सन १७२०-१७४० हा बाजीराव पेशव्यांचा काळ होय. या काळात बाजीराव पेशवे अपितू मराठा साम्राज्य च्या पदरी प्रचंड यश आले. हा काळ म्हणजे मराठ्यांचा इतिहासातला धामधुमीचा ही काळ. बाजीरावांच्या मोहिमांमध्ये त्यांना राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजी भिवराव रेठरेकर, उदाजी पवार अश्या लोकांची खूप साथ लाभली. पण त्यात अजून एक नाव होते, ते म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा.
आप्पांचा मूळ जन्म साल उपलब्ध नसला तरी त्यांचा जन्म १७०६ साली झाला असावा असं सर्व साधारण पणे जाणवत. अप्पांच मूळ नाव अंताजी (अनंत) होते. लहानपणी त्यांना 'चिमण' म्हणत असत. तेच नाव पुढे चिमाजी म्हणून रूढ झाले. अप्पा हे आपल्या थोरल्या भावा प्रमाणे म्हणजेच बाजीराव पेशव्यांप्रमाणे शुर, मुस्तद्दी, करारी, कर्तृत्वसंपन्न होते. प्रतापी, साहसी आणि मुस्तद्दी अश्या बाळाजी विश्वनाथ यांचा वारसा त्यांना लाभला होता.
अप्पांची दोन लग्ने झाली एक म्हणजे विसाजी कृष्ण पेठे यांची मुलगी रखमाबाई. पण थोड्याच दिवसात त्या मृत्यु पावल्या. त्यांचं दुसरं लग्न १० ऑक्टोबर १७३१ साली नारो भिकाजी थत्ते यांच्या मुलीशी झाले. त्यांचे नाव अन्नपूर्णाबाई. आई राधाबाई यांच्या वर त्यांचे विशेष प्रेम होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा राधाबाई कशियात्रेस निघाल्या असत्या त्यांच्या पालखीला खांदा देण्याचे ते विसरून गेले. याचे त्यांना फार वाईट वाटले. 'माझी चूक झाली' असे ते आपल्या मातोश्रीना लिहीलेल्या पत्रात लिहितात.
काशीबाई यांच्या बद्दल ही त्यांच्या मनात प्रेमाची व आदराची भावना होती. काशीबाई यांना ते वाहिनिसाहेब असे संबोधित असे. आप्पांचा ही त्यांना फार आदर वाटे. एकदा नानासाहेबांचे पत्र कशिबाईंना आले. काशीबाईंच्या अगोदर ते पत्र चिमाजी अप्पांनी वाचले. पण त्यात त्यांना काहीही गैर वाटले नाही. उलट त्यांनी नानासाहेबांना कळवले, "तुमचे पत्र आले ते आम्हास न कळता राजश्री अप्पास कळले. त्यांनी वाचून पाहिले. त्यावरून बहुतसे कौतुक करून बजी भिवरावास कळविले. त्यावरून वर्तमान कळेल."
चिमाजी अप्पा हे एक कुशल सेनानी होते हे आपण जाणतोच. त्यांनी माळवा बुंदेलखंड येथे स्वाऱ्या केल्या. तेथेच गिरिधर बहादुर आणि दया बहादुर यांच्या सोबत झालेली लढाई ही महत्वाची गणली जाते. पण वसईची मोहीम ही चिमाजी अप्पांच्या युद्ध प्रसंगातील कळसाध्याय मानला जातो आणि ते बरोबरच आहे. या मोहिमेत त्यांचे शौर्य, धैर्य, चिकाटी आणि वेळ प्रसंगी सैनिकांना केलेले भावनिक आवाहन आणि शत्रू पक्षासंबंधी त्यांचे औदार्य हे सर्वच गुण दिसून आले. वसई सर होत नाही हे दिसताच, "किल्ला हस्तगत होत नाही, याजकरिता मजला तोफेचे तोंडी बांधून किल्ल्यात पाडावे, नाहीतर किल्ला घ्यावा" ही त्यांची सरदारांना उद्देशून केलेली घोषणा प्रसिध्द आहे. वसईच्या मोहिमेत त्यांना विजय मिळाला व पोर्तुगीजांची सत्ता तिथून उखाडून फेकण्याचे श्रेय हे चिमाजी अप्पांनाच जाते.
आप्पांचा मृत्यु हा अवघ्या ३२ व्या वर्षी १७ डिसेंबर १७४० साली झाला. धीरोदात्तपणा हा त्यांचा गुण होता. नम्रता चारित्र्य, मनमिलाउपणा हा त्यांचा सद्गुण होता. म्हणूनच तत्कालीन कालखंडाचा विचार केला तर चिमाजी अप्पा हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.
सन्दर्भ : १) मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे
योगदान - डॉ रमेश हरिभाऊ कांबळे
२) पेशवे दफ्टरातून निवडलेले कागद खंड ९
३) पेशव्यांची बखर
- प्रथमेश कुलकर्णी
No comments:
Post a Comment