विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 January 2021

राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास

 





राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास
पोस्टसांभार : Raj Prabhavati G Jadhav
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मूलतत्त्ववादी लोक उत्तरकालीन बखरा आणि पूर्वग्रहदोषीत विचारातून राजेजाधव आणि राजेभोसले घराणे यांच्या संबंधाबद्दल चुकीचा इतिहास मांडून गैरसमज पसरवत आहेत. राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास समजून घेण्याआधी यामागील आपण थोडी पार्श्वभूमी आणि सत्यता तपासायला हवी..
बाबाजीराजे भोसले यांच्या मृत्यूच्या वेळी काही पाटीलक्या व पांडेगावची मोकासदारी मालोजीराजेंकडे होती. वेरुळास शेती होती, शिवाय पांडेगावच्या आसपास पाटस, चांभारगोंदे, जिंती इत्यादी ठिकाणी वतने पाटीलक्या होत्या. मालोजीराजे भोसले हे निजामशाहीतील मातब्बर सरदार, मनसबदार होते. शिवभारतकार मालोजीराजे यांना महाराष्ट्रभूमिप: संबोधित करतो. याचा अर्थ भोसले घराण्याची आर्थिक स्तिथी अत्यंत चांगली होती.लखोजीराजे जाधव हे देखील निजामशाहीत पंचहजारी मनसबदार होते, शिवाय सिंदखेडची देशमुखी त्यांच्याकडे होती. पुढे लखोजीराजे जाधव यांना १० हजारी मनसबदारी, २८ महाल, ५२ चावडयांचे वतन मिळाले. याचा अर्थ राजेजाधव घराण्याची देखील आर्थिक परिस्थिती संपन्न होती.
इंदापूरच्या स्वारीवर असताना मालोजीराजे भोसले १६०६-१६०७ मध्ये मृत्यूमुखी पडले. शहाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या विवाह प्रसंगातून राजेभोसले आणि राजेजाधव घराण्यात वैर निर्माण झाले असे काही इतिहास अभ्यासक समजतात. रंगमहालातील रंगपंचमीची कल्पित कथा ही पूर्णपणे उत्तरकालीन बखरीवर आधारलेली आहे. शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या विवाहाबद्दल शिवभारतकार नोंदवतो " उत्तम लक्षणांनी युक्य, दानशील, दयाशील, युद्धकुशल आणि महातेजस्वी अशा मालोजी पुत्र शहाजीस पाहून कुबेरागत श्रीमंत जाधवरावाने ज्योतिष्याने सांगितलेल्या अनुकूल ग्रह असलेल्या मुहूर्तावर आपली विजय लक्षणा, कमलनेत्रा आणि कुळास शोभा आणणारी कुलावन कन्या जिजाऊ वर दक्षिणेसह शहाजीस अर्पण केली " वरील नोंदीवरून लखोजीराजे जाधव यांनी स्वेच्छापूर्वक, आनंदाने हे लग्न लावून दिलेले स्पष्ट होते. यावेळी राजेभोसले आणि राजेजाधव या दोन घराण्यात कोणताही वैरभाव किंवा कौटुंबिक संघर्ष नव्हता..
दुसरी एक घटना ज्याआधारे राजेभोसले आणि राजेजाधव घराण्यात वैमनस्य होते असे मांडले जाते, ती घटना म्हणजे खंडागळे हत्ती प्रकरण (१६२३). मोगलांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी निजामशहाने सर्व सरदारांना बोलवून दौलताबाद येथे दरबार भरवला होता. तेंव्हा दरबार संपल्यानंतर सरदार मंडळी परतत असताना गर्दी उसळली, त्यावेळी खंडागळे यांचा आघाडीचा हत्ती बिथरला आणि दुसऱ्याचे सैन्य तुडवत निघाला. खंडागळे हत्ती प्रकरणात शहाजी महाराज यांचे चुलतबंधू संभाजीराजे भोसले यांनी लखोजीराजे जाधव यांचे पूत्र दत्ताजीराव जाधव यांना ठार केले. ही गोष्ट समजतास लखोजीराजे जाधव यांनी संभाजीराजे भोसले यांना ठार केले, यात शहाजीराजे भोसले देखील लखोजीराजे जाधवराव यांच्या हल्ल्यात बेशुद्ध पडले. खंडागळे हत्ती हे प्रकरणाचे वर्णन शिवभारत या साधनात सविस्तरपणे आले आहे. या घटनेनंतर लखोजीराजे जाधव यांना पश्चाताप झाला असे शिवभारतकार नोंदवतो. दोन कुटूंबात उदभवलेले हे भांडण प्रासंगिक, तत्कालिक आणि अनपेक्षित होते हे पुढील इतिहासावरून दिसून येते..
खंडागळे हत्ती प्रकरणात निजामशाहने राजकारण केले, लखोजीराजे जाधव यांनी या खंडागळे हत्ती प्रकरणानंतर निजामशाही सोडली. १६२४ साली भातवडीच्या लढाईत आदिलशाह आणि मोगलांच्या संयुक्त सैन्यात लखोजीराजे जाधव तर निजामशाहीकडून शहाजीराजे भोसले होते. लखोजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले परस्पर विरुद्ध ठाकलेले असताना या युद्धात लखोजीराजे हे रणांगणावर कोणतीही कामगिरी न करता मागे फिरले याचा उल्लेख शिवभारतात आहे. राजेजाधव आणि राजेभोसले कायमचे वैर असते तर शहाजीराजेंवर सुड उगवायची संधी लखोजीराजे जाधव यांनी सोडली नसती. परंतु लखोजीराजे जाधव युद्ध न करताच आपल्या सहकाऱ्यासह निघून गेले, यावरून राजेभोसले आणि राजेजाधव कुटुंबात कायमचे वैर नव्हते हेच दिसून येते..
जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना लखोजीराजे जाधव यांनी शहाजीराजे-जिजाऊ माँसाहेब घोड्यावरून जात असताना पाठलाग केला इत्यादी कल्पित कथांची भर उत्तरकालीन बखरांच्या आधारे टाकली गेली आहे. वास्तविक पाहता १६२९ साली निजामशहाने दगा करून लखोजीराजे जाधव आणि त्यांची दोन मुले व नातू यांची हत्या केली होती. लखोजीराजे जाधव यांची हत्या झाली त्यावेळी शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब परांडा येथे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० मधील आहे हे आजमितीला अनेक संशोधनानंतर साधार सिद्ध झाले आहे. १६२९ साली मयत झालेले लखोजीराजे जाधव १६३० मध्ये जिजाऊ माँसाहेब - शहाजीराजे यांचा पाठलाग कसा करतील ?
स्वराज्याच्या कार्यात देखील राजेजाधव घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी योगदान दिलेले दिसते. संताजी जाधव, शंभूसिंह जाधव, पतंगराव जाधव, धनाजीराजे जाधव, पिलाजीराजे जाधव अशा राजेजाधव घराण्यातील कित्येक ज्ञात अज्ञात लोकांनी स्वराज्यासाठी योगदान दिलेले आहे. तसेच राजेभोसले - राजेजाधव घराण्यात अनेक सोयरिकी झालेल्या इतिहासातील नोंदीतून आपणास दिसून येतात. राजेभोसले आणि राजेजाधव यांच्यात कायमचे वैर असते तर हे नातेसंबंध पुढे दृढ होताना इतिहासाने पाहिले नसते. राजेभोसले आणि राजेजाधव या घराण्यात खंडागळे हत्ती प्रकरणातील प्रासंगिक आणि तत्कालिक भांडण सोडले तर कुठेही वैर, वितुष्ट किंवा सूड उगवण्याची भावना दिसून येत नाही हाच खरा इतिहास आहे..
- राज जाधव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...