३६० लहान मोठी शिवमंदिरं असलेलं महाराष्ट्रातलं हे गाव – चारठाणाचारठाणा
हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधेसे खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते.
तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही. (ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर-जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार.
हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६ वे ते ९ वे शतक) राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र, ह्याची आई चारुगात्रीदेवी-ही मोठी शिवभक्त होती.
ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी) तिची ही इच्छा राजाने पूर्ण केली.आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत. बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत.
अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात.
भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात.
अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात … असो
गावात (आणि इतिहास प्रेमींमध्ये) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी ही दीपमाळ वाटत नाही.
पणत्या किंवा दिवे लावायचे अनेक छोटे छोटे हात / जागा ह्यावर नाहीत,शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत.विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. मंदिराला आणि छताला भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात.
हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे. मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका, ह्यांनाच सात आसऱ्या असे ही म्हणतात.
सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे मात्र नाही दिसला. सासरेबुवांच्या घराबाहेर कडूनिम्बाच्या झाडावर करकोच्यानी केलेलं घरटे.
करकोचे माणसाच्या वस्तीच्या इतके जवळ घरटे करून राहतात हे माहितीच नव्हते.
रस्त्याच्या बाजूला भग्न शिल्प पडलेली दिसतात. उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर आहे, हिला खुराची देवी असेही म्हणतात.
का? ते पुढे कळेल…..हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवी ची मूर्ती.
स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा.हा किर्तीस्तंभ किंवा विजय स्तंभच आहे. असे एकलकोंडे किर्तीस्तंभ महाराष्ट्रात विपुल आढळतात. हा जवळ पास ४५ फुट उंच आहे.
आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा, उभा मातीखाली गाडला गेलेला होता. आमच्या सासुबाइन्च्या काकांनी- भाऊ काकानी (माझे चुलत आजे सासरे- वय वर्षे ८५ ) सांगितल्याप्रमाणे मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.हा इतका उंच, सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते.
हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात.
वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले (मी चूक असल्यास जाणकारांनी सांगावे) पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात थोडा फरक जाणवतो.
ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड-झुडप, चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
स्तंभाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी- अत्यंत सुबक, अप्रतिम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून तरती नुसती लटकवलेली दिसते.
मागची आधाराचीदगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते. अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.



No comments:
Post a Comment