तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथांत ‘त्वरजा’, ‘तुरजा’, ‘त्वरिता’ या नावांनी एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो. ‘त्वरजा’ व ‘तुरजा’ या शब्दांपासून ‘व’ चे संप्रसारण व, ‘र’ चा ‘ल’ किंवा ‘ळ’ होऊन ‘तुलजा’ किंवा ‘तुळजा’ असा शब्द बनणे शक्य आहे, असे ग. ह. खरे यांचे मत आहे. तुळजापूर हे ठिकाण सोलापूरच्या ईशान्येस ४५ किमी. व उस्मानाबाद (पूर्वीचे धाराशिव) या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेला २२ किमी. अंतरावर वसलेले आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेकांची कुलदेवता असल्याने अनेक भाविक येथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात.
तुळजापूरचा प्राचीन इतिहास ठामपणे सध्यातरी सांगता येत नसला तरी, ‘तेर’ हे प्रसिद्ध सातवाहनकालीन व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्याकारणाने तुळजापूर परिसरातून इंडो-रोमन व्यापारी मार्ग जात असावा. तुळजापूरपासून जवळच आपसिंगा, तीर्थ बु., काटी-सावरगाव इ. ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. या प्रदेशांवर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होता. पुढे काही काळ ब्रिटिश अधिकारी कर्नल मेडोज टेलर हे या भागाचे आयुक्त (कमिशनर) होते.
तुळजापूर येथील मुख्य आकर्षण म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगररांगेतील ‘यमुनाचल’ नावाच्या डोंगरावर बांधलेले आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते, ‘यमुनाचल’ हे पर्वतनाम ‘यम्मन गुड्ड’ (यमाईचा डोंगर) या कन्नड नावाचे संस्कृतीकरण असावे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ, तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः १३ व्या शतकात बांधले असावे, असे दिसते. सध्या गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ इ. स्थापत्य मंदिर परिसरात दिसते. देवीचे मंदिर हे दगडी प्राकाराने बंदिस्त असून, त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींची भव्य प्रवेशद्वारे आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवर्यांत विभिन्न परिवारदेवता आहेत. साधारणतः अठराव्या शतकात मंदिराच्या बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचे येथील वास्तुस्थापत्यावरून दिसून येते. निंबाळकर दरवाजाच्या बाहेरील भागात दोन्ही बाजूंना ‘मातंगी देवी’ व ‘भैरवा’ची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या स्थापत्यरचनेवरून साधारणतः चौदाव्या शतकात बांधली असावीत, असे दिसते.
- विजय सरडे
No comments:
Post a Comment