#सरदार_शितोळे_वाडा-
कसबा पेठ, पुणे
भाग-२
पोस्टसांभार : Vikas Chaudhari|
ऐतिहासिक वाडे व गढी |
नरसिंगराव-शितोळे
घराण्याचे संस्थापक आबाजीराव शितोळे हे विजापूरच्या अदिलशहाच्या पदरी
होते. त्यांना इ. स. १६०५ मध्ये देशमुखीचे हक्क परत मिळाले. उत्तम
सेवाचाकरी करून मालोजीराव शितोळ्यांनी शाहूमहाराजांची मर्जी संपादन केली.
त्यांना इ. स. १७१८ मध्ये देशमुखीच्या उत्पन्नातील तिजाईचा हक्क प्राप्त
झाला. त्याच मालोजीरावांनी पेशव्यांच्या काळात लढाईमध्ये उत्तम कामगिरी
बजावल्याबद्दल त्यांना दख्खनमध्ये बरीच वतने मिळाली. त्याच घराण्यातील
सिद्धोजीराव बीन खंडोजीराव यांनीही मर्दुमकी गाजवली. महादजी शिंदे आणि
त्यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. महादजींनी उत्तरेत गाजविलेल्या
शौर्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडे सिद्धोजीरावांच्या सेवेची मागणी केली,
त्यांना आपल्या पदरी ठेवण्याची विनंती केली. अशा त-हेने या दोन्ही
कुटुबांचे ग्वाल्हेरमध्ये वास्तव्य झाले. उत्तरेकडील यशानंतर महादजी
दक्षिणेत परत आले. श्रीमंत पेशव्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली मुलगी
बाळाबाई हिचा विवाह सिद्धोजीरावांचा मुलगा लाडोजीराव याच्याशी मुक्रर केला.
हे लग्न पुण्यातच झाले. दोन्ही घराण्यातील मित्रत्वाचे नाते आणखी दृढ
झाले. या लग्नामध्ये कन्यादान म्हणून महादजींनी उज्जयिनी आणि ग्वाल्हेरमधील
काही गावे लाडोजीरावांना आंदण दिली;तसेच त्यांना प्रथम दर्जाची सरादारकी व
वार्षिक दीडलाख रूपये तनखा देण्यात आला.
लग्नसमारंभानंतर
महादजी शिंदे सिद्धोजीराव लाडोजीरावांसह दिल्लीवर स्वारी करण्यास गेले.
स्वारी यशस्वी झाली; पण सिद्धोजीराव कामी आले. या घराण्याच्या
कुटुंबप्रमुखाला नरसिंगराव हा किताब देण्याची प्रथा होती. सिद्धोजीराव
मृत्यूनंतर महादजींनी बादशहा शहाअलमकडे लाडोजीरावांची शिफारस केली.
शहाअलमने इ. स. १७८३ मध्ये देशमुखीचे उत्पन्न कायम उपभोगावे असा लेखी आदेश
दिला. बादशहाची मर्जी लाडोजीरावांनी आपल्या पराक्रमाने संपादन केली. इ. स.
१७८५ मध्ये बादशहाने लाडोजीरावांना सनद देऊन बालेघाट परगणे जाफराबाद
बिरारसह परगण्याची सनद दिली. गुलाम कादर आणि इस्माइल बेग यांनी बादशहाची
सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महादजींनी लाडोजीरावाला सोनपत
जिल्ह्यातील १०६ गावांची जहागिरी पानपतसह दिली. त्याची सनद दिली. या सनदी
ज्या कागदावर लिहिल्या, तो कागदसोन्याचा वर्ख लावलेला असून,त्यावरील मजकूर
पर्शिअन भाषेत लिहिलेला आहे.
लाडोजीरावांना
पाच गावे इनाम दिली. इ.स. १७९३ मध्ये लाडोजीराव मृत्यूमुखी पडले.
सिद्धोजीराव व लक्ष्मणराव ही त्यांची दोन मुले. सिद्धोजीरावाने सत्ताग्रहण
केल्यावर ते दिल्लीच्या बादशहाच्या भेटीस गेले असता, बादशहाने त्यांना
'उमादत्त उल मुल्क राज राजेंद्र सिद्धोजीराव सितोळे राजा देशमुख बहादूर
रूस्तूम जंग' हा किताब आणि 'मनसब सहा हजारी आणि पंच हजारी सवार' असा किताब
त्यांचे सहा हजार पायदळ, पाच हजार घोडदळ यासह दिला. याचवेळी त्यांना
पोंशाख, जरीपटका, साहेब नौबत, पालखी, सोन्याची चवरी, चवरी मोरपंखी, सिक्का व
कट्यार इत्यादी गोष्टी देण्यात आल्या. दुसर्या फर्मानामध्ये त्यांच्या
पूर्वजांनी मिळविलेल्या सोनपत आणि पानपत जिल्ह्यातील शंभर गावांची जहागीर
पुढे चालू ठेवण्यात आली. या घराण्यातील महादजी शितोळे यांनी राक्षसभुवनच्या
लढाईत निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर याला मारले. या अतुल पराक्रमाने खूष
होऊन श्रीमंत पेशवे यांनी महादजी शितोळे यांना मांजरी गाव व सरदारकी बहाल
केली. सिद्धोजीरावांनी खर्डे येथे निजाम व पेशवे यांच्यात झालेल्या लढाईत
भाग घेऊन बरेच शौर्य गाजविले.
#माहिती -सौ.मंदा खांडगे