अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
मराठी फौज निघाली... खानाला कसलीच खबर नाही..
दोन दिवसात प्रतापराव उमराणी जवळ येऊन पोहोचले... उन्हाळ्याचे दिवस होते... सुर्य तापला होता...काही पाऊले पुढे जावे तर पाण्याला जीव हपापत होता... आणि बस्स !!!
प्रतापरावांना महाराजांचे शब्द आठवले...
" खानास असे घेरावे की , जसा तो वणव्यात फसलाय...!!"
आणि प्रतापरावांनी खानाला वणव्यात फसवले , उन्हाच्या वणव्यात !! त्या उमराणी मध्ये फक्त एकच पाणवठा होता... पिण्यासाठी पाणी फक्त तिथेच होते...
आणि प्रतापरावांनी सिद्दी हिलाल यांना पाणवठाच घेरण्यात सांगितले !! अरे काय ते.. खानाचे सैन्य नाही तर पाणवठा अगोदर घेतला.. आणि का ?? तर खानाला अश्या जागी संपवावे की त्याने पाण्याच्या थेंबाला सुद्धा तरसत सुटावे.....
आता पर्यंत खानाच्या माणसांना तहान लागली नव्हती पण सैन्यातील हत्ती मात्र तहानेले....आणि बस्स हत्ती घेऊन जलाशयाकडे सैंनिक निघाले...आणि !!! अरे काही क्षणा अगोदर हत्ती हालत डुलत घेऊन जाणारे सैनिक...
जागोजागी पडत धावत परतले.... त्यांच्या छातीत चांगलीच धडधड वाढली होती... घाम फुटला होता... जोर्याजोर्याने ओरडत होते...
" हुजुर !!!! ह...ह...हुजुर.. व..वो..वो...आ...गये हुजुर....!!!"
त्यातच तिथे गश्त घालणारा सिद्दी मुहम्मद बर्की ओरडला...
" क्या हुवा ??? ऐसें क्यो भाग रहे हो... कोई जीन..विन..देखलीया क्या ???"
पडुन आलेला एक सैनिक म्हणाला...
" हुजुर जीन होता तो चल जाता पर हुजुर.... वो...वो...मरहट्टे आ...गये!!!"
पुढे चालत येत बहलोलखान म्हणाला...
"क्या कह रहे हो मरहट्टे ???..."
आणि तेवढ्यातच मातीचा लोट उडाला.... घोड्यांच्या टापांचा आवाज उठला....आणि पुढे सैन्य दिसायला लागलं....आणि घोड्यावर बसून तलवार धरून खासे प्रतापराव गुजर येत होते...!!!
सोबतसोबत विसाजी बल्लाळ , दिपाजी राउत ,विठ्ठल पिलाजी अत्रे ,कृष्णाजी भास्कर ,विठोजी शिंदे, आनंदराव मकाजी...
सर्वांनी आदिलशाही फौजेला घेरलं आणि....
"सुई....सुई...सुई..." करत धनुष्यातुन बाण सुटले...
"सप्प... सप्प..." करत बाण छाती, नरडीचा घोट घेऊ लागले...
आदिलशाही फौजेत धावपळ उडाली.... तोच बहलोलखान पुढे आला...
" सल्तनत की कसम खा कर निकले है... लढो !!!नारे तकविर ...."
आणि आदिलशाही फौजेने तलवार उसळल्या....मराठ्यांच्या पराक्रम पुढे टिकणारं कोणीही तिथे नव्हते....
तलवारी खणाणु लागल्या... खड्गावर झेलल्या जाऊ लागल्या....
प्रतापरावांची तलवार क्षणात... दहा दहा गनिम संपवत...
दिपाजी राऊतांची नजर गेली ती सरळ हत्ती वरील शत्रू कडे...मध्ये येणाऱ्या प्रत्येकास दिपाजी कापत सुटले...
कृष्णाजी भास्कर पुढे आले... तलवारी ने शत्रूचे मुडदे पाडू लागले...
आणि आदिलशाही फौजेपुढे कडाडून उठले...
" आरं स्वराज्याकडं...वाकडी डोळे...करत होतात व्हय !!! आरं...तुमचे डोळेच काढून फेकतुया....हर हर महादेव...."...क्रमशः
अक्षय चंदेल (लेख अधिकृत)
आनंदरावांच्या तलवारी खाली आदिलशाही मुंडकी छाटल्या जात होते.... रणमर्द आनंदराव लढत होते....
" हर हर महादेव..." च्या रणगर्जनेत अवघ्या रणभूमी ला गाजवत होते... पण पण... आदिलशाही फौजेतील एका हरामखोराने मागुन त्यांवर वार केला.... आनंदराव जखमी झाले.... पण थांबायचे नाही... लढायचं आपल्या स्वराज्यासाठी... आनंदराव उठले... जय शंभु...म्हणत लढत सुटले एक नव्हे दोन नव्हे सल्लग तीन घटका...
सिद्दी हिलाल, रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर यांनी आपल्या तलवारी ने शत्रुचे मुडदे पाडले.....
आणि तेवढ्यातच मराठ्यांच्या मनगटाने आणखी बळ धारण केले...विठोजी शिंदे , विठ्ठल पिलदेव रणक्षेत्री येऊन पोहोचले....खानाचे सैन्य चौफेर घेरल्या गेले...
"हर हर महादेव...." पुढे "दिन.... दिन...." कधीच गायब झाले...
आणि दुष्काळात आदिलशाही चे तेलही गेले आणि सोबत तूपही....
युद्धात अगोदरच पिछाडीवर असेलल्या आदिलशाही फौजेचा एक हत्ती बिथरला.... आणि आपल्याच फौजेला पायाखाली तुडवत सुटला...
बहलोलखानास काय करावे ते कळेना पण मराठ्यांच्या मनात भलताच विचार सुटला....
माहुतांनी "हर हर महादेव ...." म्हणत हत्तीच घेरला... "जय भवानी.. " म्हणत...." धडा धडा " हत्तीवर च चाल करून हत्तीच ताब्यात घेतला....
खानाचा एक सरदार सिद्दी मुहम्मद बर्की.... पराक्रमी लढत होता... पण सूर्यास्त होता होता... त्याच्या मनात भीती सुटली... लपून छपुन पळून जाण्यासाठी तो घोड्यावर स्वार होऊन निघाला..... पण पण...दिपाजी राऊत आणि कृष्णाजी भास्करांनी त्याला घेरलं.... दिपाजी म्हणाले...
" काय रं...कुठं...जातुया ???"
बर्की काही बोलेल की तेवढ्यात कृष्णाजी म्हणाले...
" आवं दिपाजी ह्यो कुठे जातोय... याला आपण पाठवू...ते बी यमसदनी.!!!!"
पण बर्की ने घोड्यावरून पलटी घेतली आणि दिपाजींच्या घोड्यावर तलवारी ने वार केला घोडा जखमी झाला तो पडतोच की दिपाजींनी घोड्यावरून उडी मारली... कृष्णाजींनी लगेच तिथे दुसऱ्या घोड्याला आणले पण बर्की ने तो पण जखमी केला.... आता दिपाजींचा संयम सुटला... आणि दिपाजींनी सिंहगर्जना केली..।
" ऐ....हरामखोरा अरे.हट्ट!!!!!"
आणि जमदाडीचा असा वार झाला सप्प !!!! बर्की तिथेच संपला...
सिद्दी मुहम्मद बर्की ठार मारल्या गेला हे ऐकताच... बहलोलखान धास्तावला...
आता काय करावे ते कळेना..
आता एकच उपाय पुढे होता.... शरण जाण्याचा... कारण लढून मरण्यासाठी , मराठ्यांसारखे शौर्य अंगात असावे लागते...वेतनासाठी लढणारी आदिलशाही फौज कुठे लढणार आणि बस्स !!!
प्रतापरावां पुढे खानाचे वकील आले....
खानाने शरणागती पत्करली...
" आपण तुम्हावरी येत नाही ,पादशाहाचे हुकमाने आलो, याऊपरी आपण तुमचा आहे...हरेक व्यक्ती आपण राजाचा दावा ना करी.....!!! "
सरनौबत प्रतापरावांना दया आली...
प्रतापरावांनी बहलोलखानास माफ करून धर्मवाट दिली..मुकाट्याने डोक्यात प्रतिशोध ची अग्नी जाळत बहलोलखान सैन्यासह चुपचाप निघाला....
अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
महाराजांना पन्हाळ्यावर विजयाची वार्ता मिळाली पण.... बहलोलखानास शरण...दिली ,धर्मवाट दिली... नाही कदापी सहन नाही... त्या खानाला मारायचे होते... सोडून तरी का दिले ????
लगेच प्रतापरावांना खलिता गेला...
प्रतापराव युद्धात विजयाने आनंदी होते...
खलिता हाती आला... आणि राजेंचा राग स्पष्ट पुढे आला...
" सल्ला काय निमित्त केला....??? जेव्हा खानास कचाट्यात घेरलं तर त्याला कैद का केले नाही ???"
महाराजांचा रागात असलेला चेहरा प्रतापरावांच्या पुढे येत होता... आपण केलेली चुक त्यांच्या मनात घर करत होती...
प्रतापराव पन्हाळा न परतता हुबळी वर चालून गेले...प्रतापरावांच्या डोक्यात आपण केलेल्या चुकीबद्दल विषण्णता भरून आली..
महाराज रागावले !!! आपण का सोडले खानाला... अरे हे गनीम , म्लेंच्छ तर विषारी साप आहे सोडून दिले म्हणून डसनार नाही हा विचार तरी आपण का केला. , हा बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आला तर....!!!
विचारांचे थैमान प्रतापरावांच्या मनात घर करून होते... प्रतापराव दख्खन भागात स्वारी करत होते , हुबळीची पेठ पुर्ण लुटली...
अक्षरशः खणत्या लावल्या... नंतर कडवाड प्रांत वर छापा टाकला...
प्रतापराव लढत होते , शाही मुलखात हौदास घालत होते... पण तरीही डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा येत होता...
शिवरायांचा रागावलेला !!!!....
राज्याभिषेक चा क्षण जवळ आला होता..
सलग तीस वर्षे मावळे लढत होते , आपल्या राजा साठी, स्वराज्यासाठी, देव देश आणि धर्मासाठी....
सर्वांचे जीवन सार्थक होणार होते...
" सरज्या शिवाजी महाराज... छत्रपती होणार होते...."
अवघ्या पाहुण्यांना , सरदारांना , निमंत्रण जात होते...
रायगडावर राज्याभिषेक ची लगबग सुरू झाली ... गडावर रंगरंगोटी करण्यात येत होती.......
अवघ्या रायगडावर लगबग सुरू होती...
जिजाऊ मासाहेब या शुभक्षणाच्या चाहुलीमध्ये आपली तब्येत वगैरे सर्व विसरून गेल्या....
" मासाहेबांचा शिवबा राजा होणार छत्रपती होणार.. !!!"
संध्याकाळी शंभुराजे जिजाऊ मासाहेबांच्या दालनात होते....
मासाहेबांना थोडे अस्वस्थ वाटत , अवघ्या दार खिडक्या झाकलेल्या होत्या ,मासाहेबांना रायगडावरील वारा सहन होत नव्हता...
शंभुराजे मासाहेबांना म्हणाले....
" आऊसाहेब... आमचे आबासाहेब लहानपणी कसे होते ??"
आऊसाहेब हसत म्हणाल्या...
" शंभुबाळ...!! शिवबा अगदी खोडकर होते.
लहानगे शिवबा रेंगाळत जायचे आणि आमचे
लक्ष हटले की लगेच शिवनेरी ची माती तोंडात टाकत...!!!"
शंभुराजें हसले... सोबत मासाहेब सुद्धा ,....पण हसता हसता मासाहेबांना जोर्याने खोकला सुरू झाला... शंभुराजेंनी लगेच पाणी आणले...मासाहेबांना दिले...
मासाहेबांच्या तुळजाऊ डोळ्यातून पाणमोती कोसळले..
शंभुराजेंच्या डोक्यावर हात फिरवून मासाहेब म्हणाल्या...
" शंभुबाळ !! आजही असे वाटते की , तुमचे आजोबा, आमची स्वारी... लहानग्या शिवबांना आमच्या कडे घेऊन येत आहेत.!!!"..
अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
राज्याभिषेक चा क्षण जवळ आला होता....!!!
देवीच्या नावाने भंडारा उधळू लागला !! मशाली तेवत होत्या , सर्वांच्या चेहऱ्यावर आईच्या भक्तीचा सुर उमटत होता ....
सल्लग तीस वर्षे लढत होती रयत , राजे , मावळे या स्वराज्यासाठी , देव , देश आणि धर्माच्या रक्षणासाठी.....आज पारतंत्र्याचा तिमिर मिटुन नवीन स्वातंत्र्याची पहाट उगवत होती , या पहाटेचा सुर्यनारायण रायगडाच्या पाठीमागुन उदयास येत होता...
अष्टप्रधान पैकी सात गडावर हजर होते पण पण...
सरसेनापती प्रतापराव गुजर मात्र या राज्याभिषेक च्या तयारी मध्ये कुठेही नव्हते...
प्रतापराव या वेळी नेसरी गडहिंग्लज जवळ होते....
बहलोलखानाने स्वराज्यावर चालून येण्यासाठी तब्बल चाळीस हजार एवढे सैन्य गोळा केले होते...
तुर्तास तो तिकोटा ला तळ ठोकून बसला होता पण त्याच्या सैन्याने... आसपासच्या प्रदेशात धुमाकूळ घातला....
" मायमाऊल़ींच्या अब्रू लुटल्या , पिकलेल्या शेती जाळून टाकल्या , लोकांची घरे पाडली , कित्येक मुलं अनाथ केली ,कित्येक घर निर्वंश केले...."
लहान लेकरांच्या किंकाळ्या , मायमाऊलींच्या आरोळ्या...
प्रतापरावांच्या पुढे अत्याचाराचे चित्र उभे राहत होते.... कित्येक ठिकाणी स्वतः प्रतापराव आपल्या डोळ्यांनी बघून आले होते....
प्रतापरावांना बहलोलखानास दिलेल्या धर्मवाटेवर राग येत होता , आपण ही घोडचूक केलीच कशी ??? राजांना काय तोंड दाखवावं , राजे रागावले आहे.... नाही, नाही आम्ही राजेंपुढे जाऊच शकत नाही...
आणि तो.शिवरात्रीचा दिवस आला...
प्रतापराव आणि सोबत विसाजी बल्लाळ , दिपाजी राउत ,विठ्ठल पिलाजी अत्रे ,कृष्णाजी भास्कर , सिद्धी हिलाल ,विठोजी शिंदे हे रणमर्द अश्वस्वार होऊन बाहेर पडले होते....तोच प्रतापरावांना पुढे येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आल्या.....
अश्वस्वार जवळ येत थांबले...
प्रतापरावांना स्वाराने हाक दिली...
" सरनोबत....सरनोबत बहलोलखान येतुया चाळीस हजार फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतुया...."
प्रतापरावांच्या डोळ्यात अग्नी पेटली... घोड्याला दोन पायावर उभे करून प्रतापराव म्हणाले...
" कुठे आहे तो....हरामखोर ??? आम्ही त्यास धर्मवाटेवर सोडले आणि तो स्वराज्यावर उलटला....."
स्वार म्हणाला...
" सरनोबत !!! खान नेसरी कडे येतुया...."
आणि बस्स !!! क्षणात वारा सुटला , सुर्याचे प्रखर सप्त अश्वरथ निघाले.... क्षणाचाही विलंब न करता प्रतापरावांनी घोड्याला टाप मारली... सोबत विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी हे वीरही निघाले..
आलेले अश्वस्वार आवाज देत होते...
" सरनोबत !! थांबा , थांबा सोबत फौज घ्या...गनिम हजारो आहे... थांबा..."
पण हे सातही विर निघाले... जसे सप्तऋषी निघाले, जसे सात नद्या समुद्राला भिडण्यासाठी निघाल्या...
असुर निर्दालना आई जगदंबेच्या निघाल्या सप्त तलवारीच्या पात...
शिवतेजाचे वेडात मराठे विर दौडले सात...
अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
बहलोलखान हत्तीच्या अंबारी वर बसून आपल्या सैन्यासह पुढे येत होता...
पण पुढे जाणारे सैन्य क्षणार्धात थांबले...
कोणी तरी येतय...धुळ उडतोय...!!! हा !! पण फारसे नाही कोणी... पंधरा विस लोक येत असतील...
बहलोलखान हत्ती वरुन दुर्बीण ने पुढे बघत होता... तेच त्याने हातून दुर्बीण फेकली आणि ओरडला...
" देखो...वो गुजर आ रहा है...और साथमे और छे लोग है !! ये वही प्रतापराव है जीसने हमे पाणी की ....बुंद...बुंद...के लिये तरसाया था !!! "
तेच सातही स्वराज्याचे विर येऊन ठेपले...घोडे थांबले... आणि बहलोलखान ओरडला...
" ये आ तो गये !!! पर इनके जनाजे भी नही लौटेंगे...नारे तकरीर....!!"
प्रतापरावांनपुढे हत्ती वर बसून असलेला बहलोलखान दिसत होता...
आज नेसरीस शिवरात्रीला शिवशक्ती , रणभैरवी , भद्रकाली जणू जाग्रुत झाली...आपल्या अष्टभुजा पैकी सात हातात स्वराज्याचे शिवसुर्य शस्त्र धारण करून... आठव्या हाताने बहलोलखानाकडे हात दाखवून युद्धाचे शंखनाद करत होती.... आणि " जय भवानी.... हर हर महादेव...." स्वराज्याचे सातही विर तलवार उसळत गनीमांवर सुटले....
लढत होते , गनिम कापत होते... हजारो सैन्याशी लढताना या वीरांचे पायही लटपटले नाहीत. शिवरायांच्या चरणी असलेल्या पराकोटीच्या निष्ठाच हे वीर आपल्या तलवारी मध्ये घेऊन लढत होते..
या सातही विरांच्या तलवारी जणु अस्मानी दामिनीच...
आज या रणमर्दांच्या वेगाला थांबवणे अशक्य होते.. पण.. पण.. हा वेग फक्त एकच गोष्ट थांबवू शकत होती... ती होती म्रुत्यु... आणि...
धारातीर्थी पडले...हे स्वराज्याचे सातही विर लढता लढता धारातीर्थी पडले...
हजार सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारले. पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहाही वीर मरण पावले.
विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी ....आपल्या स्वराज्यासाठी प्राणांची शर्थ करून लढत लढत रणांगणात धारातीर्थी पडले...
नेसरीच्या... वाहत्या ओढ्यातून मावळ्यांचे ते पावन रक्त पाण्यात मिसळून वाहु लागले.... आज ते पाणी सुद्धा सांगत होते....
" या वाहणाऱ्या प्रत्येक थेंबांनो जाऊन आमच्या राजांना सांगा....
"महाराज !! काही चुकले असेल तर माफ करा महाराज...!!
गडावर सातही प्रधान असेल पण... सरनौबत आणि हे सहा स्वराज्याचे शिलेदार नसणार..महाराज आपणास छत्रपती होतांना बघु शकलो नाही...पण.. पण..राजं...हा..शेवटचा मुजरा घ्यावा राजं...हा आखरी मुजरा घ्यावा...., हे आदिशक्ती भवानी हे स्वराज्य असेच राख जगदंबे...असेच राख....!!..."
प्रतापराव गेले... हसत हसत... म्रुत्युस सामोरे गेले , स्वराज्यासाठी,देव ,देश धर्मासाठी, आपल्यासाठी...
आजही सातार्याच्या खटाव मधील भोसरे ही प्रतापरावांची जन्मभूमी वाट बघत आहे... आपल्या लेकराची , रावांची , प्रतापरावांची.....कधी तरी तिथे जावे , दर्शन घ्यावे , तिथल्या मातीला ललाटीस लावावे आणि धन्य धन्य व्हावे.... जगदंब.... जगदंब... जगदंब...
अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
No comments:
Post a Comment