सरदार हरिपंत फडके वाडा
सन १७७१ मध्ये माधवराव पेशवे आजारी असताना त्यांनी हरिपंतांवर नारायणरावांची जबाबदारी सोपवली. पेशव्यांनी त्यांना आपले कोकणातील देशमुखी वतन दिले. रत्नागिरी प्रांतातील ३३ गावे, सुवर्णदुर्गाखालील हरणाई आणि पुणे प्रांतातील सिध्दटेक हा गाव इनाम दिला.
धोंडो बल्लाळ यांना इनाम गावचा कमाविसदार (वसुली अधिकारी) म्हणून नेमले. त्याच वेळी त्यांनी येथे उपरोक्त वाडा बांधला असावा. साधारणपणे २४० वर्षांपुर्वीचा हा वाडा आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. १७७२ मध्ये त्यांना सचिवपद देण्यात आले. केळशी महालाची देशमुखी दिली. वंशपरंपरेने ११ वादकांचा चौघड्याचा मान दिला, त्यासाठी नेमणूक करुन दिली.
नारायणराव पेशव्यांच्या कारभारात त्यांना अधिकारपद देण्यात आले. पुढे सवाई माधवराव यांच्या बालपणीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना सेनापती पद दिले. निजामाने त्यांना वजारतमान हा किताब दिला होता. इंग्रजांशी सामना, हैदरचा पराभव, खंडणी वसूली यामुळे हरिपंतांचा पेशवाईत धाक निर्माण झाला.
पुण्यात हरिपंत फडक्यांनी गणेश पेठेत ५ चौकी, ३ मजली असा भव्य वाडा बांधला. या भव्य वाड्याच्या दर्शनाने हरिपंतांच्या व्यक्तीमत्त्वाचे भव्यपण लक्षात येते.
अत्यंत नियमबध्द शुध्दाचारी असे हे व्यक्तीमत्त्व म्हणून पेशवाईत फारच कर्तृत्व गाजवून गेले. पेशवाईत जेवढे महत्त्व नाना फडणवीसांना होते तितकेच फडक्यांना देखील होते. ते राज्यहिताकडे फार लक्ष देत. शत्रू पक्षाकडे काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून आपल्याकडे वळविण्यात त्यांचा चांगला हातखंडा होता.
हरिपंतांनी श्री गजाननावरील भक्तीपोटी सिध्दटेक येथे सिध्दिविनायकाच्या जवळ आपल्या वस्तीसाठी वाडा बांधला. त्यांनी सिध्दटेकला गणेशाची चांदीची मूर्ती अर्पण केली, तर पर्वतीवर सोन्याची मूर्ती अर्पण केली.
सिध्दटेक जि. नगर
- विकास चौधरी
No comments:
Post a Comment