विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 December 2020

वसईचा वीर !

 





वसईचा वीर !
वसईच्या किल्ल्यावर यशस्वी चाल करून तिथल्या पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा यांचा आज स्मृतिदिन !
चिमाजी उर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ.
त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली.
वसईची लढाई ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. या कामगिरीसाठी चिमाजी अप्पांची नेमणूक झाली. आपल्या थोरल्या भावाचा विश्वास सार्थ ठरवला.
या लढाईची कथाही तितकीच विस्मयजनक व नाट्यमय आहे.
१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला.
आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद झाले.
शेवटी १६ मे १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी बुरुजांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.
या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली.
शरण आले असताही आपल्या सैन्यास मानाने वाट काढून द्या, अशी विनवणी पोर्तुगीज सैनिकांनी केली. चिमाजीनी ती दिलदारपणाने मान्य केली. त्यामुळेच काही सैनिक दिव, दमणला तर काही गोव्याला पोहोचू शकले.
असे चिमाजी अप्पा. आपण स्वतः: किंवा चिरंजीव सदाशिवराव भाऊ केव्हाही 'पेशवा' बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले.
त्यांच्या स्मृतींना वंदन !
- भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...