विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 December 2020

अर्र ज्याची तलवार खंबीर त्यो हा हंबिर

 


अर्र ज्याची तलवार खंबीर त्यो हा हंबिर...*

स्वराज्याचे पहिले सरसेनापती
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते त्यांची नेमणूक इस१६७४ साली झाली हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होतेया घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना सरसेनापती प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हंबीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' यांची आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर युवराज शंभूराजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच युवराज शंभू राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांना मिळाले होते. हंबीररावांनी युवराज शंभू राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
युवराज शंभूराजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांनी स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८७ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द छत्रपती संभाजी राजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु हंबीरराव तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.
या हंबीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...