विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 29 January 2021

रणधुमाळी पानिपतची..

 


रणधुमाळी पानिपतची..

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे काही..
बखरींची भाषा समजावयास थोडी कठीण. पण मोठ्याने वाचा. आणि वाचत पुढे चला. सगळे समजून येईल.
बखरी सत्यही असतात आणि काही प्रमाणात असत्यही असतात. कादंबरीच्या कथानकासारखा बखरींस दर्प असतो. पण ऐतिहासिक घटना बखरी खुलून सांगतात.
त्यातीलच एक पानिपतचे मुख्य पर्व खास महाराष्ट्र धर्मच्या वाचकांसाठी..
लेख सुरु:
... तिकडे अब्दालीच्या पुत्रांचे वर्तमान कि; अब्दाली पुत्र अपमान होऊन मराठ्यांनी अब्दालीच्या सेनेचा पराभव केला.
असे ऐकून अब्दालीस दुर्घट दुःख प्राप्त झाले. ते समयी पुत्रशोकाची ममता अतिशय दाटली. अब्दाली सदगदित होऊन म्हणू लागला जे , " आता आम्ही वाचून काय करावे? आपण मरावे यात उत्तम आहे."
म्हणोन सक्रोध भरीत होऊन परमप्रतापी रणांगणाची वस्त्रे, शस्रे, तर्कस कमाना चढवून हत्तीच्या अंबारीत अब्दाली बसला. आणि माहुतास हुकूम फर्माविले जे, " हत्ती फौजेत ढकलने. मारता मारता मरावे."
हा सिद्धांत अब्दाली आपले मनांत करून गोटांतून ( म्हणजे आपल्या लष्करी तळावरून ) शिलेपोस होऊन ५० हजार फौजेनिशी निघाला.
त्या समयी अब्दालीचे सहकारी इराणी आणि मन्सूरअली वगैरे तेही दीड लाख फौजेनिशी परत रणांत माघारी फिरले.
अब्दालीची फौज अगदी जर्जर जाहली. प्रातःकाळपासून तासपर्यंत (?) (बखरीत आकडा गाळलेला आहे) संग्राम करून शिणोन गेले.
सायंकाळ एक तास दिवस राहिला. अगदीच दिवसाचे उपवासी लोक आणि घोडी शिणोन गेली आणि अमित्र शत्रू तो इराणी माघारी फिरले.
तेंव्हा सदाशिवपंत सर्वांस बोलावून बोलले जे, " होणार ते बळोत्तर. ते कदापि सुटणार नाही. तद्नुरूप घडून येते. श्री सांबाचे म्हणजे शंकराच्या मर्जीस आले असेल ते तसेच घडून येईल. आता यमाजी (म्हणजे यमदेव) चिट्ठी घेऊन खासा खिजमतगारच आला असा दिसतो.
काही घेऊन गेल्याशिवाय यमाजी ( म्हणजे यमदेव) माघारी जात नाही."
पुन्हा युद्ध न करिता गती नाही. तेंव्हा मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे यांनी विचार केला कि, " आता मागे न फिरावे. तो अब्दाली असा पाठीवर घेऊन आपल्या गोटांत म्हणजे आपल्या लष्करी तळी आणावा. आणि निशी समयी अब्दालीसारख्या निशाचर याचा निःपात करावा."
ते समयी सदाशिवपंत भाऊ यांनी उत्तर दिले जे, " होणार ते होते त्यास इलाज नाही."
सदाशिवपंत रणांगणात माघारी फिरले आणि बोलिले कि, " पुन्हा तीन टोळ्या करणे आणि युद्धास परतून डावे बाजूस विश्वासराव, उजवे बाजूस जनकोजी शिंदे आणि लहान थोर सरदार, मध्यभागी सदाशिवपंत २५ हजार फौजेनिशी किरीटीप्रमाणे म्हणजे अर्जुनाप्रमाणे सावरून पानिपतावर रणरंगधीर युद्धास उभे राहिले.
तो परम आवेशे इराणी व अब्दालीने १ लक्ष पठाणांनिशी विश्वासराव यावर चालून घेतले. ते प्रथम मराठ्यांचा तोफखान्यावरच आले. मराठ्यांचा तोफखाना तयारच होता.
अब्दाली त्याजवर येऊन पडला. तेथे मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान याने धीर धरून एकदाच तोफांची सरबत्ती सुरु केली. तेंव्हा लष्कर तोफांच्या धुराने आच्छादून गेले.
मराठ्यांनी जोरदारपणे २ हजार भांडी (भांडी म्हणजे तोफा ) व २५ हजार जेजाला व ह्रेकले व सुतारणाला व जंबुरे २५ हजार बाण व करोळाचा मार दुरवस्था निमित्त न लागता एकाएकी अब्दालीच्या फौजेवर केला.
आधी मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान गारदी शस्त्रसंधानी चतुर वावगा ( म्हणजे फुकट ) आवाज येऊ द्यायचा नाही.
अब्दालीवर तोफांच्या भडिमाराची सीमाच केली.
परंतु तितका आगीचा मार पिऊन जीवाची आशा न बाळगता मराठ्यांच्या तोफखान्यात अब्दाली रसमिसळ झालाच.
ह्या धामधुमीत मराठ्यांच्या त्रिवार मारामुळे तेथे अब्दालीकडील इराणी मातब्बर सरदार पडले. याखेरीज अब्दालीचा १० हजार पठाण जखमी जाहला.
तितक्यात सही आंग देऊन अब्दालीने आणि मराठ्यांनी बहुत मारामारी केली. अब्दालीने मराठांच्याकडील २० हजार गारदी अगदी मारून कत्तल केली. मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान आणि त्याचा सरदार खासा ठार पडला.
इतक्यात अब्दालीकडील इराणी मराठ्यांचा तोफखाना मागे टाकून विश्वासरावावर चालून आला. तो यशवंतराव पवार व मातब्बर मराठा सरदार यांनी सतीचे वाण घेऊन म्हणो लागले कि, " आता काही जीव वाचावयाची आशा नाही. शत्रूशी झुंजून मारून गर्दीस होऊन जावे. "
असा निश्चय करून आपले कबिले यांच्या समशेरी करून शाकाप्राय (म्हणजे भाजीचे तुकडे करतात तसे ) केल्या आणि मराठे नीटच पुढे चालले.
( मला वाटते इथे आपले कबिले म्हणजे बायका-मुले शत्रूच्या हाती जिवंत लागू नये म्हणून मारून टाकले असावेत.)
एका आंगी आले. ( म्हणजे स्वतंत्र युद्ध करणे)
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
मराठ्यांनी काही जीवाची तमा धरिली नाही. तीन-चार घटका शस्रांचे खणखणाट जाहले. कोणी कोणास हाटले नाही. पुढील पाय पुढे; याप्रमाणे वीरश्रीच्या तवके ( म्हणजे त्वेषाने -आवेशाने ) करू रक्तोदकें सुस्नात होऊन क्षतभूषणे परम भयानक शरीरे शोभली.
एक धारातीर्थ आमचे जडले, एक शूरत्व करून विरालें, इक मृत्युपंथास गेले, एक पायातली रगडीले, एकाचे शीर तुटून भूमीस पडले असे युद्ध महाभारती जाहले.
वीर मारामार करून दमले.
घे.. घे.. ह्या शब्दाची ध्वनी उठली. कर्ण बधिर जाहले. आप-पारखी (म्हणजे आपण व परके) ओळख न राहिली. रणांत अगदी गर्दी होऊन गेली.
हनुमंताप्रमाणे एका परीस एक झुंजो लागले.
वीरा अंगी वीरश्रीचा संचार होऊन सिंहनादें गर्जो लागले.
दोन्ही दळांत शस्रे एकवटली. दोन्ही दळांच्या मध्यभागी रक्तोदकाच्या (म्हणजे रक्ताच्या) नद्या वाहू लागल्या.
तेंव्हा पिशाच समुदाय आनंदे करून नाचू लागले कि; कैक वर्ष झाली. क्षुधातुर (म्हणजे भुकेले ) होतो.
ते समयी १८ औक्षणी दळांचे ( म्हणजे सैन्याचे) रक्तमांस भक्षिलें. त्या अलीकडे फार दिवस भोजन नाही. याजकरिता श्री ईश्वराने आम्हा पिशाच्यांकरिता हे युद्ध निर्माण केले." असे म्हणून पिशाच मृतांस भक्षावयास लागले. युद्धाची सीमाच राहिली नाही,
रण असे जाहले...
समाप्त.
विषय फार भावनिक आहे. माझा पानिपतवर अभ्यास दांडगा. पण लिहायला घेतले कि भावना दाटून येतात. लिहवत नाही. काय करू.. डोळ्यांच्या कडा पाणवतात...
मराठ्यांनी काही जीवाची तमा धरिली नाही. तीन चार घटका शस्रांचे खणखणाट जाहले. कोणी कोणास हाटले नाही. पुढील पाय पुढे; याप्रमाणे वीरश्रीच्या तवके ( म्हणजे त्वेषाने आवेशाने ) करू रक्तोदकें सुस्नात होऊन क्षतभूषणे परम भयानक शरीरे शोभली.
ह्या वरील तीन ओळींत सगळ पानिपत सामावलेले आहे.
पानिपतात मराठे जिंकले.
होय जिंकलेच. मराठ्यांनी पानिपतच्या रणांगणावर लढून आपला देह ठेवला पण माघारी आले नाही.
रणांगणावर लढून धारातीर्थ पडलेल्या माझ्या सर्व सर्व शूर मराठा वीरांस अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.
वीर रणांगणी पहावा. हाच होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा.
हाच तो.
तुमचा महा-पराक्रम आम्हास सदैव प्रेरणा देत राहील.
लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...