विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 December 2020

नाना फडणीस


 नाना फडणीस

खर्ड्याच्या लढाईनंतर मराठ्यांच्या मनात असते तर निजामाचा बंदोबस्त कायमचा करणे त्यांस अशक्य नव्हते, जिवबादादा बक्षीप्रभुति रणशूरांच्या मनांत निजामाची दौलत बुडवावी असेच होते, पण नाना फडणीसाने निजामाने बारभाईच्या मसलतीत येऊन जी मदत केली ती स्मरून त्यास नाहीसे करण्याचे मनातही आणले नाही.
“मोंगल बुडवं नये, राखावयाचा आहे” अशी ताकीद लढाईच्या दुसऱ्या दिवशीच पेशव्याने केली होती असे तत्कालीन लेखांतच म्हटले आहे. मराठ्यांच्या जागी टिपू असता तर त्यानें मुषीरासच काय, पण त्याला चढविणाऱ्या निजामासही कैद करून एखाद्या घनगडावर कायमचे कैदेत ठेवले असते, पण नानाने असे सखारामबापू , सखाराम हरि, वगैरेंच्या बाबतीत केले असले तरी निजामाच्या बाबतीत तसे करण्याचा त्याला हिय्या झाला नाही एवढे मात्र खरें आणि याचे कारण एकंदर पेशवाईत मोगलाबद्दल असलेली न्यूनगंडाची भावना हेच होय.
निजामाचे पूर्वचरित्र पाहता व खुद नानाशीही त्याचा एक तप चाललेला लपंडाव लक्षात आणता नानाने स्वीकारलेले धोरण बरोबरच होते असे म्हणणे कठीण आहे, म्हणजे नानाच्या या वागण्यामागे काही राजकारणी डाव असला पाहिजे असे म्हणणे भाग आहे, तो डाव म्हणजे खर्ड्याची लढाई मुख्यतः ज्यांच्या बळावर जिंकली ते शिंदे वरचढ होऊ नयेत म्हणून नानाने निजामाला सौम्य अटी घालून वाचविले हाच होय.
मराठेशाहीच्या हितापेक्षा माझ्या हातातील पेशवाईची सत्ता कशी राहील हाच विचार प्रामुख्याने अखेरपर्यत नानाच्या मनांत वागताना दिसतो, एरव्ही बाजीरावशाही झाल्यानंतरही मुषीराला सोडणे व आपण कवडी कवडी
करून साठविलेला पैसा कारस्थानात खर्च करणे, या गोष्टीचा उलगडा करता येत नाही.
सवाई माधवरावाच्या मृत्यचे गूढ बाजस ठेवले, तरी खर्ड्यानंतर शिंदेच काय पण परशुरामभाऊ, गोविंदराव काळेप्रभृति माणसे नानाविरुद्ध का झाली याचे उत्तर वरील तर्काखेरीज अन्य मिळू शकत नाही.
शहाण्या मुत्सद्द्यांवर अस्मानी सुलतानीचे प्रसंग इतिहासांत अनेकवार आलेले दिसतात, पण त्यांत ते कसे वागतात यावर त्यांचे शील कसाला लागते, रापचंद्रपंत अमात्याने ताराबाईने त्याला कैदेंत ठेवल्यानंतर कसे वर्तन ठेवले होते हे पाहिले, म्हणजे या दोन मुत्सद्द्यांतील फरक लक्षात येतो, संकुचीत दृष्टी व खऱ्या वैराग्याचा आणि निस्पृहपणाचा अभाव यामुळेच नानाची कारकीर्द मराठेशाहीला तारक ठरली नाही असे म्हणणे इतिहासकारास भाग आहे.
- त्र्यंबक शंकर शेजवलकर, निजाम-पेशवे संबंध

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...