विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 October 2020

शहाजी महाराजांची समाधी...

 


शहाजी महाराजांची समाधी...
शहाजी महाराज यांचा जानेवारी १६६४ साली एका मोहीमेवर असताना घोड्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या ठिकाणी महाराज घोड्यावरून खाली पडले,ती जागा महाराजांच्या समाधीपासून एक फर्लांगावर आहे. तिला “लायदा होळा' असे म्हणतात. ही जागा आता अंदाजानेच दाखवली जाते, तिथे आता शेती केली जाते. महाराजांना फरफटत नेणारा घोडा नेमका ज्याठिकाणी थांबला, त्याच ठिकाणी त्यांची समाधि बांधण्यात आली आहे.
महाराजांच्या देहावर त्यांचे पुत्र एकोजीराजे यांनी अंत्यसंस्कार केले व नंतर काही दिवसांनी समाधीही बांधली. शिवाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या सन्मानार्थ खास छत्री पाठविली.
१७७३ पर्यंत समाधीची देखरेख व पूजा होत होती. नंतर मात्र ती बंद पडली. पुढे दीडशे वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली की, शहाजी महाराजांची समाधि येथे आहे हेच लोक विसरून गेले. समाधि काटेरी झुडपे व जंगल यात लुप्त झाली. साधारणत: १९१२ पर्यत समाधी याच अवस्थेत पडून होती.
गेल्या दीडशे वर्षाच्या कालावधीत अंधारांत राहिलेली समाधि पुढेही अंधःकारातच राहिली असती, परंतु होदिगेरे येथेच समाधी असावी या विचारास तेथील काझी बरामुद्दीन यांना सापडलेल्या शिलालेखावरून चालना मिळाली. हा शिलालेख कानडी भाषेत आहे. त्यातील पहिली ओळ 'श्री शहाजी' असून दुसरी ओळ 'राजन्ना स...' अशी आहे. त्यापुढची अक्षरे नष्ट झाली आहेत. परंतु ती अक्षरे 'समाधी' अशीच असली पाहिजेत. समाधीचे बांधकाम चुन्याने करण्यात आले आहे, ते ३०० वर्षापूर्वीचे बांधकाम आहे हे सिध्द झालेच.
जेधे यांच्या बखरीत समाधीचा उल्लेख आढळतो. शिवाय भारत इतिहास संशोधन मंडळाचे पटवर्धन यांनी कागदपत्रे पाहून ही शहाजी महाराजांचीच समाधी असल्याचा निर्वाळा दिला.
सन १९४० मध्ये चन्नागिरी येथे मराठयांची दुसरी परिषद भरविण्यात आली. याप्रसंगी समाधीची माहिती देण्यात आली व जीर्णोध्दाराची आवश्यकता पटवून देण्यात आली. या लोकांनी पैसे गोळा करून समाधी सभोवतीची थोडीशी सफाई केली व समाधीवर छोटीशी नवी समाधि बांधली.
इ.स.१९५६ च्या सुमारास सरकारने जीर्णोध्दाराकरिता १८ हजार रुपये मंजूर केले. पुराणवस्तु संशोधन खात्याने सहकार्य करून २६ गुंठे जमीन तिमाप्पा सावकाराकडून विकत घेतली व समाधीसभोवतीची साफसफाई करून ६ फुट उंचीची व ६०:६० ची भिंत बांधली समाधीच्या सभोवार बांधलेल्या या भिंतीमुळे या पवित्र स्थळाचे रक्षण झाले. सध्या समाधी परिसर योग्य अवस्थेत आहे.
Post By- @maratha_riyasat

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...