विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 November 2020

बाळाजी हैबतराव


 बाळाजी हैबतराव (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) इ.स. १६४८ मध्ये फतेखानासोबत छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला होता फतेखानाच्या हुकमानुसार त्याने तेव्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला शिरवळचा सुभानमंगळ किल्ला जिंकला. पुढील काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत मिळवला; याच लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेला

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मैदानी लढाईतील विजय आणि युद्धकौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे फत्तेखानावर मिळवलेला विजय. तीन फळीमध्ये लढले गेलेले हे युद्ध समजून घेण्यासाठी आधी थोड्या इतिहासात जावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू करत असताना १६४६ मध्ये आदिलशाहाच्या ताब्यात असलेला चाकण किल्ला घेतला परत आदिलशाहच्याच ताब्यात असलेला कोंढाना १६४७ मध्ये घेतला आणि राजकारण करत पुरंदर किल्ला ही घेतला. स्वराज्याचे हे उपक्रम सुरू होते आणि याची बातमी आदिलशाहास मिळत होती त्यात या कार्यास शहाजीराजेंची शिवाजीस मदत आहे याकारणाने आदिलशाहाने शहाजीराजे यांना अटक केली आणि शिवाजी महाराजांवर दबाव टाकण्यास आदिलशाहने फत्तेखान या सरदारास शिवरायांवर स्वारीस पाठवले.
जेंव्हा फत्तेखान शिवाजी महाराजांवर स्वारीस रवाना झाला त्यावेळी आदिलशाहने केदारजी खोपडे यास ८ ऑगस्ट १६४८ रोजी फत्तेखानास मदत करण्यासाठी पत्र पाठवले होते तेंव्हा ही लढाई पावसाळ्या नंतर झाली असावी असे वाटते. फत्तेखान शिवाजी महाराजांवर चालून आला तेंव्हा त्याच्यासोबत मिनाद शेख, रतन शेख, मताजी घाटगे, बाळाजी हैबतराव, फलटणचे बाजनाइक निंबाळरकर असे आदिलशाही सरदार होते आणि शिवाजी महाराजांच्या समवेत याकाळी कावजी मल्हारी, गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे,शिवाजी इंगळे,भीकाजी चोर, भैरव चोर आणि बाजी पासलकर या व्यक्ती होत्या याची माहिती कवी परमानंद शिवभारत या समकालीन ग्रंथात देतो.
आदिलशाहने केलेल्या आज्ञेचे पालन करत फत्तेखान स्वराज्यावर चालून आला त्याच्यासोबत प्रचंड ताकदीचे सरदार होतेच त्याने स्वराज्यात आल्याबरोबर बेलसर खळद हस्तगत केले आणि तेथेच तळ देऊन मुक्काम ठोकला. फत्तेखानाने लगेच आपला सहकारी बाळाजी हैबतराव यास शिरवळला पाठवले. हैबतराव याने ही संधी न दवडता शिरवळचा सुभानमंगल हा भुईकोट किल्ला हस्तगत केला तिथे जाळपोळ केली. ही बातमी समजताच शिवाजी महाराजांनी शिरवळ घ्यायचे ठरवले आणि कावजी मल्हारी याच्या नेतृत्वाखाली गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, भीकाजी चोर यांना हैबतरावार पाठवले. हे सैन्य पहाटेच्या वेळी पुरंदरवरून शिरवळला पोहचले आणि गडावर हल्ला चढवला. किल्ल्याच्या बाहेर डोकावणर्यांची बाणांनी डोकी फोडली. किल्ल्यावरून ही चाके, मुसळे, खैराचे निखारे यांचा मारा होत होता. मर्द मावळ्यांनी त्याची पर्वा केली नाही आणि किल्ल्याच्या भिंती पाडून आत प्रवेश करून कापाकापीस सुरूवात केली. शत्रूचे १००- १२५ लोक मारले गेले. तेंव्हा हैबतराव याचे सैन्य भीतीने रण सोडून पळून गेले आणि मराठ्यांनी गड ताब्यात घेतला . नंतर सर्व मराठा सरदार शिवाजी महाराजांना भेटण्यास पुरंदरला निघाले. निघताना बेलसर येथे ही फत्तेखानाच्या सैन्याने मराठा सैन्यावर हल्ला चढवला यात बाजीनाईक जेधे यांनी शत्रुवर हल्ला चढवला आणि शत्रूचे पाच सात स्वार ठार केले व खासाचे निशाण शत्रूच्या हाती न लागू देता पुरंदर किल्ल्यावर आणले.
शिरवळ येथील पराभव फत्तेखानाच्या खूप जिव्हारी लागला यात शिवाजी महाराजांच्या शिरवळ विजयाची वार्ता विजापुरी दरबारी पोहचली. संतापलेला फत्तेखान आपल्या बलाढ्य सरदार आणि प्रचंड सैन्यासमवेत बेलसरवरून पुरंदरकडे निघाला. शिवाजी महाराज स्वता पुरंदरवर हजर होते आणि फत्तेखानाच्या प्रचंड सैन्याचा उघड्या मैदानावर सामना करणे अवघड आहे हे शिवाजी महाराजांना ठाऊक होते म्हणून सावध पवित्रा घेत फत्तेखानास पुरंदरपर्यंत येऊ दिले. फत्तेखान पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचला आणि त्याने तिथे तळ ठोकला. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागले. हे पाहताच किल्ल्यावरील मराठा सैन्यानी शत्रुवर तोफा आणि दगड यांचा मारा सुरू केला. या हल्यात फत्तेखानाचे निम्मे सैन्य रक्तबंबाळ झाले होते. फत्तेखान आणि सरदार मुसेखान हे आपल्या उरलेल्या सैन्याला धीर देत होते आणि गड लढण्यास प्रवृत्त करत होते हे पाहताच शिवाजी महाराजांनी बाजी जेधे, बाजी पासलकर, गोदाजी जगताप, संभाजी काटे या सरदारांना शत्रुवर चौफेर हल्ला करण्याचे आदेश दिला. हे मराठा सरदार आणि सैन्य शत्रुंवर तुटून पडले. गोदाजी जगताप यांनी मुसेखानास ठार केले आणि सदोजी याने अशरफशहा यास कंठस्नान घातले.
आपले मोठे मोठे सरदार युद्धात धारातीर्थी पडत आहेत हे पाहुन फत्तेखानाचे सैन्य युद्धातून पळू लागले. फत्तेखानाची तर पळताभुई थोडी झाली आणि पराभूत झालेला फत्तेखान विजापुरी परत गेला. आदिलशाहचा हा सपशेल पराभव होता. पण या युद्धात शहाजीराजेंचे एकनिष्ठ पासष्ठ वर्षाचे बाजी पासलकर स्वराज्याच्या कामी आले. बाजी पासलकर यांच्या मृत्युने स्वराज्याची मोठी हानी झाली..
शहाजीराजे यांच्या कैदेमुळे शिवाजी महाराज यांनी काही प्रतिकारार्थ हालचाल करण्याआधीच आदिलशाहने शिवरायांवर फत्तेखानास पाठवले याचा अर्थ असा आहे की आदिलशाहने शिवाजी महाराजांचे राजकीय अस्तित्व मान्य केले होते. दूसरी बाब अशी की शिवाजी महाराजांनी युद्धाची तयारी करून ही स्वता फत्तेखानावर चाल केली नाही संयम राखला आणि बंडखोरीचा आरोप होऊ न देता फत्तेखानाचा पराभव केला. यामधून आपणास शिवाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा दिसून येतो..
शिवाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, नियोजनबद्धता, अचूक यूद्धकौशल्य आणि प्रचंड आत्मविश्वास या स्वराज्याच्या पहिल्या घोषीत युद्धातुन दिसून येते ..
- राज जाधव

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...