विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 October 2020

मराठा साम्राज्याचे सेनापती धनाजी जाधव

 


मराठा साम्राज्याचे सेनापती धनाजी जाधव यांचे आज पुण्यस्मरण (इ.स. १६५० - इ.स. १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजीशी झालेल्या युद्धामध्ये संताजी मरण पावले. त्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धन सातारला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या पत्नीला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. हे दाम्पत्या बरीच वर्षे जाधव यांच्या आश्रयाखाली होते. त्यांचे घनिष्ठ संबध होते. धनाजी जाधव यानी शाहुमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथम पेशवाईची सूत्रे मिळाली.

खालील माहिती महाराष्ट्रीय ज्ञान कोषातील
धनाजी जाधव आणि त्याचा वंश:- लुखजी जाधव याचा पुत्र जो अचलोजी त्यास निजामशहा यानें ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचें संगोपन जिजाबाईनें केलें. कनकगिरीच्या लढाईत हा मेला. त्याला शंभुसिंग म्हणून पुत्र होता. त्याचा मुलगा धनाजी. याचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हा प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होता. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें (१६७४) धनाजी हा हंबीरराव मोहिते याच्या हाताखालीं गेला. विजापूरचा सेनापति अबदुलकरमि याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यानें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यास बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यानें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजीनें याची तारीफ केली (१६७९).
संभाजीचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होता. त्यानें सातार्यास सर्जाखानाचा पराभव केला.
पुढें (१६९०) धनाजी राजारामाबरोबर जिंजीस गेला. तेथें त्यानें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यास सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजीस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रांत पाठविण्यांत आलें (१६९०).
महाराष्ट्रांत १६९२ सालीं संताजीच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होता. धनाजीच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण तो आपल्या लोकांनां अधिक प्रिय होता. इकडे धनाजीनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.
धनाजी हा संताजी घोरपडयाबरोबर महाराष्ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें तो संताजीबरोबरच होता. परंतु शेवटीं शेवटीं या दोन्ही सरदारांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजीनें संताजीच्या सैन्यांतील कांहीं लोकांस फितविलें, व एके दिवशीं विजापुराजवळ संताजीवर एकदम हल्ला केला. संताजी आपला जीव वांचवून कसा तरी तेथून निसटला, तेव्हां कांहीं लोकांनां त्याच्या पाठलागार्थ पाठवून, व कांहींनां सातार्यास राजारामाकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारें १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरितां पुन्हां कर्नाटकांत आला. यापुढें दोन वर्षें धनाजीची व झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजीनें कर्नाटकांत व महाराष्ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.
औरंगझेब महाराष्ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजीनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होता. धनाजीचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, तो आलेला दृष्टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार 'तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?' असें घोडयास विचारीत. मध्यंतरी (१७०७) घोरपडयांनीं ताराबाईच्या मुलखांत लुटालूट केल्यामुळें धनाजी त्याच्या पारिपत्यास गेला असतां झुल्फिकारखान घोरपडयांच्या मदतीस आला, व त्यानें धनाजीस कृष्णेपार काढून दिलें. यानंतर मोंगलांचें सैन्य महाराष्ट्रांतून निघून गेल्याबरोबर धनाजीनें पुण्याचा फौजदार लोदीखान याचा पराभव करून चाकणचा किल्ला परत घेतला.
यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूची सुटका होऊन तो महाराष्ट्रांत आला, तेव्हां ताराबाईकडून धनाजी जाधवाची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजीनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून तो त्याला मिळाला. पुढें शाहू गादीवर बसला तेव्हां त्यानें धनाजीस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हा अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिला. कोल्हापूरकर मात्र त्याला फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
पुढल्या वर्षीं धनाजी हा कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावला (मे १७१०). त्याला कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें तो बरेच दिवसपर्यंत आजारी होता. या आजारांत त्यानें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ याची नेमणूक केली होती.
धनाजीची स्त्री गोपिकाबाई ही सती गेली. धनाजीस दोन बायका होत्या. पहिलीस संताजी व दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंग असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला. शिवाजीच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय. धनाजी हा सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.
चंद्रसेन जाधव:- हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हा त्याचा कुल कारभार पाहूं लागला, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजीविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईकडे होता व तो आंतून तिला (शाहूच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता.
धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजीचा पाठलाग केला व (शाहूच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंग व खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.
इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला.
रामचंद्र जाधव:- हा चंद्रसेनाचा मुलगा. इ. स. १५५६ त हैद्राबादचा नबाब सलाबतजंग यानें रामचंद्र जाधव व रावरंभा निंबाळकर यांनां बुशीच्या पाठलागार्थ त्याच्या मागोमाग पाठविलें होतें परंतु बुशी आपलें फारसें नुकसान न होऊं देतां हैद्राबादेस जाऊन पोंचला. यानंतर बुशीनें याला आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें यानें मच्छलीपट्टणाहून बुशीच्या मदतीस हैद्राबादेस जी कुमक येत होती तिला मुळींच अडथळा केला नाहीं.
स. १७५६ च्या अखेरीस बुशी आपल्या पूर्वकिनार्यावरील जहागिरीकडे निघून गेल्यावर, बुशीकडे जी कुमक आली होती, तिला अडविण्याच्या कामीं रामचंद्र जाधवानें जी हयगय केली, तिजबद्दल त्याचें पारिपत्य करण्यासाठीं, सलाबत जंगानें त्याजवर स्वारी करून, त्याची बहुतेक जहागीर त्याजकडून काढून घेतली. बाह्यत: मात्र, रामचंद्र जाधवानें कराराप्रमाणें चाकरीस ठेवावयास पाहिजे तेवढी फौज ठेविली नाहीं, असें या स्वारीचें कारण दाखविण्यांत आलें होतें. उदागीरच्या लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ त राघोबादादानें याला सेनापतीचीं वस्त्रें दिलीं. परंतु सेनापति या नात्यानें गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामअल्लींकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत ठार झाल्यावर (१७९१) त्याची जहागीर खालसा झाली. सांप्रत याचा वंश निजामहींत नांदत आहे. [जाधवांची कैफियत; डफ, राजाराम व शाहु यांच्या बखरी; खाफीखान; पेशव्यांची बखर.]"

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...