========================================
पाठीमागच्या दोन लेखांमधून आपण पहिलेच की शाहूंवर जास्त प्रभाव होता तो शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा आणि त्याला अचूक संस्कारातून योग्य दिशा दिली ती महाराणी येसूबाईंनी. शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेब यांचा सर्वात जास्त प्रभाव शाहू महाराजांवर होता.
या व्यतिरिक्त शाहू महाराजांवर लहानपासून अनेक मुत्सद्यांचा प्रभाव पडला. प्रत्येक व्यक्तीची जडण-घडण आणि बौद्धिक वाढ ही योग्य संस्कार आणि सभोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण होते. शाहू महाराजांचा उमेदीचा काळ हा कैदेतच गेला आणि या मोठ्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी अनेक अशी व्यक्तिमत्व पाहिली ज्याचा त्यांच्यावर एक विशिष्ट प्रभाव पडला. अशी काही व्यक्तिमत्व आपण इथे पाहू.
■ जोत्याजी केसरकर:
केसरकर हे संभाजी महाराजांच्याजवळ नोकरीत होते संभाजी महाराजांचा विश्वासू सेवक म्हणून ते ओळखले जात होते. पुढे ते शाहू महाराजांच्या बरोबर सुद्धा राहिले.
बेंद्रे म्हणतात, "जोत्याजी केसरकर, करवीर प्रांती पुंजाळ गावचे पाटील, हे संभाजी महाराज यांजपासी सेवा करून इतबारी व कर्ते शाहाने होते. शाहू महाराज बाळवय असता त्यांस खेळवणे, शिक्षा लावणे (याजकरिता) ठेवले होते. ते महाराजांबरोबर गेले होते (कैदेत असताना). बेगमकडे जाणे, बोलणे व बादशहाकडे जाणे येणें वगैरे इतबारी कामात तेच राहिले. यावरून एक बात नक्की होते ती म्हणजे शाहू महाराज लहान असल्यापासून केसरकर त्यांच्या जवळ होते.
कैदेनंतर शाहू महाराज व येसूबाईसाहेब यांचा पत्रव्यवहार तेच पाहत होते. शाहू महाराजांचे लग्न ठरवण्यात त्यांचा पुढाकार होता. शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखीच्या कामावर नेमले होते. औरंगजेबाच्या किल्ले घेण्याच्या मोहिमेत कधी कधी शाहूंचे हाल होत असे. एकवेळ पावसात केसरकर यांनी शाहू महाराजांना भात शिजवून घातला होता. कैदेत असताना केसरकर व मदनसिंह यांनी शाहू महाराज व बादशहा यांच्यात मध्यस्थीने काम केले.
■ रायभानजी भोसले:
शाहू महाराज कैदेत असताना मोगलांना एक विश्वासू मराठा पाहिजे होता जो इतर मराठा सरदार व बादशहा यांच्यात बोलणी घडवून आणेल. त्यापैकी एक म्हणजे तंजावरचे राजे व्यंकोजी यांचा मुलगा रायभानजी भोसले. भोसले घराण्याचे असल्या कारणाने तडजोडीच्या बोलण्यात त्यांची मदत होईल असे मुगलांना वाटले. म्हणून त्यांना सहा हजारी मनसबदार बनवले व त्यांच्या अनुयायांना दोन वर्षासाठी कराची सुद्धा सूट दिली होती. शाहूंना भेटण्याची त्यांना परवानगी दिली होती आणि ते इतर मराठा सरदार व औरंगजेब यांच्यात मैत्रीचा तह व्हावा म्हणून रायभानजी जर काही राजकीय डावपेच खेळायचे ते सर्व शाहू पाहत होते आणि या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि यामुळे शाहू महाराजांना बाहेरील सर्व बातम्या समजत असत.
■ झीनत उन्नीसा:
शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला गेले होते त्यावेळी त्यांना सन्मानाने वागवावे असा म्हणणारा जो एक पक्ष होता, त्यामध्ये झीनत उन्नीसा मुख्य होत्या. त्यांनी संभाजी महाराजांना मृत्युदंड होऊ नये यासाठीे भरपूर प्रयत्न केले. आणि पुढे त्यांनी शाहूंचा खूप मायेने सांभाळ केला. स्वभावाने अतिशय परोपकारी असल्याने याचा फायदा येसूबाईसाहेब व शाहूंना खूप झाला. शाहूंच्या धर्मांतराच्या वेळी त्यांच्या मध्यस्थीमुळेच शाहूंचे धर्मांतर वाचले. शाहू महाराज व येसूबाई मोगली छावणीत दाखल झाल्यावर झीनत यांनी त्यांना ममतेने वागवले, कशाचीही कमतरता पडू दिली नाही. दागदागिने, कपडालत्ता, मेवा-मिठाई हे सर्व त्या हौसेने पुरवत असे.
१८ वर्षे शाहूमहाराजांवर मायाळू आणि प्रेमाचा प्रभाव येसूबाईंनंतर जर कोणाचा पडला असेल तर तो झीनत उन्नीसा यांचा. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी बेगम झीनत उन्नीसा यांच्या स्मरणार्थ साताऱ्याला "बेगम मशीद" या नावाने मशीद बांधली. बखरकार म्हणतात की झीनत उन्नीसा यांनी शाहूंना स्वतःचा मुलगा समजून सांभाळ केला.
■ छत्रपती राजाराम महाराज:
शाहू महाराजांना कैदेत असताना रायभानजी भोसले आणि इतर मंडळींच्या मार्फत बाहेरील सर्व घडामोडी समजत होत्या आणि त्यात त्यांच्या काकांच्या पराक्रमाच्या बातम्या सुद्धा कानावर येत होत्या. संकटे यायला लागली की एका मागून एक येतात हे खरे आहे, पण ते कायमची मुक्कामाला नसतात हे सुद्धा तितकेच खरे. परंतु अशा संकटांना न डगमगता त्यांच्यावर मात करणे हा एका नेत्याचा पुरुषार्थ असतो. हाच पुरुषार्थ दाखवला तो शाहू महाराजांचे चुलते छत्रपती राजाराम महाराज यांनी. आणि याच पुरुषार्थाचा प्रभाव शाहुंवर पडला आणि राजाराम महाराजांचा पुरूषार्थ या दुःखद पर्वाची एक तेजस्वी बाजू होती जी शाहूंना एक वेगळा आत्मविश्वास देत होती.
प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा जिद्दीने संघर्ष करत राहणे, व निर्धाराने झुंजत राहणे हे एका प्रतिभाशाली नेत्याचा गुण असतो जे शाहू महाराज राजाराम महाराजांच्या मध्ये पाहत होते.
आणि सर्वात शेवटी एक व्यक्तिमत्व जे विसरून चालत नाही ते म्हणजे खुद्द "बादशहा औरंगजेब" !!!
Post By:
Prashant Babanrao Lavate-Patil
No comments:
Post a Comment