विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

"बचेंगे तो और भी लढेंगे!"...

 


"बचेंगे तो और भी लढेंगे!"...
शके १६८१ च्या पौष व.८ रोजी राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रामांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचे निधन झाले.
सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लोस आले. स्वतःचे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करू असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यामार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पौष व.८ रोजी दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले. "शजूंनी एकदम निशाणावर चाल केली आणि तोफांचा व बंदुकांचा मार मराठी फौजेवर जोराचा चालू केला. नदीच्या तीरावर अडचण भारी, शेरणीची बेटे असल्यामुळे पळून जाण्यास सोय पडेना. आठ घटका पूर्ण होतांच पांचशे मनुष्य ठार झाले. दत्ताजी व जनकोजी यांस पळून जातां आले असते, परंतु तसे न करतां निशाणापाशींच लढत राहिले. तो जनकोजीचे दंडास गोळी लागून तो बेशुद्ध होऊन खाली पडला. हे वर्तमान दत्ताजीस समजले तेव्हां त्याने जोराने शत्रूवर घोडे घातले. त्या गर्दीत यशवंतराव जगदाळे गोळी लागून पडला. त्याचे प्रेत काढावयास दत्ताजी पुढे गेला, तो त्याचे उजवे बरगडीत गोळी लागून तोहि तात्काळ गतप्राण झाला. तेव्हां सर्वांची अवसाने गेली."
दत्ताजी गोळी लागून रणभूमीवर पडले तेव्हा त्यांना कुत्बशहाने विचारले, “पटेल, लढेगे क्या?" त्यावर त्यांनी उत्तर दिले, “बचेगे तो और भी लढेंगे!" यावरून दत्ताजीच्या शूरत्वाची कल्पना येते. "मराठ्यांच्या इतिहासांत जे कित्येक हृदयद्रावक प्रसंग आहेत त्यांत दत्ताजीच्या वरील पराक्रमाची गणना झाली पाहिजे. पानपतच्या प्रचंड संहाराने दत्ताजीचे अचाट कृत्य लोपून गेले आहे. धन्याची कामगिरी पार पाडण्यासाठीच त्याने आपल्या प्राणांची आहुति दिली." दत्ताजी शिंदे पडले आणि जनकोजी जखमी झाले हे समजतांच मल्हारराव होळकर शोक करूं लागले. त्या वेळी त्यांची स्त्री गौतमाबाई हिने सांगितले, “सुभेदार, तुमचे वृद्धपण झाले. शिंदे यांच्या मुलांच्या तोंडचा जार वाळला नाही. ते मारता मारतां मेले. तुमचे दिवस समीप आले. हिम्मत धरून धरून मारता मारतां मरावे."
-१० जानेवारी १७६०

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....