विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 December 2020

°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°°



 °°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°°

छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत्रे उपलब्ध होतात. या पत्रांमधून व्यंकोजीराजांना शिवछत्रपती उपदेश देताना दिसतात. तंजावरातून विजापूरकरांचे महत्त्व कमी करावे व विजापूरकरांच्या मांडलिकत्व कायमचे सोडावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मत होते, असे या पत्रांवरून दिसते.
त्याचबरोबर स्वारीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर व्यंकोजींनी स्वीकारलेली वैराग्य वृत्ती ही शिवाजी महाराजांना नको होती. या सर्वांवरून व्यंकोजीराजांनी स्वतंत्र वृत्तीने राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात हातभार लावा हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू होता हे स्पष्ट होते.
दक्षिण दिग्विजयाच्या स्वारी वरून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्र लिहिले. (पोस्ट मधील पत्र) व्यंकोजीराजे यांच्या सैन्याचा मराठ्यांच्या सैन्याकडून पराभव झाल्यामुळे व्यंकोजी राजांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली होती. तेव्हा या पत्रातून शिवछत्रपती व्यंकोजीराजांना वडीलकीच्या नात्याने उपदेश करतात. यातून शिवराय व्यंकोजीराजे या दोघांच्याही भूमिकेवर प्रकाश पडतो.
पराभूत झाल्यानंतर व्यंकोजीराजांनी वैराग्य वृत्ती स्वीकारली तेव्हा शिवराय व्यंकोजीराजांना समजावताना सांगतात की, आपण स्वतः किती बिकट प्रसंगांना तोंड देऊन राज्यविस्तार केला. हा आदर्श समोर ठेवा. आणि आम्हाला तुमच्या "पराक्रमाचा तमाशा दाखवा"
"आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची" याउपरी सहसा वैराग्य न धरिता मनातून विषण्णता (काढून) कालक्रमणा करीत जाणे. सणवार उत्साह पुर्ववत करीत जाऊन तुम्ही आपले संरक्षण करीत जाणे. जमेती सेवक लोकांना रिकामे न ठेवून कार्य प्रयोजनाचा उपयोग करून पुरुषार्थ व कीर्ती अर्जणे"
या पत्रामधून छत्रपती शिवराय व्यंकोजीराजांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देतात, व त्याच प्रकारे वडीलकीच्या नात्याने व्यंकोजीराजांना चार गोष्टीही सांगतात...!
पत्र संदर्भ - गो.स.सरदेसाई संपादित "ऐतिहासिक पत्रबोध"

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...