मूळ नाव चिंचपूर
तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर.
यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.
निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे. यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस-सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. त्यांच्यासोबत पानेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरिता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात. महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवर मतभेद वाढत गेल्याने हैद्राबाद संस्थानमधील धार्मिक विभागाने १९१९ साली ‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला. त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आलेा असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.
तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून
घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपण आहे.
तुळजापुरात कदम, मलबा, परमेश्वर, उदाजी, सोंजी याप्रमाणे भोपे पुजारी तर भोसले, मगर, क्षीरसागर, गंगणे, रोचकरी यांसारख्या नावाचे पाळीकर पुजारी एकमेकांचे पाहुणे असले तरी आजतागायत भोपे पुजाऱ्यांनी आपल्या मुलीचा विवाह गावातील तरुणाशी केलेला नाही.
मंदिर संस्थान आणि संस्थानकडून दानपेटीतील १६ टक्के हिस्सा मिळविणारे भोपे पुजारी असले तरी देवीचे अनेक पारंपरिक सेवेकरी विनामोबदला सेवा देतात. भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते. गेल्या अनेक दशकांपासून उपरकर हा नैवेद्य देतात. याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यांसारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात.
देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत. शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात. सरकारी नियंत्रणाखाली असणाऱ्या मंदिराची चावी पानेरी मठाकडे असते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते. देवीचे दागिने जवाहरखान्यात ने-आणण्याची जबाबदारी मळेकर मठावर आहे. ट्रस्ट असले तरी या खासगी सेवा अखंड आहेत.
दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्येशिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.
तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत.
तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलत जाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.
देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते. ही परंपरा आजही जोपासली जाते. काळभैरव रखवालदार आहे. तो वर्षांतून एकदा अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पण या भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात. अश्विन अमावस्येला भेंडोळीबरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते. या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो, तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथापरंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही. हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकचुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे.
श्रीतुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाणपरंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथापरंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानथोर एकच जयघोष करतात.
‘ *आई राजा उदोऽऽ
No comments:
Post a Comment