विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 October 2020

सुरत लुट आणि खजिना


सुरत लुट आणि खजिना
_________________
'ही गोष्ट सुरु होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा, पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुतीतला प्रचंड ऐवज हरवला ! कुठे गडप झाला हा खजिना?' असं कथानक घेऊन एक उत्कृष्ट कादंबरी रचली गेली जी सद्ध्या चर्चेत आहे. पण इतिहास याबद्दल काय सांगतो याचा 'शोध' अस्सल साधनातून आपण घेऊया. सतराव्या शतकात सुरतेची बाजारपेठ अतिशय समृद्ध आणि कोट्याधीश व्यापाऱ्यांची पंढरीच होती. हीच सुरत यापूर्वीही शिवाजी महाराजांनी इस १६६६ साली लुटून बरीच संपत्ती स्वराज्यात दाखल केली होती. यानंतर १६७० साली शिवाजीराजांनी पुन्हा सुरतेवर हल्ला चढवला. प्रथम महाराज कल्याणला आले तेथून पंधरा हजाराच्या फौजेनिशी सुरतेत थडकले. २ ऑक्टबर ते ५ ऑक्टोबर असे तीन दिवस सुरतेची धूळधाण केली. या लुटीत शिवाजी महाराजांना एकूण ६६ लाख रुपये मिळाले. या लुटीदरम्यान शिवाजी महाराजांनी एकीकडे सुरतेतल्या डच, फ्रेंच आणि इंग्रज वखारिंना अभय दिले तर दुसरीकडे मुघल अधिकाऱ्यास पत्र लिहले कि, "दरसाल १२ लाख रुपये न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी उरलेले शहर जाळून टाकेन". सुरत लुटीने मुघलांना चांगलाच धक्का बसला. लुटीच्या तिसऱ्या दिवशी (५ ऑक्टो) महाराज अचानक सुरत सोडून गेल्याची बातमी पसरली. सुरतेहून महाराज पेठ - बागलाणमार्गे मुल्हेरकडे (नाशिक जिल्हा) निघाले. साल्हेर-मुल्हेरवरून चांदवडास येऊन कंचनमंचन घाटाने कोकणात उतरणार असे मराठ्यांच्या हालचालीवरून दिसते . पंधरा हजाराच्या फौजेनिशी महाराज चांदवडनजीक आले. मुघल सेनापती 'दाऊदखान कुरेशी' याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणि १७ ऑक्टोबर १६७० रोजी घनघोर युद्ध होऊन त्यात मुघलांचा पराभव झाला.तीन हजार मुघल मारले गेले. हि लढाई 'वणी-दिंडोरीची लढाई' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांना सुरतहून आणलेल्या लक्ष्मीसह अडविण्याचा मोगली प्रयत्न पार धुळीस मिळाला. उघड्या मैदानावर देखील विजय प्राप्त करू शकतो हा मराठ्यांचा विजयिष्णू भाव जागृत होऊन त्या भागातील अलंग,कुलंग,त्रिंगलवाडी हे गडहि स्वराज्यात दाखल झाले. विजयी शिवाजीराजे नाशिकमार्गे सहीसलामत हरिश्चंद्रगडा जवळील 'कुंजरगडावर' येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोबर अखेरीस रायगडावर पोहोचले. हि सर्व हकीगत पाहता सुरत लुटीचा खजिना सुखरूप स्वराज्यात पोहोचला असे म्हणावयास हरकत नाही. मुघलांचा हेतू होता शिवाजीराजांना अडवणे आणि महाराजांचा हेतू होता सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षित घेऊन जाणे, आणि यात शिवाजी महाराज यशस्वी झाले.
.
रोहित पवार

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...