कधीच बुवाजी पवारांच्या पाठलंगाच्या वेळी ही समयास पावत नसत.

तिकडे दक्षिणेत कावेरी पलीकडे जिंजीस मात्र लढाईस वेगळस रंग चढत होता. झुल्फिरकार खान लागोपाठ गेली चार वर्षे नुसता झोंबा झोंबी करत असल्याने बादशाहने त्यास तंबी दिली होती. व शहजादा आणि वजीर ह्या दोघांस ही त्याच्या मदतीस पाठवले. त्यामुळे नाइलाजाने का होईना तो आता चिवटपणे झुंझु लागला होता. जिंजी डोंगरास त्याने आता खरोखर आपली लष्करी चुणूक दाखवण्यास सुरवात केली होती.

त्यामुळे स्वामींनी ही आदेश पाठवून देशावरील बरीच फौज सेनापती संताजी घोरपडे व धनसिंगराव धनाजी जाधव ह्यांच्या नेतृत्वात दक्षिणेत मागवली होती.

त्यामुळे नाशिक - नगर मधील बुवाजींचा पाठपुरावा करणारे इतर सरदार ही सेनापती सोबत दक्षिणेच्या वाटेने गेले.

परंतु बुवाजींना ह्याच प्रेदशात कार्यरत ठेवण्यात आले होते. हिकडे इतर्वसरदारांच्या अनुपस्थितीत मात्र बुबाजी एकटे पडले होते.

परंतू ते नाउमेद होऊन स्वस्थ बसणार्या पैकी न्हवते. जुन्याच कामगिरीवर नव्याने फेरनियुक्ती झाल्याने बुवाजी पवार पुन्हा जलद गतीने तापी - गोदावरी च्या खोऱ्यात धुमाकूळ घालण्यास परतले होते.

ह्या समयास मराठ्यांच्या फौजा कर्नाटकात घुसल्याने उभ्या हिंदुस्थान चे डोळे तिकडे लागून राहिल्याने, बुवाजी पवारांस हिकडे तापी - गोदावरी खोऱ्यात सम्पूर्ण रान मोकळे होते. मुख्य मोघल छावणीस हिकडे लक्ष देण्यास फुरसतच न्हवती. याचा बुवाजी ने जोरदार लाभ घेतला.

बुवाजींच्या पथकाची घोडी पुन्हा खानदेश बागलाण आणि व्हरडात थैमान घालू लागली होती. तापी - गोदावरीच्या खोऱ्यातील सम्पत्तीचा ओघ पुन्हा सुपे च्या मुख ठाण्याकडे वाहू लागला होता. अनेक जमीनदार नाइलाजाने का होईना पण चौथ सुपे ला पोहचवता होते.

मुख्य छावणीतून कुमक न येता शिव्यांची लाखोली मात्र खानदेश बागलनातील ठाणेदारांस वाहिली जात होती. कारण आधीच्या काळात बुवाजींच्या पथकास इतर मराठा सरदारांचे पाठबळ होते. परंतू सध्या वर्तमानात कुल फौज जिंजीस स्वामींच्या सेवेस गेल्याने सध्या बुवाजी एकटेच मोगलांचा त्यांच्याच प्रदेशात फडशा पाडत होते.

ठाणेदारांस आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. एकटा मराठा सरदार सर्व ठाणेदारांस वेठीस धरतो पण मुघल समशेर त्यास कोठेच अडवण्यास यशस्वी होत नसल्याने ते आता क्षुब्ध झाले होते.

शेवटी एकमेकांचे द्वेष,मत्सर,हेवेदावे बाजूला सारून नाइलाजाने का होईना पण मुख्य बादशाही छावणीच्या आदेशाने त्यांनी आपापसात समनव्यव साधण्यास अनुकूलता दाखवली.

उशिराने का होईना त्याचे सकारात्मक परिणाम ही उमटू लागले होते. मोघल ठाणेदारांच्या योग्य समन्यवय्याने बुवाजीस आता एक ठिकाणी जास्त वेळ थांबण्यास जमत नसे. बुवाजीने केलेला हल्ला रंगात येताच व मुख घाव घालण्याच्या तयारीत असतानाच रणांगणात अचानक पणे जादाची मोघल फौज गोळा होत असे. व नाइलाजाने का होईना नुकसान टाळण्यासाठी बुवाजीस मैदानातून पाय काढून निघून जावे लागत असे. काही ठिकाणी रनागंणातून बाहेर पडल्यावर ही त्यांचा पाठलाग होत असे. नंतर नंतर तर मोघल त्यांच्या मागावर रानावनात आतपर्यंत घुसू लागले होते. त्यांस आता इतर ठिकानुहून ताज्या कुमकेची शाशवती असे.त्या जोरावर ते धाडस करू लागले होते.

ह्या सर्व प्रकाराने बुवाजींच्या छापयांवर हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. पण त्या पूर्ण पणे बंद न्हवत्या झाल्या.

एकत्र येऊन सुद्धा मोघल हे प्रतिक्रियावादी होते. जिथे बुवाजींचा छाप पडत तिथे ते त्यांस अडवत. परंतू ते स्वतःहून त्यांचा माग काढण्यास अजूनही तापी गोदावरी च्या दऱ्या खोऱ्यात पायपीट करत न्हवते.

त्यामुळे बुवाजी ही ह्या प्राप्त परिस्थितीत स्वतःचे जेमतेम भागवून घेत होते. व जमेल तसा प्रतिकार करत लूट व चौथ गोळा करत होते.

त्यामुळे मोघल ठाणेदारांना तेथील मोघल सरदारांशी संधान साधत थोडे पुढे सरकने आवश्यक वाटू लागले होते.

त्या साठी त्यांनी खान्देशातील जमीनदारांना कछपी लावत,स्वराज्याच्या ह्या विश्वासरावावर फास टाकन्याचा प्रयत्न करू लागले.जमीनदारांना ही बुवाजी पवार नावाची ब्याद आता नकोशी झाली होती. त्यामुळे बुवाजी पवारांना अडकवण्यास सर्वे एकत्र एकटवले होते.

बुवाजी पवारांना ही ह्या सर्व खबरा कळत होत्या. पण सध्याच्या अवघड प्रसंगात जमेल तसे हिमतीवर तोलून न्हेण्याचा त्यांचा निर्धार होता. कारण सुप्यास स्वस्थ बसले तर मोघल पुन्हा शिरजोर होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांची कायम दमछाक करत त्यांना वाकूवून ठेवणे हाच पर्याय होता. व बुवाजी त्यास कायम जमेल तसा हुन्नर लावून प्रयत्नशील असे.

१६९३ चे साल आता सरत आले होते. बुवाजींचे धावपळीचे छापे पडतच होते. मोघलांच्या एकत्रित प्रयत्नाने का होईना बुवाजींचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला होता. पण बुवाजी काही हाती लागत न्हवते. पण मोघल ही त्या साठी टपून बसले होते.

ह्यावेळेस खानदेशात तापी तीरावर बुवाजींचा मुक्काम पडला होता. सतत तीन वर्षांच्या स्वाऱ्या न मुळे परिसर तसा पायखालचाच झाला होता. छावणी ही हुशार होती.

परंतू आकाशात जसे काळे ढग जमतात तसे मोगलांचे अनेक हिरवे निशाण छावणी भोवती गोळा होऊ लाघले होते. एकूण अंदाज घेऊन छावणी ही आता सावध झाली होती. बुवाजी पूर्ण निर्धाराने समोर शड्डू ठोकून उभे होते.

दिन दिन आवाज करत मोघल दात ओठ खात पुढे सरकत होते. मराठे ही त्यारीतच होते. सावज अंतिम टप्प्यात येताच बुवाजी पूर्ण ताक्तिनिशी अतिशय त्वेषाने त्यावर तुटून पडले. हर हर महादेव आणि दिन दिन च्या आरोळ्यांनी सम्पूर्ण आसमंत दणाणून सोडला.

मोगलांची एकत्रित संख्या जास्त होते. ह्यात सर्व ठाणेदार व मोघल सरदार व स्थानिक जमीनदारां चे माहितगार ही होते.

तरीही त्यांस सुरवातीस जबरदस्त तडाखे बसले. जास्ती च्या संख्याबळावर मराठयांना आपण सहज मात देऊ शकू हा विचार मराठ्यांनी प्रहर भरातच अनेक हशमां न बरोबर जमिनीवर लोळवून टाकला. लवकरच काही तरी दुसरा हुन्नर लावावा लागेल नाही तर हा हाती आलेला मराठा रुस्तम आपलेच हात धडा पासून वेगळे करून पुन्हा निघून जाईल ह्या विचाराने मोघल भानावर येऊ लागले.

मोगलांनी लगेच दुसरा डाव टाकत रणनीती बदलली. बघता बघता सर्व मोघल बुवाजी भोवती गोळा होऊ लागले. त्यामुळे रानातील इतर मोघली तुकड्या मराठ्यांच्या तावडीत सापडून मक्याच्या कणसागत कापल्या गेल्या. परंतू मोघल सरदारांस त्याची फिकीर न्हवती. एकट्या बुवाजी ला सम्पवण्यासाठी ते आज कितीही हशम कुर्बान करण्यास तयार होते.

बघता बघता गर्दी ने बुवाजीस घेरले होते. हाताखालील सरदार इतर मोर्च्यांवर असल्याने त्यांना हालचाली करण्यास वेळ लागला.तिकडे मात्र अनेक हशम गारद होऊन ही मोघल आता जमेल तशी शमशेर चालवत इंच इंच पुढे सरकत होते.

त्यांनी त्यांचे लक्ष निश्चित केले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बुवाजी ला सोडायचे न्हवते. बुवाजी च्या घेर्यातील अनेक इमानी, निष्ठावन्त गडी बुवाजीस ह्या मोघली फेऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण अपुऱ्या संख्या अभावी त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. ह्या प्रयत्नात अनेक मावळे कटुन पडले होते. त्यामुळे बुवाजीं भोवतीचे मावळ्यांचे कुंपण आता सैल झाले होते.

आपले लक्ष्य अंतिम टप्प्यात दिसताच मोघल चेकाळून गेले होते. शेवटचा जोर म्हणून त्यांनी आपली घोडी अजून रेटाने पुढे घातली. समोर मात्र बुवाजी अजून ही तडफेने तलवार चालवत घोड्यावर स्वार होता. पण मोजक्याच मावळांसह एवढा संख्येने जास्त असलेला मोघली घोळ आवरने शक्य न्हवते. तरीही सर्व जान असूनही बुवाजी ने हा घोळका आपल्या छातीवर घेतला. काही वेळातच तिथे पुन्हा मोघली प्रेतांचा खच पडू लागला. प्रत्येक पडणाऱ्या प्रेतांबरोबर इतर शमशेरी द्वारे झालेल्या जखमांमुळे बुवाजी च्या शरीरातील रक्त ही ओघळत होते. बुवाजी चा पवित्र पाहून मोघल पूर्ण पणे बिथरले होते. परंतू हिथेच जमिनीला चिटकून उभे राहिल्यास आपल्या कष्टाचे चीज आजच आपल्याला मिळणार ह्याची खात्री मोघलांच्या डोळ्यात दिसू लागली होती.

बाहेरून इतर मराठा सरदार त्वेषाने झडप घालून हा घेर फोडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मोघलांच्या जास्तीच्या संख्येने त्यांस अडवून धरले होते.आधीच मूळ सैन्य संख्या कमी असल्याने रणांगणात मोगलांचा एकूण जोर ही वरचढ च होता. अनेक मावळे कामी आल्याने मराठ्यांची बरीच शी संख्या कमी झाली होती.

तिकडे काही निवडक साथीदारांसह अडकल्याने बुवाजी पूर्ण पने जखमी झाले होते. अंगातले त्राण ही आता आटत चालले होते. परंतू मनातील इच्छाशक्ती मनगटात पुन्हा बळ उभे करत होती. समोरून येणाऱ्या हशमावर सम्पूर्ण ताकततिने जोराचा घाव घालताना ह्यावेळस मात्र मनगट ढिले पडले. हाताची मूठ ही सैल झाली. त्याक्षणी हातातील तलवार ही गळून पडली. पाठोपाठ समोर च्या हशमंचा घाव वर्मी बसल्याने बुवाजी ही घोड्यावरून खाली कोसळले.

निशस्त्र व बेशुद्ध बुवाजी न वर क्षणात अनेक हशम धावले. परंतु मोघल सरदाराने त्यास अडवले. व बुवाजीस त्याच अवस्थेत उचलून आपल्या ताब्यात घेतले. व स्वैर मोघली ठाण्याकडे निघून गेला. तोपर्यंत रनातील मराठी पथक ही जवळ जवळ संपली होती. त्यामुळे मोघलांच्या पाठलाग ही होऊ शकला नाही.

बुवाजी हाती लागला तरी इतर ठिकाणाहून मराठे बुवाजीस सोडवण्यासाठी कधीही आपल्यावर धाड घालतील ह्या भीतीने मोघल ठाण्यावर जास्त वेळ थांबले नाही. लगोलग ते जखमी बुवाजीस घेऊन तापी पार होत बृहानपुरास पोहचले.

तोपर्यंत मुख्य छावणीत बादशाह कडे बुवाजींना जिवंत धरल्याचे खलिते ही तातडीने रवाना झाले होते.

बुवाजी रणांगणात पडले असते तर मोघल सरदारांसाठी विषय तिथेच सम्पला असता. परंतू बुवाजी जखमी का होईना जिवंत हाती लागल्याने आता त्याच्या पुढील आयुष्याचा निर्णय सर्वस्वी बादशाह च्या मर्जीवर अवलंबून होता.त्यामुळे बादशाह चा आदेश येयी पर्यंत मोगलांनी हा जिवंत निखारा विझवला नाही.

बादशहास अल्पकाळ का होईना प्रसन्न होण्याचे कारण मिळाले होते. तसे बुवाजींनी मोगलांचे अतोनात नुकसान केले होते. त्यामुळे तो बादशाह च्या रागास व शिक्षेसच पात्र होईल असा सर्वांचा कयास होता. परंतु आलम हिंदुस्थानचा कारभार हकणार्या आलमगीर औरंगजेब बादशाह बुवाजी पवारां सदर्भात स्वतःच्या मनात काही और च मनसुबे आखत होता.

त्याच्या पदरी अनेक पिढीजात नामवंत मराठा सरदार होते. परंतु ती फक्त वतन लालसे पोटी स्वाभिमान विकून गोळा झालेली जमात होती. त्यामुळे ह्या वतनदारांकडून विशेष काही घडत नसे.

गेले एक तप दखहन च्या ह्या लढाईत त्याला अनेक भले बुरे अनुभव आले होते. (बुरे च जास्त), मिळेल ती चटणी भाकरी खाऊन आपल्या स्वराज्यासाठी, माय माऊली धरणी साठी भगव्याच्या सावलीत लढणारे अनेक कदीम मराठे त्याने पाहिले होते. त्यामुळे त्याला आशा मराठा सरदारांची कायम हाव असे, पण हे सरदार कायम बादशाही वतनी तुकड्यास लथडत असे. बुवाजी पवार ही गेली तीन वर्षे छत्रपतींनी दिलेल्या सरंजामावर समाधान मानून इनामे इतबारे स्वराज्याची सेवा करत होते.

पण आता बुवाजी पवार बादशाह च्या मगरमिठीत सापडले होते. बादशहास बुवाजी काय ताकतीचा गडी आहे ह्याची पक्की जाण झाली होती. तापी - गोदावरी च्या खोऱ्यातील खानदेश, बागलाण,पूर्वी व्हराड मधील एक एक ठाणेदारांस बुवाजी ने सुटा करून लोळवला होता. हे बादशाह च्या लक्षात होते. उभी हयात स्वराज्य सेवेत गेल्याने मराठ्यांच्या लष्करी डावपेचांचा बुवाजी एक प्रकारे प्रतिबिंब होते.

त्यामुळे ह्या हिम्मतवानं गड्यास मारण्या पेक्षा त्याच्या गळ्यात मनसब ची माळ घालून ह्याला आपल्या मोगली गोटात वळवून मराठ्यांवर उलटवण्याचे कुटील बादशाह ने नक्की केले होते.बादशाह हा हरघडी राजकारणाचा रंग खेळणारा पट्टीचा मुत्सद्दी होता.

अनसयेच हातात पडल्याने औरंगजेब बुवाजीस विनाकारण गमवण्यास तयार न्हवता. रणांगण वरचा हा जातिवंत मोहरा बादशहास आता कोणत्याही परिस्थितीत मोघली बावट्या खाली हवा होता. ह्या हिऱ्यास बादशाह ला मोघली कोंदण चढवायचे होते. त्यासाठी त्याने तसे प्रयत्न ही चालू केले.

तशी मनसब ची पेशकस, मागील सर्व गुन्ह्यास माफी, भविष्यात उंची मान मरातब ह्या सर्व बाबींनी भरलेला भला मोठा शाही खलिता त्यांनी बुवाजीस बुऱ्हाणपूर कडे रावण केला.

हिकडे बुऱ्हाणपूर मध्ये बुवाजी कैदेत निचपत पडले होते. गेले तीन वर्षे खुद्द बादशाह च्या वास्तव्यात मुघलांना दे माय धरणी ठाय करून सोडल्याने ,आपल्या वाट्यास येणाऱ्या मृत्यू ची ते प्रतीक्षा करत होते. शत्रूस जिवंत न सोडण्याची मोघली रीत त्यात आपल्याच रक्ताच्या माणसांना व इतर निष्ठावनतानां वर कोणती ही दयामाया न दाखवणारा हा उलट्या काळजाचा क्रूर कपटी बादशाह आपले ही तसेच हालहाल करून मृत्यू च्या जबड्यात ढकलून इतरांसमोर एक उदाहरण ठेवणार ह्याची बुवाजींना खात्री होती.

परंतू बादशाही कावा पाहून बुवाजी पुरते हबखले होते.
जिवंत राहायचे असेल तर सध्यातरी ह्या शिवाय इतर कोणताही मार्ग बुवाजीस दिसत न्हवता.इतर संरदारांकडून ही मोगली गोटात येण्या समबंधी बुवाजींची मनधरणी सुरू झाली होती.

परंतू मोगलांनी अजून बुवाजी पवारांस पुरते ओळखले न्हवते. मृत्यू च्या दारात उभे राहून ही अतिशय स्पष्ट शब्दात ह्या मानी मराठ्याने मोघली मनसब नाकारली.
बादशाही कैदेत राहून बादशहा चा प्रस्ताव बुवाजींनी नाकारला होता. व तुम्हाला जो काय माझा निकाल लावायचा आहे तो लावून टका, पण मी मोघलां साठी तलवार हाती घेणार नाही. हे बुवाजीची अतिशय निर्धाराने सांगितले.

बुवाजींचा निर्धार पाहून मोघल अचंबीत झाले. परंतू बुवाजी आपल्या निर्णय वर ठाम होते.मोघली मनसब स्वीकारून आपल्या कुळास कोणताही बट्टा लावण्यास ते तयार झाले नाहीत. ह्या इस्लामी आक्रमण कर्त्यां विरुद्ध त्यांच्या कुळा चा संघर्ष गेली ७ शतके जुना होता. ह्या संघर्षात च ४ शतकांपूर्वी इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध च्या सत्ता संघर्षात त्यांच्या पूर्वजांना धार ची पिढीजात सत्ता गमवावी लागली होती.

पन तरीही पुढे ४ शतके नाउमेद न होता पवार कुळातील वीरांनी आपले अस्तित्व महाराष्ट्रात टिकवून ठेवले होते.

बुवाजीचें चे आजोबा साबुसिंह हे त्या पैकीच एक. त्यांच्या नंतर कृष्णाजी मग बुवाजी आपल्या बंधू सह गेली तीन पिढ्या स्वराज्य च्या सावलीत आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करत होते. त्यामुळे जीव वाचवण्याच्या नादात गेल्या तब्बल ७ शतकांच्या संघर्ष परंपरेस त्यांना डाग
लावायचा न्हवता.

बुवाजींच्या ह्या निर्णयाने बादशाह मात्र द्रिढमूढ झाला. हाती आलेला हा मराठ्यांचा हा वाघ त्याच्याच हट्टापायी गमवावा लागणार म्हणून मनातून तो खट्टू झाला.

स्वराज्य विचाराने प्रेरित झालेले मराठी मातीतील हे इमान मोगली मनसबी च्या तुकड्या च्या लालसेने आपल्याला कधीच विकत घेता येणार नाही ह्याचे बादशहास ज्वंलत उदाहरण मिळाले.

त्यामुळे चिडून त्याने बुवाजी पवार ह्यांना बुऱ्हाणपूर हुन तसेच उत्तरेत पुढे नेत आशिरगड च्या किल्ल्यात मृत्यू दंड देण्याची शिक्षा फर्मावली.

ह्या मृत्यू दंड चे स्वरूप ही अतिशय भयंकर होते. त्याने बुवाजीस #आशिरगड_च्या_तटबंदीच्या_भांतीत_जिवंत_पुरण्याचा आदेश दिला होता.

मोगलांनी ही आसुरी आनंदात ह्या बादशाही आदेशाचे काटेकोर पणे पालन करत

#बुवाजी_पवार_ह्यांस_आशिरगड_च्या_तटबंदीच्या_
#भिंतीत_जिवंत_पुरले.

बुवाजींना मराठ्यांच्या विरुद्ध उलटवण्याची बादशाही जिद्द बुवाजी पवरांच्या बलिदानाने जमीनदोस्त केली.

बुवाजी पवारांनी मृत्यू आणि मोघली मनसब या पैकी मृत्यू ची निवड केल्याने बादशहास छत्रपती शंभाजी महाराज ह्यांच्या पवित्र बलिदान प्रसंगा नंतर पुन्हा एकदा मराठ्यांच्या राष्ट्रीय चारित्र्याची पुरेपूर जाणीव झाली होती.

बुवाजींनी ही आपल्या निर्णयाने छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेला #विश्वासराव हा किताब स्वतः बरोबर अजरामर केला.

तर अशी होती ही बुवाजी पवार ह्यांच्या बलिदानाची कथा.

एन काळ्याकुट्ट वादळात अक्समत पणे क्षणभर वीज चमकावी, तसे बुवाजी पवार - विश्वासराव तापी गोदावरी च्या दर्याखोऱ्यात चमकून गेले.

त्यांचे बलिदान मात्र मराठ्यांनी व्यर्थ जाऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यू च्या सहा वर्षातच त्यांच्याच समकुळातील कृष्णाजी सावंत - पवार ह्यांनी नर्मदा ओलांडत माळव्यात धुमाकूळ घातला. कोण जाणे बुवाजींच्या प्रेरणेने आणि आंत्तरत्म्यानेच त्यांना तिकडे खेचले नसावे ?

पुढे लवकरच शाहू काळात छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच नियंत्रणात राहून खुद्द बुवाजी पवारांच्या नातवांनी मुघलां विरुद्ध यशस्वी संघर्ष करुन तब्बल ४०० वर्ष नंतर माळव्यात धार येथे पवारांची सत्ता स्थापन केली. जी पुढे १९४७ पर्यंत अस्तित्वात होती.

पुढे उत्तरेतील प्रत्येक संघर्षात पवारांनी मराठा साम्राज्या साठी तलवार चालवली. पानिपत च्या युद्धातील यशवंतराव पवार ह्यांचा
(पानिपत च्या भर युद्धात यशवंतरावांनी गोविंदपंत खोत- बुंदेले ह्यांचा खून करणाऱ्या अताईखानाचा त्याच्याच हत्तीवर चढुन हात व शीर धडा वेगळे केले होते.)

व खरड्याच्या युद्धात कोवळ्या वयातील तुकोजीराव पवार ह्यांचा पराक्रम आजही लोकांच्या लक्षात आहे. तुकोजीराव ह्यांच्यावर पोवाडे ही आहेत.

पण जीव वाचवण्याची संधी असून ही मृत्यू चे वरण करणाऱ्या बुवाजी चें मात्र इतिहासाने काहीच देने ठेवले नाही. स्वराज्य निष्ठे पायी मृत्यू स्वीकारणाऱ्या ह्या विरास लोक मात्र आज विसरून गेले.

बाजीप्रभू, मुरारबाजी,तानाजी ह्यांस प्रमाणे बुवाजींना मात्र ना शाहिरांच्या पोवाड्यात स्थान मिळाले ना शाहिरांच्या डपावरील कौतुकाची थाप मिळाली.

याने मात्र बुवाजींचा पराक्रम तुसभर ही कमी नाही झाला. ते त्यांचे स्वराज्य कर्तव्य निभावून मृत्यू रूपाने काळावर स्वार होत सुर्यनारायनाच्या रथात बसून स्वर्गात आपल्या पूर्वजांच्या व थोरल्या व धाकल्या छत्रपतींच्या सेवेस कायमचे निघून गेले.

त्यांच्या माघे मात्र ह्या भूतलावर तापी - गोदावरी च्या मधला प्रदेश आज ही त्यांचा पराक्रम आपल्या उरात साठवून आहे.

कोण जाणे कदाचित आज ही ह्या तापी - गोदावरी च्या दर्याखोऱ्या तील वाहणारा वारा तसाच उत्तरेकडे कूच करत आशिरगड च्या तटबंदीत कैद असलेल्या स्वराज्याच्या ह्या विश्वासरावांच्या अवशेषांवर त्यांनीच केलेल्या पराक्रमाच्या आठवनींची फुंकर ही घालत असेल.

पण आम्ही इतिहासप्रेमी म्हणून स्वराज्याच्या ह्या विश्वासरावांच्या आठवणींचा वारसा जपण्यास पूर्ण अपयशी ठरलो.

तर अशा प्रकारे मराठ्यांचा भगवा ध्वज हयात भर दखहन च्या पठारावर व शत्रूच्या छाताडावर नाचवणारे स्वराज्याचे विश्वासराव बुवाजी पवार ह्यांच्या अपरिचित आशा पराक्रमांस व बलिदानास शत - शत नमन.

पवाराचे वंशी उजळिला दिप।
नर देहा येऊनी सार्थक केले।।

पवार कुळाचा ध्वज डौलात झळकला रणी |
जय भवानी जय शिवाजी नाद घुमला गगनी |

- दोन्ही कवनांचा कर्ता अज्ञात आहे.

समाप्त

लेखक
रोहित शिंदे

संदर्भ -

देवास च्या पवारांचे कागतपत्र
शिवपुत्र छत्रपती राजाराम
सेनापती धनाजी जाधव
औरंगजेब
संताजी (परिशिष्ट)
क्षत्रिय धार पवार(वेब)
श्रीमंत राजे पवार घराणे(वेब)
धार चे प्रशाशक मराठा पवार घराणे (वेब)
मराठा रियासात
दुर्ग भरारी(ब्लॉग)

चित्र साभार
आंतरजाल

टीप -

विश्वासराव - बुवाजी पवार ह्यांच्या बद्दल अतिशय त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख बनवण्यासाठी व त्यांची कामगिरी वाचकांना समजवण्यासाठी अनेक ठिकाणी शब्दस्वातंत्र्य घेतले आहे.

काही अभ्यासक बुवाजी पवारांच्या मृत्यूचे साल हे
इ.स.१६९९ हे मानतात. परंतू ज्येष्ठ वं थोर इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सर बुवाजींच्या बलिदानाचे साल इ.स. १६९३ नोंदवतात. व त्यास अनुसरून मी ही इथे पवार सरांचेच मत ग्राह्य धरले आहे.

खाली दिलेले योध्याचे चित्र हे मूळ चित्र नसून प्रतिकात्मक आहे.

लेख पूर्ण वाचून आपल्या प्रतिक्रिया खलील कमेंट बॉक्स मध्ये कळवाव्यात.

लेख आवडल्यास सदर लेख शेअर करून आपला अज्ञात असा गौरवशाली इतिहास सर्वां पर्यंत पोहचवण्यास मदत करावी.

सदर लेख व्यतिरिक्त अजून ही काही इतर ऐतिहासिक लेख वाचायचे असल्यास खलील दुव्याचा वापर करावा.

http://durgmavala.com/blog/

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...