विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 October 2020

■ शूर सेनानी, पराक्रमी महाराजा यशवंतराव होळकर ■

 


■ शूर सेनानी, पराक्रमी महाराजा यशवंतराव होळकर ■
--------------------------------------------------------------------------
मल्हारबांचे दत्तक चिरंजीव, नात्याने पुतणे, अमितपराक्रमी तुकोजीराव होळकरांच्या चार पुत्रांपैकी सर्वात धाकटे पुत्र म्हणजे "महाराजा यशवंतराव होळकर".
यशवंतराव एक पराक्रमी सेनानी तर होतेच त्याचबरोबर अतिशय चालाक व मुत्सद्दी राजकारणी सुद्धा होते. शिवरायांचा गनिमीकावा व त्याची नीती जो त्यांच्या नंतर हळू हळू बदलत गेली आणि त्याचा मोठा दणका होता तो म्हणजे "पानिपतचे युद्ध" ज्यामध्ये मराठ्यांचा महाहानिकारक व लाजिरवाना पराभव झाला. त्यानंतर गनिमिकाव्याचा सुरेख वापर केला तो म्हणजे यशवंतराव होळकरांनी.
दौलतराव यांनी ज्यावेळी यशवंतरावांना अटक केली (20 फेब्रुवारी 1798). यशवंतराव हे भोसलेंच्या आश्रयाला गेले आहेत हे कळताच दौलतरावांनी यशवंतरावांना अटक करावी अशी आज्ञा दिली आणि यशवंतरावांना घेऊन येण्यासाठी सैनिकांची एक तुकडी नागपूरला पाठवली.
परंतु इकडे कैदेतून निस्टण्याचा डाव आगोदरच यशवंतरावांनी आखला होता. भवानी शंकर यांच्या मदतीने शिंद्यांची तुकडी पोचायच्या आधीच, 6 एप्रिल 1798 रोजी वेषांतर करून यशवंतराव तिथून सुटले. महाराजांचे आग्र्याहून पलायन हा धडा कदाचित यशवंतराव विसरले नव्हते.
इतिहासातील दुर्दैवी आणि क्रृर घटना म्हणजे विठोजीरावांची शनिवारवाड्यात झालेली क्रूर हत्या. काही लोक म्हणतात या घटनेने क्रोधीत होऊन यशवंतरावांनी पुण्यावर हल्ला केला. परंतु यशवंतरावांचे व्यक्तिमत्व पाहता रागाच्या भरात असे कृत्य करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गुण दिसत नाही. इतिहास अभ्यासक श्री. कौस्तुभ कस्तुरे यांनी एक पत्र निदर्शनास आणले होते ज्यामध्ये यशवंतराव म्हणतात "विठोजी होळकर यांनी स्वामींची आज्ञा न घेता श्री पंढरपुराकडे जाऊन क्षेत्रास उपसर्ग दिल्यामुळे (पेशव्यांनी) इतराजी होऊन प्रकार घडला तो समजला. तथापी स्वामींचे हाती जे घडले ते सेवक लोकांस श्रेयस्कर आहे".
या नंतर एकदोन वर्ष्यात यशवंतरावांनी पुण्यावर हल्ला केला. हल्ल्यामागे कारण काय होते ? कोण सांगते विठोजी होळकरांची हत्त्या व त्याचा सूड घेण्यासाठी हा हल्ला होता. परंतु पेशव्यांनी ब्रिटिशांना मराठ्यांच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याची संधी दिली हे कारण असावे असे मला वाटते. ☺
मला या प्रांसगावरून महाराज आग्र्याहून आल्यावर औरंगजेबाला जे पत्र पाठवले होते त्याची आठवण होते. ज्यामध्ये महाराज आग्र्याहून त्यांना न सांगता आलो त्याबद्दल माफी मागतात आणि मुघलांच्या सेवेत आम्ही राहू याचे वचन देतात आणि लगेच काही दिवसात पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले होते ते पुन्हा घ्यायला सुरु करतात.
तर यशवंतरावांच्या या गनिमी काव्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा या महापराक्रमी आणि बुद्धिवंत सेनाण्याची आज जयंती. आम्हा सगळ्या इतिहासप्रेमी मंडळींकडून यशवंतरावांना मनाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...