`खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे', हा मंत्र देणारे साने गुरुजी यांचा आज जन्मदिन.
समाजकारण, राजकारण, साहित्य निर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण जगापुढे स्वत:च्या उदाहरणाने जगासमोर ठेवणारे साने गुरूजी ही नियतीची मानवतेला दिलेली अलौकिक देणगी होती. १८९९ मध्ये जन्माला आलेल्या साने गुरुजींनी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षीच आपली जीवनयात्रा संपवली. पण त्यांच्या कर्तृत्वाच्या छटा आजही महाराष्ट्रातील पिढ्यांवर पाहायला मिळतात, ही त्यांची थोरवी.
कोकणात पालगड गावात एका सुखवस्तु खोताच्या कुटुंबात साने गुरुजींचा जन्म झाला. त्यांचे नाव पांडुरंग सदाशिव साने. पुढे घरची सुबत्ता जाऊन दारिद्रय आले. अत्यंत हालाखीत साने बंधू जगले व शिकले. पुढे पुण्यात येऊन त्यांनी पदवी मिळवली व शिक्षकी पेशा स्वीकारला. तेव्हापासून `गुरुजी' हे बिरुद त्यांच्या नावापुढे चिकटले, ते कायमचेच.
शिक्षकी करतानाच साने गुरुजींनी विद्यार्थ्यांचे संघटन सुरू केले व ब्रिटिश सरकारविरुद्ध गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन उभारले. त्यात त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागला. कारागृहातच त्यांची प्रतिभा जागृत झाली. त्यांनी अनेक कथा व कविता लिहिल्या. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचे सुलभ मराठीत भाषांतरही केले. कृष्णा हाथीसिंग यांच्या आत्मचरित्राचे `ना खंत ना खेद' हे भाषांतर विशेष गाजले. त्यांच्या `तीन मुले' या कथेवर आधारित राज कपूर यांचा `संगम' हिंदी चित्रपटातील `मैलाचा दगड' ठरला. त्यांच्या `मोलकरीण' या कथेवरील मराठी चित्रपटही गाजला.
वर्ध्याच्या तुरुंगात ते विनोबा भावेंसोबत होते. या काळात विनोबाजी रोज़ संध्याकाळी कैद्यांसमोर गीतेवर भाष्य करीत. ही भाषणे साने गुरुजी लिहून काढत. त्या विचार मंथनातूनच 'गीता प्रवचने' हा सुंदर ग्रंथ साकारला.
`सुंदर पत्रे' लिहिणाऱ्या साने गुरुजींनी `साधना' या साप्ताहिकाची स्थापना करून त्याचे संपादकपद अखेरपर्यंत सांभाळले. साने गुरुजींचे मुलांवर विशेष प्रेम होते. `करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे' हे सूत्र त्यांनी जगाला दिले.
स्वतंत्र भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या मूळ आकृतीबंधात अमूलाग्र बदल हवा, असे ते सांगत असत. `बल सागर भारत होवो, विश्वात शोभूनि राहो' हे राष्ट्रभक्तीपर गीत त्यांचेच. ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रात:प्रार्थनेतील प्रार्थनागीत बनले.
सामाजिक सुधारणा हे साने गुरुजींच्या कार्याचे मुख्य सूत्र. पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर शेकडो वर्षे दलीत, हरिजन मागासवर्गीयांना बंद होते. साने गुरुजींनी त्यासाठी राज्यभर प्रचार केला. अखेर १९४६ साली त्यांनी विठ्ठलाच्या पायाशीच प्राणांतिक उपोषण आरंभले.
पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगानेच जीवाची बाजी लावली. सारा महाराष्ट्र पेटून उठला. अखेर हे मंदिर सर्वांना खुले करावे लागले. ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक व सामाजिक क्रांती होती. या अभूतपूर्व प्रसंगावर शाहीर साबळेंनी काव्य रचले, `हरिजन भेटी हरी रंगला, पंढरी झाली दंग, झाला कृतार्थ पांडुरंग..'
असे साने गुरुजी. समाजातील अनेक रिपू व वादांमुळे कंटाळले व ११ जून १९५० रोजी त्यांनी स्वत:चा शेवट करून घेतला. मानवतेचा एक सच्चा सेवक कायमचा निघून गेला.
त्यांच्या प्रेमळ व प्रेरणादायक स्मृतींना आदरांजली !
- भारतकुमार राऊत
No comments:
Post a Comment