शहाजीराजे भोसले व छत्रपती संभाजी महाराज यांची प्रत्यक्ष भेट
शिवभारतकाराने म्हटल्याप्रमाणे शहाजी महाराजांनी 12 वर्षांच्या शिवबास बेंगलोर हून सनय होऊन जिजाऊ सोबत पुण्यास पाठविले. (सनय म्हणजे राजनीति, युध्दनिती मध्ये जाणते करून ). तद्नंतर शिवाजीराजांनी स्वराज्य विस्तार केला. जावळी घेतली. अफझलखानचा वध केला. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले. याचवेळी सिद्धी जोहरने विष पिऊन आत्महत्या केली. नेमक्या याच काळात शायिस्तेखान दक्षिणेकडे आला होता. परांडा प्रांतात त्याची छावणी होती. याच दरम्यान शहाजी महाराज आदिलशहा परवानगी देत नसतानाही त्यास जबाब देतात, "बहोत काळ लोटला आम्ही आमच्या कुलदैवतांचे दर्शन घेतले नाही. आमच्या उन्नतीसाठी आम्ही आमच्या देवांस नवस केला असून तो पुरा करण्यासाठी महाराष्ट्रात जात आहो. त्या योगे मुलास (शिवाजीस) चार सबुरीच्या गोष्टी सांगून होतील. आपले मुसलमान लोक मक्केस जातात. तैसे आम्ही देवदर्शनाला महाराष्ट्र देशी जाऊन येतो."असे सांगून शहाजी महाराज शिवबा व जिजाऊंचे भेटीला येतात. वाटेत ते तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर आदि देवतांचे दर्शन घेऊन फलटणास मुक्कामी येतात. तोवर शिवाजी महाराज जिजाऊ आणि सर्व कुटुंब सोयराबाई , शंभूराजे आदि सगळे पुण्याहून निघतात. भेट जेजुरी गडावर खंडोबाच्या दरबारी घ्यायचे ठरलेले असते. शिवाजी राजे मोरोपंतास पालखी घेऊन शहाजी महाराजांना घेऊन येण्यासाठी पुढे पाठवून देतात. स्वतः शिवाजी राजे मागाहून कोस दोन कोस पायी चालत जातात. शहाजी महाराजांच्या पादुका आपल्या हातात घेऊन स्वये पालखी सोबत चालतच जेजुरी गडावर येतात. सर्वांच्या गाठीभेटी होतात. मोठा सोहळा होतो. यज्ञ होम पूजा विधी संपन्न होतो. शहाजी महाराज आपल्या नवसाची पूर्तता म्हणून श्री खंडोबा देवाला लक्ष रूपयांच्या सुवर्ण मूर्ती व छत्र दान करतात. याच ठिकाणी शहाजी महाराज, जिजाऊ, शिवाजी महाराज व शंभूराजे यांची भेट झाल्याचे मल्हार रामराव चिटणीस आपल्या सप्तप्रकरणात सुंदर उल्लेख करतो. शहाजी राजे शिवाजी महाराजांच्या सोबत पुण्यास व राजगडावर राहतात. स्वराज्याची पाहणी करतात. रायगड हाच किल्ला राजधानीस योग्य असल्याचे सांगतात. नंतर निरोपाच्या भेटी होतात. दोन तीन महिने राहून शहाजी महाराज कर्नाटकास परत जातात. जिजाऊ, शिवबा,शंभू राजे त्यांना निरोप देण्यासाठी वारणा नदी पर्यंत सोबत जातात.
अशी ही भेट घडते. आता जेजुरी गडावर या भेटीचे स्मरण म्हणून जिजाऊ,शहाजी महाराज, शिवाजी महाराज व शंभूराजे यांचे स्मारक पाहता येते.
No comments:
Post a Comment