विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

उमाजी नाईक फांसावर !

 


उमाजी नाईक फांसावर !
शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली
शके १७१३ मध्ये पुरंदर शेजारच्या भिवंडी गांवी उमाजीचा जन्म झाला. सन १८०२ च्या वसईच्या तहानंतर पेशवे आणि रामोशी मंडळी यांचे बिनसले. रामोशांची वतने जप्त झाली. त्या वेळेपासून यांनी लुटालूट करण्यास प्रारंभ केला. अनेक वेळां सक्त मजुरीच्या शिक्षा, व फटक्यांच्या सजा यांनी भोगिल्या होत्या. सन १८२१ मध्ये पुणे प्रांतांत यांनी फारच धुमाकूळ घातला. यांचा बंधु सत्तु जेजुरीच्या यात्रेत पकडला जात असतां उमाजीने दोन पोलिसांनाच ठार करून इंग्रजांविरुद्ध बंड उभारले. आपला संच जमवून यांनी पुण्याच्या सरकारी तिजोरीवर हल्ला केला व सहा हजार दोनशे रुपये लांबविले. सत्तु वारल्यावर उमाजी टोळीचे नायक झाले. इंग्रज सरकारने याला पकडण्यासाठी फारच प्रयत्न केले. 'पूना हॉर्स' या फौजेच्या मुख्य अधिकाऱ्याला उमाजीवर पाठविले पण काही उपयोग झाला नाही. पोलिसांची मुंडका कापून ती तो गव्हर्नराकडे पाठवीत असे. वतने परत देण्याच्या अटीवर सरकारी याचे सख्य झाले. आणि उमाजीचा उपयोग सरकारला गुन्हे पकडण्याच्या कामी होऊ लागला. परंतु पुढे याचा कार्यक्रम सर्व बदलून त्याने पुनः बंडखोरी केली. खंडोबाचे दर्शन घेऊन यांनी आपल्या साथीदारांसह पुणे, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक, भोर या प्रांतांतून दंगल उडवून दिली. साडे. तीनशे लोक त्यांच्या टोळीत होते. सरकार पुन्हा त्यांना पकडण्याच्या कामगिरीस लागले. नाकेबंदीमुळे अन्नवस्त्र मिळेनासे झाल्यावर यांचे साथीदार त्यांना सोडून जाऊ लागले. कांही फितुर होऊन सरकारला मिळाले. पांच हजारांचे बक्षीस सरकारने लाविले होते. ते दहा हजारांपर्यंत वाढल्यावर याच्याच टोळीतील नाना व काळू यांनी उमाजीला भोर संस्थानच्या पोलिसांच्या स्वाधीन केले. शेवटी माघ शु. २ ला पुणे येथे दोघां साथीदारांसह यांना फाशी देण्यात आले. उमाजी नाईक मोठे शूर व मनाचा उदार होते.
३ फेब्रुवारी १८३२

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...