राजे रावरंभा निंबाळकर
पोस्तसांभार ::डॉक्टर सतीश कदम
छत्रपती शिवरायांच्या कन्या आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बहीण सखूबाई आणि फलटणचे सरदार महादजी बजाजी निंबाळकर यांचे नातू असलेले राजे रावरंभा निंबाळकर हे 1707 ला सेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करताना दिसून येतात. त्यानंतर संभाजीपुत्र शाहू हे मोगलांच्या कैदेतून बाहेर आल्यानंतर काही काळ त्यांनी शाहूच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर पेशवा बालाजी विश्वनाथच्या उदयानंतर छत्रपती शाहूचे अनेक सरदार त्यांना सोडून निजामाला जाऊन मिळाले. त्यात राजे रावरंभा निंबाळकर हेही होते.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा दक्षिणेतील सुभेदार मिर कमरुद्दीन खानाने इ. स. 1724 साली दक्षिणेत स्वत:चे राज्य निर्माण केले. याला हैदराबादची निजामशाही म्हटले जाते. ही निजामशाही स्थापन करण्यात राजेरावरंभा यांची मोठी भूमिका राहिली होती. त्यामुळे निजामाने रंभाजीला “ रावरंभा” ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजीबाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जाऊ लागले. रावरंभा या शब्दाचा अर्थ होतो – जेता किंवा सतत जिंकणारा. त्यामुळे रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. रंभाजी उर्फ रावरंभा निंबाळकर (1689 ते 1736 ) यांनी आपल्या हयातीत उतुंग पराक्रम करून रावरंभा निंबाळकर हे नाव अजरामर केले.
या दरम्यान निजामाच्यावतीने त्यांना खुद्द पुणे आणि बारामती, उस्मानाबाद जिल्हयातील नळदुर्ग, तुळजापूर, आपसिंगा, भूम, सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, सेंद्री, रोपळे, दहिगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी, लातूर जिल्ह्यातील राजुरी, अहमदनगरची फौजदारकी, श्रीगोंदा, सातारा जिल्ह्यातील काही गावे आणि 22000 हजाराची मनसब मिळाली, रावरंभाना पालखी आणि मशालीचा मान होता.
औरंगाबाद येथे आजची कोटला कॉलनी म्हणजेच पूर्वीचे रंभापूर असून तेथे त्यांची फार मोठी हवेली होती. तसेच हैद्राबादला चारमिनारच्या बाजूला रावरंभा की देवडी नावाने त्यांचे निवासस्थान हैद्राबाद शहरात फार प्रसिद्ध होते.
रंभाजी बाजी उर्फ रावरंभा हे देवीचे निश्चिम भक्त असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या बाजूच्या ओवर्या आणि जवळपास 12 ते 14 फुट रुंदीची तटभिंत आणि पूर्व आणि पश्चिमेला दोन भव्य दरवाजे बांधले. त्यामुळेच तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला “ सरदार निंबाळकर ” हे नाव देण्यात आलेले आहे. रावरंभा हे देवी बरोबरच मुस्लिम पिराचेही मोठे भक्त राहिल्याने त्यांच्या जहागिरीतील प्रत्येक गावात देवी मंदिर आणि त्यासोबतच पीराचेही ठाणे असल्याचे दिसून येते. एवढेच नाहीतर दरवर्षी रमजान महिन्यात पीराचे डोले बसविणे आणि त्यांच्या पंजाची मिरवणूक काढण्याचे काम त्यांच्यावतीने आजही सुरू आहे. माढा, करमाळा, भूम, रोपळे, सेंद्री याठिकाणी हे काम आजही हिंदुच साजरे करतात.
माढा, करमाळा येथील किल्ला आणि देवीची मंदिरे रावरंभा च्या पराक्रमाची साक्ष आहे. निजामाची जहागिरी सांभाळत असतानाही त्यांनी छत्रपतीसोबत तेवढेच आदराचे संबंध ठेवले. त्यांच्या पराक्रमाचे अनेक दाखले सापडतात.
रावरंभाच्या निधनानंतर पुढे सहा वारसदारांनी त्यांचा वारसा पुढे चालविला. विशेष म्हणजे त्यांच्या पुढील प्रत्येक वारसादाराने “ रावरंभा” ही पदवी कायम ठेवली. साहजिकच इतिहासात प्रत्येकाला रावरंभा निंबाळकर म्हटले गेल्याने, 1707 ते 1924 पर्यन्त रावरंभा हे नाव सर्वोमुखी झाले. परंतु रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे हे ध्यानात आलेच असेल.
अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे. मात्र त्यांच्या मृत्युची निश्चित तारीख अद्याप उपलब्ध नव्हती. ती सापडली असून पेशवे दफ्तरातील खंड क्र. 22, पत्र क्र.342 , पान क्र. 178 वर त्यांच्या मृत्युची तारीख 17 नोव्हेंबर 1736 म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे.
No comments:
Post a Comment