विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

“सुरतेची बेसुरत जाली!"

 


“सुरतेची बेसुरत जाली!"
शके १५८५ च्या पौष व. ४ रोजी श्रीशिवाजी राजे यांनी सुरत लुटून बादशहास चांगलीच दहशत बसविली.
त्या वेळी सुरत हे अत्यंत श्रीमंत शहर असून मोंगल बादशाहीतील पश्चिम किनाऱ्यावरील व्यापाराचे मोठेच ठिकाण होते. त्यावर हल्ला करण्याचा विचार छत्रपती शिवाजी राजांनीे केला. बहिर्जी नाईक नांवाच्या चतुर हेराने सर्व गुप्त बातमी आणली. अचानकपणे चार हजार स्वारांनिशी शिवराय सुरतेवर येऊन पोचले. सर्व लोकांच्या अंगांत धडकी भरली. इनायतखान शहरांतील मोंगली अमलदार होता. किनाऱ्यावर इंग्रज व डच यांच्या वखारी होत्या. आदल्या दिवशी शिवाजी राजांनी नागरिकांना कळविले, " इंग्रजी व एतद्देशीय व्यापारी किंवा इतर लोक यांस कोणत्याहि प्रकारें इजा पोचविण्याची आमची इच्छा नाही. फक्त बादशहाने आमच्या मुलखावर हल्ला करून लोक मारिले; आणि आमचे पुण्याचे वास्तव्य बंद पाडिलें त्याचा वचपा घ्यावा, येवढाच आमचा हेतु आहे." शिवाजी राजांचा दावा फक्त बादशहाशी होता. त्याने शिवाजी राजांचा नायनाट करण्याचा प्रयत्न चालविला होता. तेव्हां त्याला हात दाखविणे क्रमप्राप्तच होते. सुरतेचा अंमलदार इनायतखान यानो शिवाजी राजांशी कपट कारस्थान करण्याचा व त्यांचा खून करण्याचा डावहि खेळून पाहिला पण तो शूर सैनिकांच्या सावधतेने फसला. शिवरायांनी त्या सर्वांना जबरदस्त शिक्षा दिल्या आणि पौष व. ४ रोजी लुटीस प्रारंभ झाला. तीन-चार दिवसपर्यंत येथेच्छ लूट करण्यांत आली. चांदी, सोने, मोती व जवाहीर यांची प्राप्ती मोठ्या प्रमाणावर झाली. शिवाजी राजांच्या या कृत्यास कोणी कोणी 'लुटारूपणा'चा अर्थ चिकटवितात. परंतु येथे हे ध्यानात घेतले पाहिजे की, मोंगल सुभेदार पुण्यामध्ये खुद्द शिवाजीच्या वाड्यांत राहून हिंदु धर्म, हिंदु समाज यांचा उच्छेद करण्यास प्रवृत्त झाला होता. त्यावेळी त्याने स्वराज्या मुलुखाची नासाडी केली रयतेय त्रास दिला. त्याचा बंदोबस्त शिवाजी राजांनी करावयाचा नाही तर कोणी? औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला दहशत बसवण्यासाठी याचा फार उपयोग झाला.
-६ जानेवारी १६६४

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...