विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

"रायगड मोंगलांस दिधला!"




"रायगड मोंगलांस दिधला!"
शके १६११ च्या मार्गशीर्ष शु. २ या दिवशी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या हाती जाऊन येसूबाई व पुत्र शिवाजीराजे यांना कैद झाली.
संभाजी राजांची भीषण हत्या झाल्यानंतर मराठ्यांचा नायनाट करण्यासाठी बादशहा सिद्ध झाला. रायगडावर स्वारी करून राजारामासहि पकडून आणण्याच्या कामगिरीवर बादशहाने वजीर आसदखान याचा पुत्र इतिकदखान यास पाठविले. त्याप्रमाणे खानाने रायगडास वेढा घातल्यावर मोठाच कठीण प्रसंग निर्माण झाला. शिल्लक राहिलेले मुत्सद्दी आणि सरदार जमा होऊन विचार करूं लागले. “खजिन्यांत शिल्लक नाही, पागा व फौज सर्व मोडले, किल्ले बेसरंजाम झाले, पूर्वीची अनुभवी माणसे मरून गेली आणि मोगलांच्या.निरनिराळ्या फौजा मराठ्यांच्या प्रांतास उपद्रव देऊ लागल्या." अशा कठीण अवस्थेत सर्वत्र निराशाच होती. या प्रसंगी येसूबाईंनी सला दिला की, राजारामाने बाहेर पडून आपला बचाव करावा. ही योजना सर्वांना पसंत पडली. सर्वांची एकवाक्यता व शपथविधि झाल्यानंतर राजाराम राजे रायगडावरून बाहेर पडले. तरी रायगड हस्तगत करण्याचा प्रयत्न बादशहाने मोठ्या जोमाने सुरू केला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ही जोडी आपल्या अतुल पराक्रमाने मोगलांस त्रास देत होतीच. संभाजीच्या भीषण हत्येमुळे मराठ्यांच्यांत सूडाची विलक्षण भावना उसळून आली होती. शौर्य आणि पराक्रम यांच्या साह्यावर मराठे सहज विजयी झाले असते. परंतु फितुरी हा एक दुर्गण मराठ्यांना पदोपदी नडला आहे. रायगडास वेढा घालून सात-आठ महिने झाले तरी इतिकदखानाचे एक पाऊलहि पुढे पडले नव्हते. परंतु वाईच्या सुभेदारीच्या लालसेनें रायगडावर फितुर झाली. त्या योगें मार्गशीर्ष शु.२ ला मोंगलांचा रायगडावर सुलभ रीतीने प्रवेश झाला. राजपत्नी येसूबाई मुलासह मोंगलांच्या स्वाधीन झाली! छ. शिवरायांच्या मृत्यूनंतर दहाच वर्षांच्या आंत त्यांच्या सुनेवर व नातवावर हा कठीण प्रसंग आला. खानाने सर्व रायगड लुटला. शिवरायांचे सिंहासन फोडिलें.
-३ नोव्हेंबर १६८९

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...