स्वराज्यसंस्थापक छत्रपति शिवराय महाराजांचे नातू व करवीर राज्याचे अधिपती क्षत्रियकुलावतंस श्री शंभूछत्रपति महाराज...
१७१४ साली झालेल्या "राजवाड्यातील सत्तांतरा"नंतर छत्रपतिंच्या गादीवर राजाराम महाराजांचे द्वितीय पुत्र श्री संभाजीराजे हे "क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति" हे नाव धारण करुन वयाच्या सोळाव्या वर्षी अधिष्ठित झाले.
यापूर्वी संभाजीराजे हे ताराराणींच्या कैदेतच असल्यामुळे त्यांना युद्धप्रशिक्षण देण्यात आले नव्हते, शिवाय ते कोणत्याही लष्करी मोहिमांवरही गेले नव्हते. मात्र ज्या राज्याच्या सीमादेखील निश्चित नाहीत अशा करवीरच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लष्करी शिक्षण न घेतलेल्या या राजाने हाताळेल्या लढाया व राज्यव्यवस्था या निश्चितच प्रेरणादायी आहेत. शिवरायांचे कनिष्ठ पुत्र छत्रपति राजाराम महाराज व त्यांच्या पुत्रांच्या पदरी इतिहासाने फक्त आणि फक्त उपेक्षाच दिली. अनेक इतिहासकारांनी करवीरच्या इतिहासाकडे लक्षच दिले नाही, ज्यांनी दिले ते फक्त सातारच्या इतिहासाला आवश्यक असेल तेवढेच दिले ! त्यातूनही संभाजीराजेंची शाहू महाराजांशी तुलना करुन संभाजीराजेंना सुमार कर्तृत्वाचे म्हणण्यातच धन्यता मानली. सातारचे शाहू छत्रपति व संभाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. शिवछत्रपतिंच्या तत्वास जागणारा कोण होता तर हाच "सुमार कर्तृत्वाचा" राजा होता. भर युद्धात प्रतिपक्षाला जाऊन मिळणाऱ्या धनाजी जाधवांसारख्या सेनापतींचा पुरेपूर अनुभव करवीर गादीच्या पाठीशी असल्याने या राजाने स्वतः लढायांचे नेतृत्व केले. काही ठिकाणी फत्ते हासिल केली, तर काही ठिकाणी पराभवही स्वीकारला मात्र रयतेचे हक्काचे व सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या गादीला मांडलिकत्वाची झळही लागू दिली नाही. स्वतः रणमैदानात उतरले, प्रसंगी राजकीय डावपेच खेळत निझामाशी हातमिळवणी केली मात्र राज्य टिकविण्यासाठी कुणाच्या सनदा आणल्या नाहीत कि कुणापुढे हात पसरले नाहीत. ज्या स्वाभिमानाने शिवरायांनी छत्रपतिंच्या गादीची स्थापना केली, त्या गादीचा स्वाभिमान संभाजीराजेंनी अबाधित राखला. कुणाचेही मांडलिकत्व न स्वीकारता अथवा कुणाचीही मदत न घेता संभाजीराजेंनी दहा सुभे व सत्तावीस किल्ले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर टिकवून ठेवले होते. या सुभ्यांची यादी पुढीलप्रमाणे...
सुभा पन्हाळा, कोट कोल्हापूर, सुभा राजापूर, सुभा नरगुंद, सुभा तोरगल, सुभा कोप्पल, सुभा तारळे, सुभा आजरे, सुभा बेळगाव, सुभा कुडाळ हे सुभे व किल्ले पन्हाळगड, किल्ले विशाळगड, किल्ले गगनगड, रत्नागिरी, महिपतगड, रामगड, किल्ले कोप्पल, बहाद्दरबिंडा, किल्ले भुदरगड, सामानगड, प्रवीणगड, कलानिधी, वल्लभगड, गंधर्वगड, महिपालगड, राजहंसगड, पारगड, किल्ले प्रसिद्धगड उर्फ रांगणा, जंजिरे सिंधुदुर्ग, संतोषगड इत्यादी सध्याच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील किल्ले संभाजीराजेंनी आपल्या प्रभुत्वाखाली ठेवले होते. तसेच विजापूर प्रांतावरदेखील संभाजीराजेंचा अंमल होता. सिंधुदुर्गावर असणारे संभाजीराजेंचे आरमार इंग्रज व पोर्तुगीजांची जहाजे लुटून करवीरच्या खजिन्यात भर टाकत होते. सेनापती उदाजी चव्हाण हिम्मतबहाद्दर व दस्तुरखुद्द संभाजीराजे मोहिमा काढून दक्षिणेतील संस्थानिकांकडून लक्षावधी रुपयांची खंडणी वसूल करायचे. संभाजीराजेंचे राज्य मोठे होते मात्र ते साम्राज्य नव्हते. नसूदे ! पण जेवढे होते तेवढे स्भामिमानाने टिकवून ठेवले होते. दुसऱ्याचे मांडलिकत्व पत्करुन आपले राज्य टिकविण्यापेक्षा स्वतःच्या बाहूबलाच्या जोरावर भलेही धीम्या गतीने पण स्वाभिमानाने राज्यभिवृद्धी करणाऱ्या आपल्या नातवाचा शिवरायांना खचितच अभिमान वाटत असेल.
१३ एप्रिल १७३१ रोजी संभाजीराजे व सातारचे शाहू महाराज यांच्या दरम्यान वारणेचा तह होऊन करवीर व सातारा राज्याच्या सीमा निश्चित झाल्या. या तहासमयी जाखिणवाडी येथे संभाजीराजे व शाहू महाराज यांची प्रथमच भेट झाली. यावेळी संभाजीराजेंनी शाहू महाराज या आपल्या थोरल्या बंधूंच्या पायांवर मस्तक टेकवून त्यांचे आशीर्वाद घेतले, यातून संभाजीराजेंची नम्रता दिसून येते. याशिवाय संभाजीराजेंनी शाहू महाराजांशी केलेल्या पत्रव्यवहारातील भाषा पाहता संभाजीराजेंच्या नम्र व शिवरायांच्या वंशजास शोभेल अशा स्वभावाचे दर्शन होते. करवीर व सातारा छत्रपति घराण्यात स्नेहभावाचे संबंध कायम राखण्यात शाहू महाराजांबरोबरच संभाजीराजेंनीही मोलाची भूमिका बजावली. संभाजीराजेंनी एकूण ४६ वर्षे राज्यकारभार केला. वडगाव येथे २० डिसेंबर १७६० रोजी छत्रपति संभाजीराजेंचे देहावसान झाले. एवढा प्रदीर्घ काळ राज्यकारभार करणारे ते पहिलेच छत्रपति होते. संभाजीराजे हे स्वतंत्र बुद्धीचे होते. लष्करी व राजकीय धोरणांबाबत ते आपली कर्तृत्ववान पत्नी महाराणी जिजाबाईंव्यतिरिक्त इतर कोणावर अवलंबून राहत नसत. संभाजीराजेंनी लष्करी पदे देत असताना वंशपरंपरा व घराणेशाहीचा विचार केला नाही त्यामुळे अनेक सरदार नाराज होऊन संभाजीराजेंचा पक्ष सोडून गेले परिणामी स्वतःच्याच सरदारांशी युद्ध करण्याचा प्रसंग संभाजीराजेंवर वारंवार ओढवला. यामुळे सातारच्या तुलनेत करवीर राज्याचा विस्तार होऊ शकला नाही. पूर्वी आदिलशाही काळात पुजाऱ्यांनी अंबाबाईची मूर्ती मंदिरातून काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली होती. संभाजीराजेंनी ती मूर्ती परत आणवून मुर्तीची मंदिरामध्ये पुनःप्रतिष्ठापणा केली. संभाजीराजे धार्मिक स्वभावाचे होते. त्यांनी अनेक मंदिर व मस्जिदींना देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. तुकाराम महाराजांच्या वंशजांना देहू व किन्ही गावच्या सनदा संभाजीराजेंनी दिल्या होत्या. इ.स. १७३२ साली सिंहगडावरील छत्रपति राजाराम महाराजांच्या समाधीवर संभाजीराजेंनी छत्री बांधली. संभाजीराजे व नानासाहेब पेशवे यांच्या दरम्यान छत्रपतिंच्या दोन्ही गाद्या एक करण्यासंबंधी एक गुप्त व अत्यंत महत्त्वाकांक्षी करार घडून आला होता. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्याने या कराराकडे दुर्लक्ष केले तेव्हा संभाजीराजे फौजा घेऊन साताऱ्यावर चाल करुन गेले होते मात्र महाराणी जिजाबाईंना फौजा मागे बोलावून घेतल्या. मराठेशाहीच्या दुर्दैवाने अथवा छत्रपतिंची गादी व करवीर राज्याच्या सुदैवाने छत्रपतिंच्या दोन्ही गाद्या एक करण्याचा करार प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
छत्रपति संभाजी महाराजांच्या मुळ चित्रावरुन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले महाराजांचे सदरील चित्र महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त आज प्रथमच प्रकाशित करीत आहोत....
No comments:
Post a Comment