संकलन - जिजाऊ - शोध आणि बोध, लेखिका - सायली गोडबोले - जोशी.
प्रांत सिंदखेड, राजे जाधवरावांची गढी, सख्यांच्या कोंडाळ्यांतून लखुजीरावांच्या ज्येष्ठ पत्नी म्हाळसाबाईसाहेबांनी प्रसुतीच्या महालात पाऊल टाकले. सारी शुभ नक्षत्रे, सारे शुभ ग्रह, शुभ क्षण ह्याचसाठी खोळंबले होते. लखुजीराव आणि म्हाळसाबाईंनी कुलस्वामिनी रेणुकेला साकडे घातले होते, “आई, आमचे हे यदुकुल फार फार प्राचीन आहे. पांडवमाता कुंती यदुतनया होती, वीर अभिमन्युची माता सुभद्रा यदुकन्या होती, आम्हालाही त्याच तोडीची कन्या दे आई, तुझं नाव ठेवू तिला”
सारी सिंदखेडनगरी अधीर झाली होती. इतक्यात एका चिमण्या जीवाने टाहो फोडला, आजवर युवराजांचे बसक्या स्वरातील रडणे ह्या महालाने कित्येकदा ऐकले होते, परंतु आज प्रथमच, राजकन्येचा टीपेचा नाद ह्या महालात निनादत होता.
अन् वार्ता साखरतोंडानीच महालाबाहेर आली, “धन्यांच्या पोटी साक्षात मातापूरची रेणुका आली, मुलगी झाली,
फिरंगी तारीख १२ जानेवारी १५९८, श्रीनृपशालिवाहन शके १५१९ हेमलंबी नाम संवत्सर, पौष शुद्ध पौर्णिमा, गुरूवार रोज आणि पुष्य नक्षत्रावर लखुजीराजांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली.”
जाधवरावांचे कुलोपाध्याय मुळे गुरूजींनी साऱ्या ग्रहनक्षत्रांना बोटावर नाचवत जन्मपत्रिका सिद्ध केली. ...... अन् तयार झालेली पत्रिका बघून गुरूजी हरखून गेले, स्तब्ध झाले, लखुजीराजांनी काळजीने विचारले, “काय जाले? काही अनिष्ट तर नाही ना?” अन् एकदम गुरूजी म्हणाले, “नाही नाही राजे, कन्या अत्यंत शुभलक्षणी आहे. साक्षात माहुरची आदिशक्ती रेणुका उपजली आहे राणीसरकारांच्या पोटी. युगायुगांचा अंधार ही कन्या दूर करेल, पुढामागुता हिच्यापोटी साक्षात शिवशंकर अवतार घेतील. राजे, कन्येला ’ज’ हे अक्षर अतिशय लाभते आहे, बघा, एक नाव सुचवतो मी, नित्य जयती सा जयंती सा जिजा! आदिशक्ती रेणुकेचे नाव आहे हे”
अन् लखुजीरावांना ‘जिजा’ हे नाव मनापासून आवडले. बारशाचे वर्णन करताना शाहीर रामसिंग आणि बजरंगभाट लिहितात,
बारसे केले थाटात, जगदंबेला अभिषेक केला
आरती करून कन्यापूजन, दक्षिणा १२ बलुतेदारांना दिल्या
सर्व झाला साजाबाजा, नाव ठेविले जिजा
महाली बाजे वाजती, द्वारी हत्ती झुलती
थाटात झाले बारसे, काय सांगु तुम्हांला, आनंद झाला सर्वांना............
कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या रचनेत काही बदल करून म्हणावेसे वाटते ,
पौषमास त्यात शुद्ध पौर्णिमा तिथी, रश्मीयुक्त तरीही भासे शीत ते किती
उगवतात सूर्यउषा गगनी थांबली, जिजा जन्मला गं सखे जिजा जन्मली
म्हाळसाराणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वत: कन्यादर्शने
ओघळले आसुसलेल सुखे कंठी दाटली, जिजा जन्मला गं सखे जिजा जन्मली
पेंगुळल्या आसपास जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा जागल्या खुळ्या
नक्षत्रेही हसून त्यांस काय बोलली, जिजा जन्मला गं सखे जिजा जन्मली
वार्ता ही सुखद जगी पोहोचली जनी, जे हाती ते टाकूनी राजपदी धावले कुणी
सुवार्ता ही आनंदे गीतपुष्पांत गुंफली, जिजा जन्मला गं सखे जिजा जन्मली
बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी, सूर रंग ताल ह्यांत मग्न मेदिनी
डोलतसे शेष, सौख्य डोले भूतली, जिजा जन्मला गं सखे जिजा जन्मली!
No comments:
Post a Comment