विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

"बळवंतरावांस छातींत गोळी लागली!"

 


"बळवंतरावांस छातींत गोळी लागली!"
शके १६८२ च्या कार्तिक व. ३० रोजी पानिपत येथे अहंमदशहा अब्दाली आणि मराठे यांचा मोठा संग्राम होऊन मराठ्यांचा विजय झाला.
परंतु त्याच दिवशी प्रसिद्ध योद्धा बळवंतराव मेहेंदळे हा गोळी लागून पडला. यापूर्वी कार्तिक शु. १५ ला जनकोजी शिंदे यांनी अब्दालीचा चांगलाच मोड केला होता. तो डाव मनांत ठेवून कार्तिक व. ३० ला काही निवडक अफगाण व रोहिले फौजा, अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री संधि साधावी असा बेत करून मराठ्यांवर चालून आल्या. वीस हजार स्वार घेऊन बळवंतराव मेहेंदळे गनिमांवर चालून गेले. सायंकाळी चार वाजता लढाईस तोंड लागले. तास-दोन तास गोळागोळी होऊन तोफांचा मारा सुरू झाला. 'हर हर महादेव' अशी गर्जना करून स्वतः मेहेंदळे सर्वांच्या पुढे आले. या हातघाईत "बळवंतरावांस छातीत गोळी लागली. तसेच घोड्याखाली पडले. तो त्याजकडील (शत्रूकडील) माणसें धावली. त्यांतील एकाने तोंडावर तरवारीचा वार केला. दुसऱ्याने गळा कापून शिर नेऊ लागले. तो पांचसात राऊत धाऊन आले. खंडेराव नाईक निंबाळकराने शवावर पडून तरवारीचे घाव सोसले, पण शव गिलच्यांच्या हाती लागू दिले नाही. गळा अर्धा कापला होता. तसेंच आणून दहन केले. समागमें स्त्री अग्निप्रवेश गेली.-" या साऱ्या प्रसंगाचें हृदयद्रावक चित्र रा. चिंतामणराव वैद्यांनी आपल्या 'दुर्दैवी रंगू'मध्ये सरसपणे रेखाटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर शिंदे-होळकर यांच्या फौजा शत्रूवर तुटून पडल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा अब्दालीचा पराभव केला. बळवंतराव मेहेंदळे हे उत्कृष्ट सेनानी होते. यापूर्वी हि यांनी काही पराक्रम केले होते. नानासाहेबांच्या विरुद्ध ताराबाई व दमाजी गायकवाड असतांना ज्या मंडळींनी गेंड्याच्या माळावर गायकवाडांचा पराभव केला त्यांत मेहेंदळे होते. यांनीच कर्नाटकांत स्वारी करून होसकोटें, मुळबागल व कडपनाथ ही ठिकाणे काबीज केली होती.
७ डिसेंबर १७६०

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...