विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 November 2020

स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवणारे वीर मराठा सेनानी गोदाजी जगताप

 

स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवणारे वीर मराठा सेनानी गोदाजी जगताप

सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखालीशिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.

शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. आदिलशाहीचा सरदार फत्तेखान हा २०००० फौज घेऊन शिवाजी राजांवर चालून आला. त्याने सुभानमंगळ जिंकून नंतर पुरंदर वर हल्ला केला. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचाहा पहिलाच पराभव होता.

छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला, तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप यांसारखी स्वराज्यनिष्ठ मंडळी बेलसरच्या छावणीवर गेली. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. याच वेळी बाजी पासलकर यांना वीर मरण आलं.

त्यामुळे चवताळून गोदाजी जगताप यांनी फत्तेखानाचा सरदार मुसेखान याला गाठला सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. गोदाजीचा रौद्र पराक्रम पाहून फत्तेखान विजापूरला घाबरून पळून गेला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला.

प्रतापगडाची लढाई १० नोव्हेंबर १६५९ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. प्रतापगडावर च्या लढाईत देखील गोदाजी जगताप यांनी खानाचे असंख्य सैन्य कापून काढले.

यानंतर आदिलशहाचा सरदार रुस्तुमे खान हा १६५९ मध्ये दहा हजाराची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला यावेळी छत्रपती शिवाजी राजे सेनापती नेताजी पालकर यांच्या सोबत गोदाजी यांनी देखील पराक्रम केला.

या लढाईत खानाचा पराभव झाला. पुढे १६७१ रोजी मोंगलांनी साल्हेर किल्ल्यावर आक्रमण केले. यावेळी साल्हेर वाचवण्यासाठी अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली. या लढाईत गोदाजी जगताप यांच्या सोबत त्यांचे बंधू संताजी व खंडोजी देखील होते. जगताप बंधूनी या लढाईत पराक्रमाची शर्थ केली.

औरंगजेब ने १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश ह्यांना औरंगजेबाने तुळापुर येथे हत्या केली. आता औरंगजेबाची पापी नजर फिरली ती रायगडाच्या दिशेने. त्याने रायगडा भोवतीचे फासे आवळण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले.

हीच संधी, सुवर्ण संधी ठरवण्याच्या हेतूने औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला जुल्फिकार खानच्या मदतीस धाडले. स्वराज्यावर धावून येणारे संकट पाहून माणकोजी पांढरे सारखे कर्मदरिद्री मराठे मोघलाना शामिल झाले. आई जगदंबा मदतीस धावून आली.

मोघलांचा व कपटी देशद्रोह्यांचा काळा डाव हेरखात्याने हेरला व तत्काळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावातील जिवाजी नाईक सर्कले व गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना सांगितला. स्वराज्यावर चालून येणारे संकट आणि त्याचे परीणाम लक्षात घेत हे दोन्ही वीर सोबत असलेले ९ मावळे घेऊन मोगलांना रोखण्यास सज्ज झाले.

वाऱ्याच्या वेगाने व सिंहाच्या छातीने सारे वीर खिंडीच्या दिशेने धावु लागले व बघता बघता खिंडीच्या तोंडाशी येऊन ठाकले. प्रत्येकाने आपल्या आपल्या हल्ल्याच्या जागा हेरल्या.

मराठमोळ्या गोफणी शत्रू सैन्यावर बरसण्यास तैयार झाल्या. आकाशातून जसा उल्कापात व्हावा तसा मराठ्यांचा गोफणी आता आग ओकत होत्या. भेटेल त्याला, भेटेल तेसे, कपात, तुडवत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर झालेल्या जखमा जमिनीवर रक्ताभिशेख करत होत्या. मणभर मोगली फौजे पुढे कणभर मराठे पुरून उरले.

काही मराठे वीर खिंडीत कमी आले. सेंदूर फासलेल्या हनुमंता सारखे सारे वीर दिसू लागले. ' रणचंडिका प्रसन्न झाली. ' मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळू लागले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या जुल्फिकार खानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्या नऊ योध्यांनी हाणून पडला आणि इतिहासात अजरामर झाले.

जर या लढाईत गोदाजी जगताप व जीवाजी नाईक यांनी खिंड रोखून धरली नसती तर इतिहास वेगळाच घडला असता. कदाचित महाराणी येसूबाई व संभाजी पुत्र शाहू राजेंबरोबरच छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे दोघेही मोंगलांच्या कैदेत गेले असते व मराठ्यांचे स्वराज्य १६८९ रोजीच नष्ट झाले असते. यावेळी स्वराज्य वाचवण्याचे महत्वाचे कार्य गोदाजी जगताप यांनी केले.

याच्या नंतर मात्र गोदाजी जगताप यांचा इतिहासात उल्लेख सापडत नाही. त्यांचा मृत्यू कधी झाला याची देखील नोंद इतिहासात सापडत नाही. अशा या वीर सरदाराची समाधी सासवड येथे संगमेश्वर मंदिराजवळ आहे. सासवड शहरातील संगमेश्वर मंदिराच्या उत्तरेस पुर्वाभिमुख हि घुमटी आहे. हि सरदार गोदाजी जगताप यांची समाधी. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे.

लेखन - विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Read All Posts By Infomarathi.in Team

No comments:

Post a Comment

फलटण संस्थान

  फलटण संस्थान फलटण  हे सातारा  जिल्ह्यातील    एक  तालुका व  शहर  आहे.  फलटण  शब्दाची उत्पत्ती  फल   उत्तन  ( अर्थात  फळबागांचा  प्रदेश ) अश...