शिवकालीन मराठा आरमाराची उभारणीबद्दल माहिती घेत असताना त्यापूर्वीची काही पार्श्वभूमी आणि इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. साधारणपणे १६५३ सालापासून औरंगजेब हा दक्षिणेच्या सुभेदारीवर होता आणि तो दक्षिणेतील दोन्ही शाह्या जिंकून घेण्याचा मनसुबा राखत होता आणि क़ुतुबशाही आणि आदिलशाहीच्या प्रदेशात हल्ले चढवत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्हीकडे आपले संधान बांधले होते, औरंगजेब-शिवाजी महाराज असा पत्र व्यवहार देखील सुरू होता. औरंगजेब याने आदिलशाहीचा बिदर आणि कल्याणीचा भाग घेतल्यानंतर, औरंगजेब आपल्या ही जहागिरीवर स्वारी करेल अशी शंका येताच छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नर व अहमदनगर या मोगली ठाण्यावरच हल्ला चढवला. इकडे औरंगजेब यास शाहजहान बादशाहचा हुकुम आला की विजापुरशी चाललेले युद्ध थांबवा आणि तह करा, औरंगजेबाला तह करायचा नव्हता पण त्याने आदिलशाहशी तह केला. हा तह अंमलात आणण्यापूर्वीच औरंगजेबाला दिल्लीकडे निघावे लागले कारण शाहजहान बादशाह आजारी होता आणि त्याच्यामागे आपल्याशिवाय दुसरा कोणीही वारसदार नसावा ही औरंगजेबाची अपेक्षा होती. मोगल - आदिलशाह तहाने युद्ध थांबले असले तरी महमद आदिलशाहच्या मृत्युनंतर आदिलशाही दरबारात गोंधळ निर्माण झाला होता, उत्तर कोकण प्रदेशातील कल्याणचा सुभेदार मुल्ला महंमद या देखील विजापुरात होता. आदिलशाहीच्या या परिस्थितीचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यात मोडत असलेला उत्तर कोकणचा प्रदेश काबीज करण्याचा निर्णय घेतला आणि पावसाळा संपताच आदिलशाहच्या ताब्यात असणारी कल्याण, भिवंडी ही नगरे आणि त्याच्या आसपासचा मुलुख (२४ ऑक्टोबर १६५७) ही जिंकला. यानंतर त्या प्रदेशातील सुरगड, बीरवाडी, तळा, घोसाळगड, सुधागड, कांगोरी इत्यादी किल्ले देखील मराठयांनी जिंकून घेतले. कल्याण, भिवंडी या दोन सागरी किनार्यालगतच्या ठिकाणांचा छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार उभारणीच्या दृष्टीकोणातून फार उपयोग झाला...
सतराव्या शतकात युरोपियन व्यापाऱ्यांचे आरमारी वर्चस्व होते शिवाय मोगल अथवा आदिलशाह यांची सत्ता समुद्रावर जास्त काही चालत नसे हि गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण प्रदेश काबीज केल्यावर लक्षात घेतली तसेच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीय लोकांपासून हि स्वराज्यास धोका आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराची आवश्यकता वाटू लागली होती आणि याच कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७-१६५८ सालापासून आरमार बांधणीस प्रारंभ केला. तसेच काही जलदुर्ग बांधणीस हि सुरुवात केली. त्यातील काही जलदुर्ग आजही समुद्रात महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत..
आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही, रयतेनी ही झाडे लावून लेकरासारखी बहुतकाळ जतन करून वाढवली त्यांचे दुखास पारावार काय ? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे " छत्रपती शिवरायांनी आपल्या आरमार उभारणी करताना सुद्धा रयतेची घेतलेली काळजी आणि नैसर्गिक समतोल या आज्ञापत्रातून दिसतो..
मराठा आरमार छोटे असले तरी मराठा लष्करी व्यवस्थेतील ते एक प्रमुख अंग होते. समकालीन साधनांवरून असे दिसून येते कि मराठा आरमारात लहान मोठी अशी विविध जातीची जहाजे होती. गुराबा, शिबार्डे, पगार अशी हि जहाजे होती..
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हलचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
या दोन मुख्य नौकाशिवाय शिवाड, तरांडी, तारू, माचवा, पारव, जुग, फ्रिनेट अशा अनेक प्रकारच्या जहाजा मराठा आरमारामध्ये सामील होत्या,सभासदकार हा मराठा आरमारातील जहाजांची एकूण संख्या ७०० देतो परंतु अंदाजे ६४० नौका मराठा आरमारात असाव्यात ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना आणि जलदुर्ग बांधणी केल्यानंतर त्याचा फायदा हा स्वराज्यासाठी होऊ लागला. कोकण किनार्यावरील प्रदेशाचे सिद्दी, पोर्तुगीज यांच्या आक्रमणापासून संरक्षण होऊ लागले. तसेच त्या काळात समुद्रात फुटून किनार्यास आलेल्या जहाजावर मराठयांना मालकी हक्क सांगता येऊ लागला. आरमार निर्मितीमुळे पायदळ, घोडदळ यांना आरमाराचे साहाय्य होऊ लागले अन्नधान्याची रसद पोहचवणे सोपे झाले ( उदा - बसनूर आणि सुरत मोहीम ). कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी जहाज बांधणी उद्योगाचा पाया रचला गेला शिवाय अनेक लोकांना यातून रोजगार आणि आरमारात नोकऱ्या मिळू लागल्या होत्या. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या परकीय सत्तांवर आपला वचक बसला तो वेगळाच...
छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचीच काही उदाहरणे-
* का. मिंचिन २२ सप्टेंबर १६७९ ला मुंबई कौंसिलला लिहतो की - खांदेरी बेटावरील लोंकाना आमच्या तोफापासून काही इजा होणार नाही याउलट आमचेच नुकसान जास्त होणार आहे
* २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही
*केजविन लिहतो की २८ ऑक्टोंबरला शत्रुच्या होड्या आमची नजर चुकवून कितीही काळजी घेतली तरी बेटावरील दिव्यांच्या खालून सहज निघून जातात तोच परत १ नोव्हेंबर ला लिहतो की शिवरायांचे आरमार इतके चपळ आहे की ते आमच्या पुढून सहज जातात कारण त्यांच्या लहान होडग्या आम्हाला सहज आणि आश्चर्यरीत्या चुकवतात.
छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती.मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..
" It was a great mercy that Shivaji was not a sea-man otheriwse he mihgt have swept the sea as he did the land with the besom of destruction..."
डग्लस नावाच्या एका युरोपियन व्यक्तीने शिवछत्रपतींबद्दल उद्गारलेले हे वाक्य म्हणजे मध्ययुगात मराठा आरमाराची दहशत अधोरेखित करणारे आहे, मराठा आरमार दिनाच्या सर्व इतिहासप्रेमींना खूप खूप शुभेच्छा ...!!
No comments:
Post a Comment