स्वराज्याची, स्वातंत्र्याची आणि स्वदेशाची संकल्पना ही ठराविक भूभागाशी किंवा राजधानी असणाऱ्या एखाद्या ठराविक गड व किल्ल्याशी निगडीत नसते तर स्वराज्य निर्माण होते ते प्रजेच्या हृदयात ! त्यामुळे संपूर्ण प्रजा हीच स्वराज्याची आधारशीला असून प्रत्येकाच्या मनात रायगड बांधण्याचे कार्य करणारे महान शासक म्हणजे स्वराज्याचे तिसरे छत्रपती ,थोर मुत्सुदी राजे म्हणजे छ. राजाराम महाराज !
राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला. छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे १० वर्षाचे होते ,तर बंधू छ. संभाजी महाराज यांची हत्या झाली तेंव्हा ते १९ वर्षाचे होते. वडीलधारकीचा सल्ला देणारे कोणीही नसलेल्या अत्यंत कठीण कालखंडात त्यांनी छत्रपती पदाची सूत्रे हातात घेतली. रायगडला असणारा झुल्फिखार खानाचा वेढा भेदून महाराज १६८९ च्या नोव्हेंबर महिन्यात दक्षिणेत जिंजी येथे पोचले. हा प्रवास म्हणजे खरोखर 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असाच होता. छ.शिवाजी महाराजांनी १६६४ साली यशस्वी केलेल्या बसरूरच्या स्वारीच्या वेळी शिमोगा येथील राणी चीन्नामा हिस पोर्तुगीज सत्तेविरोधात मदत केली होती. त्या मदतीने उपकृत होवून राजाराम महाराजांना याच चीन्नामाराणीने जिंजीच्या प्रवासात मदत केली. मार्गात आलेल्या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देवून ते जिंजी येथे जावून पोचले . यावेळी तंजावरच्या शहाजी राजेंनी त्यांना कांही फौज फाटा ,पैसा आणि साहित्य पाठवून दिले आणि राजाराम महाराजांनी जिंजीस राजधानी घोषित करून राज्यकारभार सुरु केला! मात्र राज्यभिषेक मात्र करवून घेतला नाही. कारण राज्याचा खरा मालक शाहू आहेत अशी त्यांची धारणा होती. कारण राजाराम महाराज २७.८.१६९७ रोजीच्या पत्रात म्हणतात “ चिरंजीव शाहूस काले करून तरी श्री देशी आणील..... शाहू सर्व राज्यास अधिकारी ,आम्ही करतो ते तरी त्यांचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकास त्याजकडेच पाहणे आहे,हे कारण ईश्वरेच नेमिले आहे”
राजाराम महाराजांचा मनमिळावू मृदू स्वभाव ,मुत्सुदी धोरणे आणि कठीण प्रसंगास अतिशय स्थिर बुद्धीने सामोरी जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांना अनेक निष्ठ्वान सहकारी मिळाले. रामचंद्रपंत बावडेकर, संताजी घोरपडे ,धनाजी जाधव प्रल्हाद निराजी ,खंडो बल्लाळ आदींच्या सहकार्याने हजारो किलोमीटर अंतरावर असूनही महाराष्ट्रात मुघलांशी कडवी झुंज त्यांनी दिली. सत्तेच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीत जेंव्हा अनेक मराठा सरदार मुघलांना जावून मिळत होते ,अशा कठीण काळात मराठा साम्राज्याची ज्योत त्यांनी रयतेच्या मनात कायम तेवत ठेवली.
कुशाग्र बुद्धीमत्तेने आणि मुत्सुदी धोरणाने याच कालखंडात महाराजांनी मुघलांच्या नौकरीत असणाऱ्या अनेक सरदारांना देखील आपलेसे करून घेतले. सामुहिक निर्णय त्यांच्या कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल!
महाराजांनी मराठा साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीमधील स्वराज्य निष्ठेस साद घातली. मराठा सरदारांच्या कर्तृत्वास वाव मिळावा आणि स्वराज्याचा विस्तार व्हावा या दूरदृष्टीने प्रत्येकाला इनामे बहाल केली. संभाजी महाराजाच्या अत्यंत संघर्षमय अशा कालखंडात ज्यांच्या कर्तृत्वास वाव मिळाला नव्हता अशा अनेकांनी या काळात प्रचंड पराक्रम करून स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. पुढच्या काळात हेच छ.राजाराम महाराजांचे धोरण छ.शाहू महाराजानी कल्पकतेने राबविले आणि मराठा साम्राज्य दिल्ली काबीज करून अटकेपार झेंडे रोवले. या अद्वितीय कामगिरीची पायाभरणी छ. राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत केली होते ,हे महाराजांचे मोठेपण आहे!
राजाराम महाराजांनी शिवरायांचा वतने व बक्षीस न देण्याचा शिरस्ता मोडला म्हणून कांही इतिहासकार या निर्णयाकडे सकारात्मकपणे पाहत नाहीत, मात्र तत्कालीन परिस्थिती पाहता, देशहितासाठी राजाराम महाराजांचे हेच धोरण योग्य असल्याचे प्रतीत होते आणि इतिहासाने ते सिद्धही केले. महत्वाची बाब म्हणजे महाराजांनी सरदारांना इनाम म्हणून दिलेला बराचसा प्रदेश हा मुघलांच्या ताब्यातील प्रदेश होता ,त्यामुळे इनामाच्या अभिलाषेने का होईना पण सरदार त्वेषाने लढत आणि तो प्रदेश साम्राज्यात येत असे .
महाराज जिंजी वर असताना १६९१ ते १६९८ ,असा सलग ८ वर्ष झुल्फिखार खानाने वेढा घातला होता. झुल्फिखार खानास अपयश म्हणजे काय माहित नव्हते ,एवढा तो पराक्रमी होता. परंतु एकूण ५ डोंगरांचा मिळून बनलेल्या जिंजीच्या परिसराला वेढा घालणे खूप अवघड होते. झुल्फिखार खानास अन्न टंचाई, घोड्यांना चारा न मिळणे, त्यात सतत परंतु अचानकपणे वेळी अवेळी होणारे हल्ले याने तो त्रस्त झाला होता. याचवेळी संताजी आणि धनाजी यांनी जिंजीला पोचून झुल्फिखार खानाच्या सैन्यावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी झुल्फिखार खान यासोबत सहकार्याचा गुप्त करार केला आणि अत्यंत धोरणीवृत्तीने, वृद्ध औरंगजेब बादशहाच्या हयातीनंतर मदत करण्याचे आश्वासन त्यास दिले. याचाच भाग म्हणून झुल्फिखर खान याने अनेक वेळा वेढा मोकळा करून राजाराम महाराजांना त्रिचनापल्ली ,तंजावर येथे जाण्यची संधी नकळत निर्माण करून दिली. संताजी यांची अशी इच्छा होती कि, खान कचाट्यात सापडला आहे तर त्याला सोडू नये ,मात्र महाराजांचे धोरण असे होते की, लोभी झुल्फिखार खानच्या जागी दुसरा मुघल सरदार आला तर तो आपणास मदत करेल याची खात्री नव्हती. शिवाय परिस्थिती अजून बिकट होती . राजे शाहू मुघलांच्या कैदेत होते. अशावेळी आवश्यक त्या तयारीसाठी उसंत हवी होती ,जी झुल्फिखार खानच्या रूपाने उपलब्ध झाली होती. या आणि अशा अनेक कारणावरून संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात विसंवाद निर्माण झाला. ही घटना १६९३ सालातील असून याचाच उल्लेख ‘जेधे शकावली’ मध्ये ‘संताजी घोरपडे राजारामासी बिघाड करून देशास गेले’ असा केला गेला आहे. मात्र त्यानंतर देखील संताजी घोरपडे हेच १६९६ पर्यंत सेनापती पदावर कायम होते हे विशेष!
रामचंद्रपंत यांनी या वेळी संताजीची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला कारण त्यानंतरही संताजी अनेकवेळा मुघल सैन्यावर चाल करून गेल्याचे संदर्भ आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात सतत चालू असलेल्या सैन्य चढाई मुळे मुघलांची फौज विखुरली गेली आणि याचा परिणाम होवून तिकडे जिंजीचे संरक्षण होवून इकडे महाराष्ट्रात देखील मुघल सैन्य सतत बचावात्मक पवित्र्यातच राहिले! या स्थितीचा विचार करून बादशहाने झुल्फिखानाच्या मदतीस त्याच्या वडिलास म्हणजे असदखानास पाठविण्याचा निर्णय घेतला.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल सत्तेच्या अस्ताचा कालखंड सुरु झाला होता कारण , मराठ्यांशी समझोता करून उत्तरेत परतावे असा अनेकांनी सल्ला देवूनही बादशहा ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे अनेक मुघल सरदार मनातून नाराज होते ,मुघल सैन्य देखील लढाईला कंटाळले होते. आयुष्याची २५ ते ३० वर्ष घरापासून दूर वणवण भटकत सैनिकी तंबूत राहण्यात गेली होती. मुघल सत्तेत असूनही सुख म्हणून कांही वाट्याला मिळाले नव्हते. याचा एकत्रित परिणाम होवून बादशहाचे आदेश देखील कोणी मानेना झाले आणि साहजिकच बादशहा प्रत्येकावर संशय घेवू लागला. झुल्फिखार खान मराठ्यांना फितूर असल्याच्या बातम्या त्याच्या पर्यंत पोचल्या होत्याच. त्याला आता खात्री पटू लागली होती कारण झुल्फिखार खान म्हटले तर जिंजी एका दिवसात घेवू शकेल असे त्यास वाटत होते. बादशाहने याच काळात झुल्फिखार खान याच्या मदतीस पाठवलेल्या त्याच्या वडिलास म्हणजे असदखानास परत बोलावले आणि कासीम खान याची नवीन फौज फाटा व रसद घेवून पाठवले.
झुल्फिखार खानास आता कोणत्याही परिस्थितीत जिंजी घेणे गरजेचे असल्याची गुप्त वार्ता राजाराम महाराजांना समजली आणि १६९७ च्या पावसाळ्यात जिंजीहून सुटका करून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या.
जिंजीच्या वेढ्यात झुल्फिखार खानसोबत , कासीम खान आणि अनेक मराठे सरदार होते ,त्यापैकी एक गणोजी शिर्के देखील होते. संभाजी महाराजांच्या हत्येपुर्वीच गणोजी मुघलांना जावून सामील झाले होते. राजाराम महाराजांनी गणोजी शिर्के सोबत चर्चा करण्याची जवाबदारी खंडो बल्लाळ यांच्यावर सोपवली. गणोजी शिर्के यांनी मदतीची तयारी दर्शविली मात्र, त्यांनी खंडो बल्लाळ यांच्याकडे असणारे दाभोळच्या देशमुखीचे वतन मागितले आणि खंडो बल्लाळ यांनी ते वतन देण्याचे मान्य करून ,लगेच महाराजांकडून सनदा आणून शिर्केंच्या हवाली केल्या. याचा परिणाम होवून शिर्केसोबत मोहिते देखील आले. शिर्केंच्या मदतीने राजाराम महाराज डिसेंबर १६९७ च्या पहिल्या आठवड्यात प्रथम वेल्लोर आणि तिथून पुढे गदग असा प्रवास करत करत महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशालगडावर पोचले!
विशालगडावर पोचल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यात ते सातारा येथे आले आणि राज्यकारभार सुरु केला. परंतु गेल्या ८ वर्षात स्थितीत खूप फरक पडला होता. पूर्वी बचावाची भ्रांत होती तर आता आत्मसन्मानासाठी चढाई करून , जिंजीहून परतल्याचे कार्यातून घोषित करायचे होते ,जनतेचा विश्वास जिंकायचा होता. नवीन सहकारी गोळा करायचे होते. व-हाड प्रांतातील देवडगडचा बुलंदबख्त या गोंड राजाने राजाराम महाराजांकडे वकील पाठवून मुघलांच्या विरोधातील लढ्यास सहाय्य करण्याची याचना केली होती. महाराजांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिला.
स्वराज्याच्या पुनर्बांधणीचे व सक्षमीकरणाचे कार्य दृष्टीसमोर होते. या कामासाठी पैसा हवा म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी सुरतेवरच्या छाप्याची तयारी सुरु केली. नेमाजी शिंदे , खंडेराव दाभाडे,राणोजी घोरपडे ,परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर आणि धनाजी जाधव यांच्यासह महाराज ३१ ऑक्टोंबर १६९९ रोजी सुरतेकडे निघाले. याची बातमी बादशाहाला समजताच त्याने बेदरबख्त आणि झुल्फिखार खानास पाठवले . परंड्याजवळ मराठे आणि मुघल यांच्यात युद्ध होवून त्यांना नगर कडे रवाना व्हावे लागले. त्याचवेळी राजाराम महाराज टेंभूर्णीच्या दिशेने निघाले. राजाराम महाराज मावळ प्रांतात नाहीत हे समजताच बादशहाने मावळ प्रांतावर चाल करून जाण्याची तयारी सुरु केली. हे समजताच महाराज पुन्हा सातारा येथे आले, या प्रवासा दरम्यान महाराजांना छातीचा विकार जडला. साता-याहून ते विशालगडावर पोचले, उपचार सुरू झाले, परंतु त्यात यश मिळाले नाही. अखेर २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांनी शेवटचा श्वास घेतला! मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे ३० वर्षाचे होते!
अत्यंत कठीण अशा परीस्थितीत, अत्यंत स्थिर बुद्धीने, मुत्सुदीपणे संपुर्ण आयुष्यभर सतत अविरत संघर्ष करणा-या संयमाने पराक्रम करणा-या थोर राजाची कारकिर्द म्हणून छ. राजाराम महाराजांकडे पहावे लागते! दुरदेशी राहून, सैन्याच्या मनातील निष्ठेला सतत जागृत ठेऊन गनिमी कावा या युद्धतंत्राचा अतिशय परिणामकारक वापर ,मुघल सैन्यावर निर्माण केलेली दहशत ,अतिशय तुटपुंजी रसद असताना सुद्धा केल्या गेलेल्या यशस्वी चढाया आदी बाबी म्हणजे राजराम महाराजांच्या मुत्सुदी धोरणांची परिणीती म्हणावी लागेल!
राजा दूरदेशी असताना सुद्धा प्रत्येक मावळ्यास लढण्याचे बळ देणारा, राजधानी असणारा रायगड कोसळला तरी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याच्या हदयात एकेक रायगड निर्माण करण्याची किमया घडविणारा, महान मुत्सुद्दी राजा म्हणून राजाराम महाराजांची गौरवगाथा इतिहासात अजरामर आहे!
पराक्रमाच्या व गौरवाच्या संकल्पना युद्धभुमीतील पराक्रमाशी निगडीत न पाहता मुत्सुदीगिरीतही पराक्रम असतो हे समजून घेतले तरच छ.राजाराम यांच्या कार्यकर्तृत्वाचे महत्व समजू शकते!
अशा महान शासकास त्यांच्या ३४७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!
© राज कुलकर्णी (
Raj Kulkarni
)टिप:- सदरचा लेख हा 12 फेब्रुवारी 2016 रोजी उस्मानाबाद येथे राजाराम महारांजावर दिलेल्या व्याख्यानाचे संक्षिप्त टिपन आहे. सुधारणा व सुचनांचे स्वागत!
No comments:
Post a Comment