विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 29 January 2021

छत्रपती शिवाजी महाराजांचा आणी इराणचा संबंध दर्शविणारा पत्ररूपी पुरावा.

 



छत्रपती शिवाजी महाराजांचा आणी इराणचा संबंध दर्शविणारा पत्ररूपी पुरावा.

आत्यंतिक धामधुमीमळे छत्रपती शिवाजी महाराजांना व्यापार उदीम करायला तितकासा वेळ मिळाला नाही असे काही इतिहासाचे संशोधक म्हणतात. उपलब्ध पुराव्यांच्या कमतरतेमुळे बहुदा हा आक्षेप असावा.
छत्रपती शिवाजी महाराज हे परकीय व्यापाऱ्यांशी आणि इतर देशांशी व्यापार करत होते हे त्यांच्या जीवनकाळात काही घटनांवरून आपल्या निदर्शनास येते.
पण इतिहासकार हे महाराजांच्या लढाया सोडून महाराज व्यापार उदिमातही अत्यंत अग्रेसर होते ह्या गोष्टी खुलवून सांगत नाहीत म्हणा किंवा त्याला आपले इतिहासकार म्हणावे तितके महत्व देत नाही.
राज्य तलवारीने वाढविता येते आणि व्यापाराने समृद्ध करता येते. आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोन्ही गोष्टी नीट जाणून होते.
**
सहज वाचता वाचता असा एक पुरावा माझ्या नजरेस आला. तो आज तुम्हांपुढे सादर करत आहे.
तो पुरावा जरी एक ओळीचा असला तरी महाराज स्वराज्य स्थापनेबरोबरच व्यापार-उदीमातून स्वराज्याला आर्थिक समृद्ध करू पाहत होते असे आपल्याला ह्या ओळीतून निदर्शनास येते.
मराठ्यांचे आरमार ओमान देशाची राजधानी असलेल्या मस्कतला आल्याचे उल्लेख मी ऐकून होतो.
(ह्या विषयी मी पूर्वी दोन लिहिलेले आहे. त्यामुळे परत नको. )
पण नवीन माहिती वाचनात अशी आली की; मराठ्यांची जहाजे इराणलाही जात होती.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मुंबईपासून इराण हे समुद्रमार्गे १२६५ मैल (Nautical mile) दूर होते. १२६५ मैल म्हणजे २३४२ किलोमीटर.
लक्षात घ्या.
तेंव्हाची गलबते हि आजच्या सारखी डिझेल इंजिनांवर चालत नसत. शिडाचा वापर आणी बोट वल्हविणे हे दोनच पर्याय होते. शिवाय आजच्या सारखी दिशा दर्शविणारी आधुनिक रडार यंत्रणाही नाही. सगळा बुद्धीचा आणी मेहनतीचा खेळ.
इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉडमध्ये आपल्याला ह्या विषयी एक पत्र सापडते.
पत्र सुरू:
मुंबईकर इंग्रज 6 नोव्हेंबर 1669 ला सुरतेच्या इंग्रजांना लिहितात की:
"शिवाजी राजाने पोर्तुगीजांची काही गलबते घेऊन ठेविली आहेत.
(म्हणजे महाराजांनी पोर्तुगीजांची काही गलबते पकडली आहेत.)
त्यांनीही (म्हणजे पोर्तुगीजांनी) त्यांचे (म्हणजे शिवाजी महाराजांचे) इराणाहून आलेले एक गलबत पकडले आहे.
येथून जवळच पेण येथे शिवाजीराजांचा प्रधान सेवक आला असून शिवाजी महाराजही पेण जवळच आसपास आहेत. जंजिऱ्याचा सिद्दी अजूनही अडचणीत आहे."
पत्र समाप्त.
**
ह्या पत्राची त्यांनीही (म्हणजे पोर्तुगीजांनी) त्यांचे (म्हणजे शिवाजी महाराजांचे) इराणाहून आलेले एक गलबत पकडले आहे हि ओळ महत्वाची आहे.
कोणाचे गलबत इराणवरून आलेले आहे?
त्यांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे.
गलबत मराठ्यांचे नसते तर पोर्तुगीजांनी ते पकडले नसते. कारण त्या वेळी मराठ्यांचे आणि पोर्तुगीजांचे भांडण सुरु होते.
त्यामुळे पत्राच्या शेवटच्या ओळीमधून असे स्पष्ट निदर्शनास येते की मराठ्यांची गलबते व्यापारानिमित्त थेट इराणलाही जात होती. आणि इराणवरून परत येत असताना मराठ्यांच्या ह्या गलबताला पोर्तुगीजांनी पकडले.
ह्या एका ओळीत छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती दूरवर पसरलेली होती हे निदर्शनास येते.
ह्याचा अर्थ असा होतो कि; छत्रपती शिवाजी महाराज व्यापाराच्या निमित्ताने परराष्ट्रांशी संबंध ठेऊन होते.
स्वराज्य हे युद्धाने वाढविता येते आणी व्यापाराने समृद्ध करता येते हे छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते आणी म्हणूनच मराठ्यांची जहाजे अरबस्तानातून पुढे इराणकडेही जात होती.
लेख समाप्त.
लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...