विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 6 December 2020

भाळवणीचे वीर खंडेराव नाईक निंबाळकर

 


भाळवणीचे वीर खंडेराव नाईक निंबाळकर

निदान खानदानी माणूस याप्रमाणे कामास आले
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेला स्वराज्याचा गाडा पुढे पेशव्यांनी समर्थपणे चालविला असे म्हटले जात असले तरी पेशवाईतसुद्धा अनेक मराठा सरदारांनी मराठ्यांच्या साम्राज्याकरिता आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे. त्यात महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघोजी भोसले, सयाजीराव गायकवाड, आबाजी कनडे, हिंमतबहाद्दर, उदाजी चव्हाण यांचा समावेश आहे. निंबाळकर घराण्यात तर फलटणकर, खर्डेकर, धाराशिवकर, वैरागकर अशा अनेक शाखा स्वराज्यकामी खर्ची पडल्या. तरीसुद्धा आपण काय सांगतो- पंपावर काम करणारा मुलगा लक्ष्मीपती अंबानी झाला, बारावी नापास सचिन क्रिकेटचा देव झाला पण हे का सांगत नाही...कुठल्याही शाळेत न शिकता शिवबा छत्रपती झाला. अशाच एका दुर्लक्षित असणा-या खंडेराव नाईक-निंबाळकरांच्या पराक्रमाची गाथा इथे पाहणार आहोत. पंढरपूर-सातारा रस्त्यावर पंढरपूरपासून विसेक कि.मी. भाळवणी गावातून पुढे जाताना डाव्या हाताला एक मोठा दगडी चिरेबंदी वाडा लक्ष वेधून घेतो. शिवरायांच्या पत्नी सईबार्इंच्या फलटणकर नाईक निंबाळकर घराण्याची एक शाखा भाळवणी येथे स्थिरावली. १०-१२ एकर चिरेबंदी वाड्याचे ऐतिहासिक विश्लेषण केल्यास हा वाडा एवढा भव्य असून त्याला एकही बुरूज नाही. शिवाय ती उंचावरची गढी नाही. त्यामुळे वाड्याचे वयोमान छत्रपती शिवरायांपर्यंत जाते. कारण आपल्या स्वराज्यात कोणीही गढ्या-बुरूज बांधू नयेत असा आदेश दिला होता.
वाड्याची समृद्धी वाढविली ती म्हणजे पानिपत युद्धात खंडेरावांनी. १७६१ साली मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या तिस-या पानिपत युद्धामुळे सारा मराठी मुलुख काळोखात गेला होता. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीसह नजिबखान रोहिला, सुजाउद्दोला, सुरजमल जाट यांनी दिल्लीच्या तख्तासाठी पानिपतच्या पलिकडे यमुनापार तळ ठोकला होता. त्याला विरोध करण्यासाठी मराठ्यांची फौज दिल्लीच्या रोखाने निघाली. पानिपतचे युद्ध हे दिल्लीचा मोगल बादशहा व अफगाण बादशहाच्या दरम्यान होत असताना त्यात मराठ्यांनी भाग का घ्यावा असा प्रश्न विचारला जातो. परंतु आपणास माहीत हवे की मराठे आणि दिल्लीच्या बादशहादरम्यान ‘अहमदिया करार’ झाला होता. बादशहाकडून मराठ्यांना चौथाई -सरदेशमुखी मिळाली होती. त्याबदल्यात दिल्लीचे तख्त राखणे ही मराठ्यांची जबाबदारी होती. खरे तर मराठ्यांना हिंदुस्थानच्या सीमा पाकिस्तानच्या पलीकडे अटकेपार न्यायच्या होत्या. अब्दालीला विरोध करण्याकरिता भाऊसाहेब पेशवेंच्या नेतृत्वाखाली १ लाखाची आसामी दिल्लीच्या रोखाने निघाली. त्यात बळवंतराव मेहेंदळे, नाना पुरंदरे, हरी शिवराम खासगीवाले या मुख्य सरदारांसोबत विठ्ठल शिवदेव, अंताजी माणकेश्वर, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, खंडेराव नाईक निंबाळकर भाळवणीकर, इब्राहिमखान गारदी या खासा सरदारांचा समावेश होता.
१४ जानेवारी १७६१ म्हणजे ऐन संक्रांतीचा दिवस असूनही युद्धाला तोंड फुटले. नजिबखान रोहिल्याने आपल्या तोफखान्याने मराठ्यांवर चाल करत मागे रेटण्यास सुरुवात केली. तेव्हा मराठे चवताळून उठले. इब्राहिम गारदीने आपल्या तोफांतून आग ओकायला सुरुवात केली. मराठ्यांच्या फौजेत हुजुरातीची म्हणजे घोडेस्वारांची ५२ पथके होती. यामध्ये भाळवणीच्या खंडेराव नाईक निंबाळकरांच्या स्वारीचा समावेश होता. मराठ्यांच्या फौजेतील वेगवेगळे सरदार आपापल्या परीने पराक्रमाची शर्थ करत होते. त्यामुळे दुपारपर्यंत मराठ्यांचा विजय दृष्टिक्षेपात दिसत होता. या वेळी बळवंतराव मेहेंदळे घोड्यावर बसून आपल्या तुकडीला उत्तेजन देत पुढे सरसावले. त्याच वेळी शत्रूची एक गोळी मेहेंदळेंच्या छातीस लागून ते ठार झाले. त्यामुळे मराठ्यांच्या फौजेत एकच गोंधळ उडाला. बळवंतराव मेहेंदळेची तुकडी मागे सरकली तेव्हा त्यांचे शीर कापून अब्दालीस नजर करावे म्हणून रोहिले पुढे सरसावले. आपल्या सरदारांची विटंबना होऊ नये म्हणून खंडेराव नाईक-निंबाळकर या मराठा सरदाराने केवळ सती पडावे तसे बळवंतराव मेहेंदळेंच्या मुडद्यावर पडून त्यांचे शीर रोहिल्यास कापू दिले नाही. इतिहासात त्यांच्या पराक्रमाची नोंद करताना पुढील शब्दांत दखल घेतलेली आहे. खंडेराव नाईक-निंबाळकर हे निदान खानदानी माणूस याप्रमाणे कामास आले. त्यांना जखमा झाल्या तरी बळवंतराव मेहेंदळे यांचा मृतदेह ओढीत मराठी सैनिकांच्या गोटात आणून त्यास मूठमाती दिली. निदान खानदानी माणूस कामास आले. याप्रमाणे उल्लेख करून इतिहासाने त्यांचे धाडस, शौर्य स्पष्ट केले आहे. पानिपतच्या रणसंग्रामाची चर्चा करत असताना पराक्रमासोबतच दैवाचा कौलही पाहावा लागतो. दुपारी २ वाजेपर्यंत मराठ्यांनी शत्रूच्या गोटात मुसंडी मारत आपला विजय दृष्टिक्षेपात आणला होता. हुजुरातीच्या पथकाने यात फार मोठी कामगिरी बजावली होती. हातघाईची लढाई चालू होती. त्याच वेळी मराठ्यांच्या मुख्य सरदारांपैकी एक विश्वासराव पेशव्यांना गोळी लागून ते अंबारीत कोसळले आणि मराठ्यांचे मुख्य शिलेदार भाऊसाहेब पेशव्यांचा तोल ढळून ते हत्तीवरून घोड्यावर बसून शत्रूवर चाल करून गेले व गर्दीस मिळाले. सा-या महाराष्ट्रावर संक्रांत कोसळली. मराठ्यांची एक लाख बांगडी फुटली. त्या दिवशी झालेल्या नरसंहारात मुडद्यांच्या ३२ राशी युद्धभूमीवर पडल्या. या राशीतला एक देह हा खंडेराव नाईक निंबाळकरांचा होता. पानिपतावर खंडेराव नाईक-निंबाळकरांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांच्या मुलांना छत्रपती रामराजांनी दिलेली सनद-राजश्री वणगोजी बिन खंडेराव नाईक व म्हालोजी बिन शहाजी नाईक, रामचंद्र नाईक व यशवंतराव नाईक बिन खंडेराव नाईक निंबाळकर यांनी विनंती केल्यावरून तीर्थरूप खंडेराव नाईक-निंबाळकर हिंदुस्थानात पानिपतच्या लढाईत स्वामी कार्यास आले. यास्तव कै. माधवराव पेशवे यांनी इनाम करून दिले. फक्त पानिपतच नाही तर तत्पूर्वीही खंडेरावांची तलवार खूप चालली होती. त्यानुसार अब्दालीचा बंदोबस्त करण्याकरिता १७५८ साली राघोबादादांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजा लाहोरपावेतो जाऊन पोहोचल्या. या वेळी २० एप्रिल १७५८ साली मराठ्यांनी लाहोरचा कब्जा मिळविला होता. या वेळी खंडेराव नाईक निंबाळकरांनी मोठा पराक्रम गाजविला होता. खंडेरावांप्रमाणे त्यांच्या मुलांनीही पुढे घराण्याची परंपरा तशीच चालू ठेवल्याने १७७५ साली झालेल्या एका युद्धात शहाजी खंडेराव नाईक-निंबाळकर हे काठीबाबा पिराच्या घाटावर गोळी लागून धारातीर्थी पडले. इ.स. १७९९ पर्यंत भाळवणीच्या नाईक-निंबाळकर घराण्याच्या संदर्भातील उपलब्ध होतात. त्यानुसार महादजी शिंदेंनंतर त्यांच्या पत्नी आणि दत्तकपुत्र दौलतराव यांच्यामध्ये मोठा बेबनाव निर्माण होऊन पेशव्यांकडे फिर्याद करूनही काही फरक न पडल्याने शिंदेच्या बायांनी मराठ्यांच्या साम्राज्यात हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. तेव्हा शिंदेंचा सरदार देवजी गौळा याने भाळवणीवर चाल केली तेव्हा वंगोजी नाईक निंबाळकर आपल्या पुतण्यासह जमावानिशी बाहेर पडले, लढाई झाली त्यामुळे वंगोजीचा वाडा अद्याप शिल्लक आहे अशी नोंद सापडते.
पानिपत युद्धाची कारणे मीमांसा करताना यामध्ये मराठ्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला व मराठ्यांची एक पिढी गारद झाली असे म्हटले जाते. परंतु हेही वास्तव स्वीकारणे भाग पडते की, पानिपतावर मराठ्यांना अपयश जरूर आले असेल तरी परंतु हिंदुस्थानचा त्यातही मोठा फायदाच झालेला आहे. कारण मराठ्यांनी तुडविलेल्या भूमीतच आजचे हिंदू शिल्लक आहेत हेही कोणी विसरू नये. कारण पानिपतची रणभूमी खंडेरावांसारख्या वीरांच्या रक्ताने माखलेली असून केवळ आपल्या सरदारांच्या प्रेमाची विटंबना थांबविण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान त्या भूमीत रुतलेले आहे. या पराभवाचा सर्वांत मोठा फायदा जर कोणता झाला असेल तर अब्दालीसारखे अफगाणिस्तानातले मुस्लिम आक्रमक पुन्हा म्हणून हिंदुस्थानच्या भूमीत फिरकले नाहीत.
Reference -( प्रा. डाॕ. सतीश कदम 9422650044 )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...