नाशिकपासून अवघ्या दिडशे किमी अंतरावरील पळशी ता. पारनेर या गावाची दखल घेतल्यावाचून राहवत नाही. महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा गावात इतिहासाचा संपन्न वारसादेखील वास्तूंमधून पाहावयास मिळतो. त्यामुळेच या अशा गावात भटकंतीची सारी रूपे याचि देही याचि डोळा पाहायला मिळतात. या अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. आडवाटेवर असणारे, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारे आणि अस्सल ग्रामीण ढंगाचे हे गाव पाहणे म्हणजे सुरेख पर्वणीच ठरावे. पळशीचा गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर, हे सारे काही पळशी गावात पर्यटकांच्या स्वागतास उभे आहे. #पुणे_नाशिक महामार्गावरील आळेफाटा -बेल्हे- टाकळी ढोकेश्वर – खडकवाडी मार्गे पळशी गाव गाठता येते.
पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा, इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे
भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. महादेवाचे मंदिराचं वास्तुस्थापत्य आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नसावा हे खरोखरीच अद्भुत वाटते. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे.
भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. महादेवाचे मंदिराचं वास्तुस्थापत्य आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नसावा हे खरोखरीच अद्भुत वाटते. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे.
महादेव मंदिराच्या जवळच पळशीकरांचा देखणा वाडा आहे. हा वाडा बहुकोटाच्या दक्षिणेस बांधलेला आहे. याच बाजूला किल्ल्याचे दक्षिणद्वार आहे. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. हा वाडा पूर्वी चार मजले होता असे इथले ग्रामस्थ सांगतात, पण सध्या येथे तीनच मजले दिसतात. वाडय़ाचे प्रवेशद्वार देखणे आहे. त्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. या देवडय़ा पार करून डाव्या बाजूने आत गेलो की वाडय़ाचा मुख्य चौक लागतो. आणि आपण आता वाडय़ाच्या मध्यभागी असतो. चहुबाजूंनी वाडय़ाचा रंगमंच जणू काही फेर धरून आपल्याभोवती गोलाकार नाचतो की काय असेच क्षणभर वाटून जाते. ही कुशल कारागिरी आहे मात्र लाजवाबच. ती काष्ठशिल्पे पाहून आपण अक्षरश: स्तंभितच होऊन जातो. इतकं नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. यातली आवर्जून उल्लेख करावी लागतील अशी शिल्पे म्हणजे अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी तर हॅट्स ऑफच! वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वरच्या मजल्यावर जाता येते. वर गेल्यावर जाणवते की वाडा आता जीर्ण झालाय. ठिकठिकाणच्या भिंती ढासळल्यात. एवढय़ा सुंदर वास्तूची ही अवस्था पाहून वाईटही वाटते. वाडय़ाच्या खालच्या मजल्यावरचे देवघरही पाहण्यासारखे आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट पाहातच राहावीशी वाटते.
पळशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल राही रखुमाई मंदिर म्हणजे अत्त्युच्च आकर्षण. हे मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. वाडय़ाच्या जवळूनच दक्षिण दरवाजातून या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. छोटय़ाशा ओढय़ाजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय. त्यामुळे येथे बारमाही पाणी असते. दुरूनच पाण्याशेजारचं हे मंदिर आपल्याला आकर्षति करते. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. तसेच या तटबंदीवर आणि नगारखान्यावर जाण्यासाठी दगडी जिनेही आहेत. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. या विठ्ठल मंदिरात, विठ्ठल, रुक्मीणी व राही या तिघांच्या एकत्रित मुर्त्या आहेत. असे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पळशीलाच आहे. हे आगळे वेगळे वैशिष्टय होय. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. पण या दोन्हीही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती स्थापनेनंतरच्या कालावधीतील असाव्यात. विठ्ठलाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर मच्छ व कच्छादी दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. मुर्तीच्या सिंहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नर, आदिंच्या कोरीव मुर्ती आहेत. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात.
मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे गेल्यावर गरुडध्वज दिसतो तो पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले मन थक्क होऊन जाते. मंदिराच्या महाव्दारावर गणपती, सरस्वती ही दैवते, महाव्दाराच्या चोहोबाजूस, जय, विजय, सुरया व नक्षीकाम आहे. नगार खाण्याचे रंगकाम व नक्षीकाम विशेष आहे. सभा मंडपाच्या तीन बाजूंनी नऊ पायऱ्या नव विद्या भक्तीची प्रतिक. सभा मंडपात अठरा स्तंभ जे नउ फुट उंचीचे या स्तभांवरील कोरीव काम अप्रतिम देखणे मनात भरणार. हे अठरा खांब अठरा पुराणाचे प्रतिनिधीक स्वरुप. सभा मंडपाच्या मध्यमागी दगडी कासव आहे.
सभा मंडपाचे वरच्या भागाच्या काशाची घंटा आपली नजर वेधते. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. श्रीकृष्ण हिंदूस्थानी कलाकारांच्या हस्त कौशल्याची उत्कृष्ट शैली आहे. वास्तु शास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. सभा मंडपातील हरणांच्या वानराच्या कोरीव मुर्ती रेखाटतानां उत्तर हिंदूस्थानी कलाकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते.
गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी – सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर दोन किर्तीमुखे आहेत.
मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस व कोरीव कलाकसुरीची कोरीव कामे आहेत. त्यावरुन नजर दूर जात नाही. मंदिरात असणाऱ्या ओहारीतील नक्षीकाम अप्रतिम असून भूमितिय श्रेणीत केलेले काम असून प्रत्येक ओहोरीत वेगळ शिल्प, मंदिरा भोवती असणारी भक्कम तटबंदी मंदिराच्या प्रवेशव्दारा वरील असणारे दुसऱ्या मजल्यावरील कोरीव नक्षी कुठेही पहावयास मिळत नाही.
मंदिराच्या आवारात उत्तरेला असणाऱ्या हौदात १९७२ सालीही पाणी आटले नव्हते. मंदिराच्या आवारातूनच पुर्व व उत्तर कोपऱ्यातून एक दहा पाय-या खाली उतरत गेले की आपण पुष्करणीत प्रवेश करतो. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. मंदिर उत्तरमुखी असुन समोरच एक तटबंदी भिंत असुन यामध्ये एक दरवाजा आपणास सटवाई मंदिराच्या आवारात घेऊन जातो.
संपूर्ण मंदिराला जवळपास १५ /२० फुट उंचीची तटबंदी बांधलेली असून ती मंदिराची सुरक्षा रक्षक अनेक वर्षे उन वारा पाऊस झेलून सुध्दा सुव्यवस्थित आहे. मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून. हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडुन वाहताना दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस ओढ्याच्या उत्तर किना-यावर ऐतिहासिक रामेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर व घाट पहावयास मिळतो. रामेश्वर महादेव मंदिरातील नंदीचे शिल्प हि पाहण्यासारखे आहे.
पळशीचा कोट, विठ्ठलमंदीर व त्यासमोरील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापुर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. मंदीराची शिखरे, त्यावरील काम, त्याची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरावे.
खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे. पळशी हे देखणे गाव त्यामुळे भाग्यशाली आहे. हे गाव पाहताना आपण एका वेगळ्याच दुनियेत वावरतोय असे जाणवत राहते.
छायाचित्र सौजन्य ः दुर्गवेध ब्लॉग
No comments:
Post a Comment