विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 December 2020

चौथे शिवाजी महाराज: निष्पाप कोवळ्या जीवाची केलेली निर्घृण हत्या.

 





चौथे शिवाजी महाराज: निष्पाप कोवळ्या जीवाची केलेली निर्घृण हत्या.

आज चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण. छत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा मुजरा मुजरा.
**
छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले छत्रपती संभाजी महाराज आणि धाकटे छत्रपती राजाराम महाराज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही काळानंतर महाराष्ट्रात मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या.
थोरले चिरंजीव संभाजी महाराजांच्या वंशजांची सातारा गादी आणि धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांची कोल्हापूर गादी.
ह्यापैकी कोल्हापूर गादीचे हे चौथे शिवाजी महाराज छत्रपती यांच्या विषयी हा आजचा लेख आहे.
मी फार पूर्वी महाराष्ट्र धर्मवर एक लेख लिहिला होता.लेखाचे नाव होते 'इटलीकरांचे' लाडके राजाराम महाराज. हे दुसरे राजाराम महाराज इटलीतील फ्लोरेन्स येथे 'निपुत्रिक' वारले.
ह्या राजाराम महाराजांच्या नंतर कोल्हापूर गादीस वारस कोणास घ्यावे असा प्रश्न उपस्थित झाला.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
कोल्हापूर गादीच्या नवीन राजासाठी सात मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी खानवटकर घराण्याचे सावर्डे शाखेतील नारायण ह्या मुलास २३ ऑक्टोबर १८७१ रोजी पुढील कोल्हापूरचे छत्रपती म्हणून गादीवर बसविण्यात आले.
ह्या चौथ्या छत्रपतींचा जन्म ५ एप्रिल १८६३ रोजी झाला होता.
छत्रपती पदावर येते समई ह्या मुलाचे नारायण हे नाव बदलून चौथे शिवाजी महाराज असे नामकरण करण्यात आले. ह्या वेळी चौथ्या शिवाजी महाराजांचे वय ८ वर्ष होते.
इंग्रज सरकारने ह्या चौथ्या शिवाजी महाराजांना के. सी आय. सारखा तत्कालीन बहुमानाचा किताब देऊन महाराजांच्या सुसंगत आणि स्वाभाविक वर्तनाची एक प्रकारे ग्वाहीच दिली होती.
महत्वाचे: महाराजांनी अमुक एक विधान केले किंवा अमुक प्रसंगासंबंधी अनुकूल मत व्यक्त केले कि जवळपासची काही मंडळी नेमके त्यांच्या विरुद्ध बोलून महाराजांच्या मनाला संताप उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असत.
(इथे एक गोष्ट लक्षात घ्या. भलेही हे छत्रपती जरी असले तरी ह्या मुलाचे वय ह्यावेळी केवळ नऊ वर्षांचे आहे.)
इतक्या कोवळ्या वयातील मुलाच्या डोक्यावर जबाबदारीचे ओझे असताना त्याला साथ देऊन प्रोत्साहीत करणे आणि त्यास सकारात्मक प्रगती पथावर घेऊन जाणे ह्या ऐवजी त्या मुलाशी नकारात्मक भाव ठेऊन आणी त्याचा पदोपदी बौद्धिक अपमान करून ह्या मुलाचे बालपण हिरावून घेतले गेले.
चौथ्या शिवाजी महाराजांच्या सेवेत एडमंड कॉक्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी दोन वर्ष होता. तो अधिकारी लिहितो कि, "एकदा मी महाराजांना विचारले कि, आपल्याला कोल्हापूरचा राजा म्हणून जाणे आवडेल कि असाच प्रवास करीत राहणे आवडेल?"
त्यावर महाराजांनी ह्या अधिकाऱ्यास सांगितले कि, " आपल्या मूळ गावी आणि मूळच्याच परिस्थितीत जाण्याची आपली इच्छा आहे."
चौथ्या शिवाजी महाराजांच्या बाल मानसिकतेचा कुठलाही अभ्यास न करता महाराजांना मानसिक वेडे ठरविण्याचा जो चंग त्या वेळेसच्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आणी कारभाऱ्यांनी केला होता त्याला मराठ्यांचा इतिहास कधीही माफ करणारा नाही.
९ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाबरोबर सहानुभूतीने न वागता त्याला मानसिक वेडा ठरवून बरे करण्याच्या नावाखाली मुंबईच्या मर्फी नावाच्या डॉक्टरच्या सल्याने ह्या छोट्या महाराजांस चाबकाने फोडून काढले जात असे.
काय अवस्था होत असेल त्या लहान मुलाच्या जीवाची?
आई वडिलांच्या प्रेमापासून तुटलेला हा कोवळा जीव दिवसरात्र आपल्या आईच्या प्रेमळ हळुवार मायेसाठी अक्षरशः धाय मोकळून आई आई करत रडत असेल.
कोणीही जिवा-भावाचे प्रेमाने सांभाळून घेणारे जवळ नाही.
ह्यात भर कि काय छत्रपतींच्या वयाच्या १७ व्या वर्षी छत्रपतींच्या सेवेसाठी 'प्रायव्हेट ग्रीन' नावाच्या एका इंग्रज आडदांड उद्धट सैनिकाची नेमणूक १५ ऑगस्ट १८८० साली केली गेली.
ह्या 'ग्रीन' बरोबर महाराजांचे अजिबात जमत नसे. महाराज ह्यास म्हणत असत कि, "तुम्ही युरोपियन लोक कश्यासाठी बोलता?"
**
महाराजांवर चाललेले उपचार हे अमानुष असून ते जाणूनबुजून केले जात आहेत असा त्यावेळीस लोकांचा पक्का समज होऊ लागला होता. ह्याचबरोबर लोकांच्या मनात चिंता आणि संतापही वाढू लागला होता.
त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबरच कोल्हापूरचा कारभारी रावबहादूर वासुदेव बर्वे हा ही त्या वेळेसच्या वर्तमानपत्रांच्या टीकेचा मुख्य लक्ष बनला होता.
'ज्यांनी महाराजांची योग्य देखभाल करावी अशी अपेक्षा असते तेच महाराजांवर अत्यंत कठोर उपाय योजू लागले' असा समज झपाट्याने लोकांमध्ये फैलावला होता.
केसरी वृत्तपत्राच्या ११ ऑक्टोबर १८८१ च्या अंकात पुढीलप्रमाणे मजूकर प्रसिद्ध झाला होता." कोल्हापूर छत्रपती महाराजांची सध्याची अशी स्थिती आहे कि ती ऐकून पाषाण हृदयी माणसाच्या देखील काळजाला घरे पडतील. महाराजांचे प्राण जाऊन शव हाती पडल्यावर लॉर्ड साहेब जागृत होणार काय?
कोणत्याही कारणाने छत्रपतींच्या जीवास अपाय झाला तर त्याचा कलंक बादशाही राणीच्या आणि तिच्या प्रतिनिधींच्या कपाळी आल्याखेरीज राहणार नाही."
केसरी वृत्तपत्राच्या ३ डिसेंबर १८८१ च्या अंकात रावबहादूर बर्वे ह्याच्या संबंधी म्हंटले होते कि, " कोल्हापूर संबंधाने जी कागदपत्रे आमच्या पाहण्यात आली आहेत त्यावरून रावबहादूर माधवराव बर्वे यांच्या राक्षसी अंतःकरणाविषयी आमची (म्हणजे टिळकांची) बालंबाल खात्री झाली आहे. आज रोजी त्यांची (म्हणजे बर्वेची) काळी कृत्ये उजेडात आणता येत नाहीत यास आमचा नाईलाज आहे."
ज्या पत्रांच्या आधारे टिळक-आगरकरांनी हे छापले होते त्या विरोधात पुढे कारभारी बर्वे ह्याने इंग्रज कोर्टात दावाही ठोकला होता. ह्या प्रकरणी टिळक आगरकरांना चार महिन्यांची शिक्षाही ठोठावण्यात आली होती.
टिळकांच्या केसरीकडे छत्रपतींच्या होणाऱ्या छळाची माहिती पुरविणारी पत्रे हा जरी वादाचा मुद्दा होता तरीही अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या निमित्ताने कोल्हापूरच्या छत्रपतींचा छळ होत होता ही गोष्ट सर्वांना कबूल करावीच लागली.
महाराजांचे मामा हिंमत बहाद्दूर प्रीतीराव रताजीराव चव्हाण यांच्या निवेदनावरूनही महाराजांचा छळ चालू होता ही गोष्ट त्यावेळी अनेकांच्या निदर्शनास आली होती.
पुढे महाराजांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून कोल्हापूरचा कारभारी आणी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी १८ जून १८८२ ह्या चौथ्या शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या किल्यात नेऊन ठेवले.
अहमदनगर येथे चौथ्या शिवाजी महाराजांना किल्ल्यातील एका बाजूला असलेल्या बंगल्यात ठेवले. त्या भागात कोणालाही फिरकण्यास बंदी होती. पक्या बंदोबस्तात ठेवलेल्या कैद्यांसारखी त्यांची अवस्था होती.
खाजगी नोकराखेरीज फक्त 'प्रायव्हेट ग्रीन' हाच दांडगा सैनिक महाराजांच्या सोबतीला ठेवलेला होता. महाराजांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते. महाराजांच्या पत्नीलाही भेटू दिले जात नव्हते. मानसिक छळ करून महाराजांना मनोरुग्ण ठरवण्याचा हा कट होता.
शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते.
महाराजांना सर्व परिचित व्यक्ती आणी वातावरण ह्यांपासून वेगळे काढून एखाद्या कैद्या प्रमाणे जीवन काढावे लागत होते.
इंग्रज शिपाई प्रायव्हेट ग्रीन हा महाराजांना बेदम झोडपून काढत असे अश्या बातम्या नगर शहरात रोजच फिरत असत. त्यामुळे नगरकरांच्या संतापाचा आता उद्रेक होऊ लागला होता.
२५ डिसेंबर १८८३ रोजी इंग्रज शिपाई 'प्रायव्हेट ग्रीन' याच्याशी महाराजांची मारामारी झाली. ह्या झटापटीत ग्रीन याने महाराजांच्या पोटावर जोरदार लाथ मारली. त्यामुळे 'प्लिहा' फुटून महाराजांचा मृत्यू झाला.
मृत्यूसमयी महाराजांचे वय अवघे २० वर्षांचे होते.
मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात असताना मारला गेला हे जनतेत समजले तर मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले आणी त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेर जंगलात त्या पार्थिवाचे भोसले नावाच्या व्यक्तीच्या हाताने अंत्यसंस्कार उरकले.
टिळक-आगरकर ह्यांनी चौथ्या शिवाजी महाराजांच्या छळाच्या उद्वेगजनक कथा ऐकल्या आणि छत्रपतींची निंदनीय अवस्था ओळखुन त्यांनी माधवराव बर्वे, एडमंड कॉक्स आणि प्रायव्हेट ग्रीन ह्या अधिकाऱ्यांच्या निर्दयी वर्तनावर जोरदार हल्ला चढविला.
कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याचे धाडस दाखवले. नगरच्या मातीत त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आणि नगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रेसिडेन्शिअल विद्यालयासमोर त्यांची समाधी आणि पुतळा आहे.
ह्या रस्त्यावरून जाताना महाराजांना थांबून मुजरा केल्याशिवाय मी कधीही पुढे जात नाही.
आम्हा सर्वांच्या अत्यंत लाडक्या चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा मुजरा मुजरा.
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
🙏✅💢 काॅपी पेस्ट पोस्ट 💢✅🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...